मोड आलेल्या कडधान्यांचे थालीपीठ
साहित्य : प्रत्येकी २ मोठे चमचे हिरवे मूग, मसूर, चवळी, मटकी, २ वाट्या ज्वारीचे पीठ, १ वाटी चणाडाळीचे पीठ, ३-४ लसूण पाकळ्या, १ इंच आले, १ हिरवी मिरची, प्रत्येकी १ छोटा चमचा जिरे, तीळ, धणे-जिरेपूड, १/२ छोटा चमचा हिंग, १ चमचा ओवा, १/२ वाटी कोथिंबीर, चवीनुसार मीठ.
कृती : सर्व कडधान्ये स्वच्छ धुऊन पाच ते सहा तासांसाठी भिजत घाला. एका सुती कापडात घट्ट बांधून रात्रभर ठेवा. दुसऱ्या दिवशी त्याला मोड येतील. मोड आलेली कडधान्ये एका मिक्सरच्या भांड्यात घ्या. त्यात जिरे, लसूण, आले, हिरवी मिरची व थोडे पाणी घालून बारीक वाटून घ्या. हे सगळे मिश्रण एका मोठ्या बाउलमध्ये घ्या. त्यात ज्वारीचे पीठ, चणाडाळीचे पीठ, धणे-जिरेपूड, तीळ, हिंग, ओवा, कोथिंबीर आणि मीठ घालून घट्ट मळून घ्या. हा गोळा दहा मिनिटे बाजूला ठेवा. गॅसवर तवा गरम करायला ठेवा. त्यावर थोडे तेल किंवा तूप घाला. आता पिठाचा एक छोटासा गोळा घेऊन ओल्या कापडावर किंवा प्लास्टिकच्या पिशवीवर थालीपीठ थापून घ्या. ओल्या रुमालासकट थालीपीठ उचलून तव्यावर ठेवा. थोडे तेल लावून दोन्ही बाजूंनी खरपूस भाजा. हे थालीपीठ दही किंवा हिरव्या चटणीबरोबर सर्व्ह करा.
अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
रुचिरा बारडकर, पुणे
