वाटण ठेवा साठवून
सोशल मीडियावर सध्या ‘मिल प्रेप’ ची जोरदार चर्चा सुरू असते. ‘मिल प्रेप’ म्हणजे येत्या आठवडाभर बनवायच्या विविध पदार्थांची प्राथमिक तयारी (पदार्थातील मुख्य घटक शिजवून तयार ठेवणे) आठवड्याच्या शेवटच्या दिवशी करून ठेवणे. अशी तयारी करून ठेवल्यामुळे वेळेअभावी बाहेरुन जेवण ऑर्डर करण्याऐवजी पटकन घरच्या घरी एखादा पदार्थ बनवणे सोपे होते. त्याचा दुहेरी फायदा म्हणजे एक तर पैसे वाचतात आणि दुसरे म्हणजे घरचे पौष्टिक अन्न खाल्ल्याने आरोग्यही चांगले राहते. पाश्चात्त्य देशांतील ही संकल्पना म्हणजे जेवणाच्या नियोजनाची स्मार्ट पद्धत!
पाश्चात्त्य प्रकारच्या जेवणाची, मेन्यूची अशी तयारी सहज करता येते. पण पारंपरिक भारतीय पदार्थ अशा प्रकारे बनवता येतील का? कोणकोणत्या पदार्थांची अशी पूर्वतयारी करून ठेवता येऊ शकेल? या प्रश्नांचे उत्तर शोधता येईल ते कागद, पेन आणि फ्रिज यांच्या मदतीने. मुळात जेवण बनवण्यापेक्षा आज काय बनवायचे हा प्रश्न त्रासदायक असतो. मात्र, योग्य नियोजन करून ते कागदावर मांडून ठेवल्यास लगेच कामाला लागता येते. प्रथम आठवडाभराचा मेन्यू शुक्रवारीच ठरवून घ्यावा. ठरवलेले वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी लागणारे जिन्नस शनिवारीच आणून ठेवावेत. यापैकी काही जिन्नस शिजवून फ्रिझ करून ठेवता येतात. तर काही जिन्नस आठवडाभर फ्रिजमध्ये टिकतात.
१. डाळी: डाळ भिजत ठेवणे आणि शिजवणे यात दररोजचा खूप वेळ जातो. त्यासाठी शनिवारीच दोन वाट्या डाळ भिजवून कुकरमध्ये चांगली घट्ट शिजवून घ्यावी. डाळ थंड झाल्यावर चांगल्या दर्जाच्या सिलिकॉन आइस क्यूब ट्रेमध्ये (शक्यतो मोठा आइस क्यूब ट्रे घ्यावा, ज्यात पाऊण ते एक वाटी पाणी मावते.) डाळ ओतून फ्रिझ करावी. तयार झालेल्या डाळीच्या क्यूब्ज एखाद्या डब्यात अथवा झिपलॉक बॅगमध्ये घालून फ्रिझरमध्ये ठेवा. आयत्या वेळी डाळ बनवताना पाणी उकळत ठेवावे. पाणी उकळल्यावर त्यात डाळीच्या एक किंवा दोन क्यूब टाकून फोडणी द्यावी. फोडणीची डाळ लगेच तयार होते.
२. चिकन, भाजीचा स्टॉकः बिर्याणी, सूप्स अधिक चविष्ट बनवण्यासाठी त्यात भाजी किंवा चिकनचा स्टॉक वापरतात. आपल्या रेसिपीप्रमाणे हा स्टॉक बनवून आइस क्यूब ट्रेमध्ये फ्रिझ करून घ्यावा. स्टॉकच्या क्यूब्ज झिपलॉक बॅगमध्ये ठेवाव्यात. हा स्टॉक फ्रिझरमध्ये महिनाभर टिकतो. आइस क्यूब वापरण्याचा फायदा म्हणजे क्यूब्ज काढून वापरता येतात. यामुळे अन्न वारंवार फ्रिजच्या बाहेर काढून वितळून पुन्हा बर्फ बनवण्याच्या प्रक्रियेत नासण्याचा धोका टळतो.
३. गे्रव्ही: प्रत्येक घरात टोमॅटो, कांदा, आले, लसूण आणि मसाला घालून एक ग्रेव्ही बेस बनवला जातो. गे्रव्ही बनवण्यासाठी कांदा चिरणे, परतणे व्यवस्थित तेल सुटेपर्यंत शिजवणे यात रोजचा फार वेळ जातो. त्यामुळे ग्रेव्ही बनवण्यासाठी नेहमीच्या रेसिपीच्या ५ ते ६ पट कांदे आणि टोमॅटो यांची वेगवेगळी पेस्ट करून ठेवावी. नेहमीप्रमाणे ग्रेव्ही शिजवून घ्यावी व थंड झाल्यावर आइस क्यूब ट्रेमध्ये घालून फ्रिझ करून झिपलॉक बॅगमध्ये भरून फ्रिजरमध्ये ठेवावी. ही ग्रेव्ही दोन-तीन आठवड्यांपर्यंत टिकते. पातळ भाज्या, मासे, चिकनचा रस्सा बनवण्यासाठी ह्या ग्रेव्हीचा बेस वापरता येतो.
४. पावभाजी बेस: फ्लॉवर, मटार, बटाटे, बीट, गाजर या सगळ्या भाज्या चिरून कुकरमध्ये वाफवून घ्याव्यात. (यात पाण्याचा अंश कमी असावा.) सर्व भाज्या हॅण्ड ब्लेंडरने मॅश करून त्याची पेस्ट करावी. ही पेस्ट मोठ्या वाट्यांमध्ये फ्रिझ करून डब्यात अथवा झिपलॉक बॅगमध्ये भरून ठेवता येईल. ही पेस्ट महिनाभर फ्रिझरमध्ये उत्तम टिकते. आयत्या वेळी पावभाजी बनवण्यासाठी कांदा, पावभाजी मसाला, आले-लसूण पेस्ट परतून घ्या. त्यात या फ्रोझन भाज्यांची क्यूब टाकून व्यवस्थित शिजवून घ्या. अवघ्या १५ मिनिटांत पावभाजी तयार होते.
५. निरनिराळी वाटणे: हळद, धणे, लाल तिखटाची गोळी, कांद्याखोबऱ्याचे वाटण, हिरवे वाटण अशी रोजच्या जेवणासाठी लागणारी निरनिराळी वाटणे तयार करून छोट्या आइस क्यूब ट्रेमध्ये फ्रिझ करून ठेवता येतात. भाजी शिजत असताना त्यात वाटणाची एखादी क्यूब टाकली की काम झाले आणि रोजचा मिक्सर धुवायची कटकट नाही. हे वाटण महिना-दोन महिना टिकते.
याशिवाय, इडली-डोशाचे पीठ, उकडलेले बटाटे, अंडी, आले-लसूण पेस्ट असे अनेक पदार्थ/जिन्नस आठवडाभरापर्यंत फ्रिज-मध्ये ठेवता येतात. वेळेअभावी उघड्यावर किंवा बाहेर बनवलेले शरीराला अपायकारक ठरणारे पदार्थ खाण्यापेक्षा अशा प्रकारे स्मार्ट नियोजन करून घरच्या घरी बनवलेले पदार्थ खाणे नेहमीच आरोग्यदायी ठरेल!
अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
गुगल गृहिणी
