Healthy Parenting | Positive Parenting

अपयश येता न जाता खचून यश मिळवून ते थांबावे | संजीव लाटकर | Let Kids Fail to Let Them Grow | Sanjeev Latkar

अपयश येता न जाता खचून यश मिळवून ते थांबावे

मुलांचे अपयश हा बहुतेक पालकांच्या चिंतेचा अग्रक्रमावरील विषय असतो. किंबहुना मुलांचे अपयश म्हणजे आपले अपयश आहे, असा त्यांचा समज असतो. अनेक पालकांना असे वाटते की आपल्या मुलांनी सतत – लागोपाठ – अविरतपणे फक्त आणि फक्त यशस्वीच व्हायला हवे!

यशस्वी म्हणजे काय, या प्रश्नाची व्याख्या पालकांना करता येत नसल्यामुळे सगळे यश हे गुणांपाशी येऊन थांबते. मुलांना अधिक गुण मिळाले म्हणजे ते यशस्वी झाले, अशा भाबड्या समजुतीत आजही अनेक पालक असतात. दुसरीकडे मुलांचे अपयश म्हणजे पालकांच्या अहंकाराला लागलेला धक्का असतो. होय! मुलांच्या अपयशाचा संबंध हा अनेकदा थेट पालकांच्या अहंकाराशी असतो. मुले भरभरून यशस्वी झाली की पालकांचा पालक म्हणून असलेला अहंकार सुखावतो. यशस्वी मुलांच्या पालकांना असा अहंकार मिरवताना बघून अपयश मिळालेल्या मुलांचे पालक दुखावतात. मग दुखावलेल्या अहंकाराचा राग असे पालक आधीच अपयशी झालेल्या आपल्या मुलावर काढतात. त्याचा परिणाम म्हणजे, ते मूल अधिक खच्ची होते आणि पुढच्या अपयशाची पायरी उतरू लागते.

वास्तविक अपयश ही यशाचीच दुसरी बाजू आहे, हे आधी आपल्याला स्वीकारायला जमले पाहिजे म्हणजे मुलांवरचे अपयशाचे आघात कमी करता येतील. मुलांनी सतत यश मिळवावे, अशा अट्टहासात आपण राहतो आणि स्वतःला दुःखी करून घेतो.

एक लक्षात घ्यायला पाहिजे, की अपयश ही एक फोल संकल्पना आहे. यश मिळाल्यावर आपण पुढचे प्रयत्न थांबवले तर चालेल का? खरे तर अपयशाने प्रयत्नांचा पुढचा वेग वाढायला हवा, पण तसे होत नाही. कारण अनेक पालक मुलांचा सतत पाणउतारा करतात. लहान निष्पाप मुलांना अपयशाची जाणीवसुद्धा नसते. माणसांमध्ये प्रयत्न करण्याची प्रेरणा मूलभूत असते. त्यामुळेच विषय हा यश किंवा अपयशाचा नसून आपण जे काम करतो ते अधिक चांगले कसे करता येईल याबद्दल विचार करण्याचा आहे. ‘एक्सलन्स’साठीच्या प्रामाणिक प्रयत्नांचा आहे!

प्रयत्नांमध्ये अविरत सुधारणा घडवून आणण्याची प्रेरणा खूप महत्त्वाची आहे. अभ्यासात किंवा विशिष्ट विषयात मुले जेव्हा मागे पडतात, तेव्हा ती अपयशी नसतात, तर त्यांचे प्रयत्न कमी पडतात. तो विषय किंवा तो अभ्यास त्यांना समजत नाही, कळत नाही, त्याचा कंटाळा येतो, त्यातून त्यांना प्रेरणा मिळत नाही, समाधान मिळत नाही, आनंद मिळत नाही, शाबासकीचा ‘इनसेन्टिव्ह’ मिळत नाही इत्यादी अनेक पदर त्यांचे प्रयत्न कमी पडण्याला कारणीभूत असतात. त्यांचे प्रयत्न कमी का पडले, याचा विचार न करता काही पालक त्या मुलांच्या मोडकळीला आलेल्या प्रयत्नांना टेकू देण्याची धडपड करतात. उदा. मुलांना बक्षिसाचे आमिष दाखवणे, त्यांना स्पेशल कोचिंग लावणे, त्यासाठी कष्ट उपसण्याची तयारी असणे, कोचिंगला नेणे – आणणे हे सर्व रूढ प्रयत्न हे पालक आनंदाने करतात. असे प्रयत्न केले की मूल यशस्वी होईल अशी या पालकांची आशा असते. पण हे वरवरचे आणि कृत्रिम प्रयत्न निष्फळ ठरले की पालकांचा अहंकार दुखावला जातो, राग अनावर होतो. मग घरामध्ये धुसफूस सुरू होते, तुलना सुरू होते. मुलांचा पाणउतारा होतो. सतत त्यांच्या अपयशाचा उल्लेख होतो. यात अभ्यासात हुशार असणारे भावंडं घरात असेल तर परिस्थिती आणखी चिघळते. चांगले मूल हाताबाहेर जाते. याचाच अर्थ पालकांच्या वर्तणुकीतला आणि मानसिकतेतला विरोधाभास मुलांसाठी त्रासदायक ठरतो.

आपण स्वतः अनेक बाबतीत अपयशी झालेलो असतो. परंतु आपण स्वतःला या अपयशाबद्दल माफ केलेले असते. मुलांना मात्र अपयशी होण्याची मुभा नसते. अशी बरीच मुले आपल्या आजूबाजूला असतील, जी अष्टपैलू आहेत. त्यांना सर्वच विषयात गती असते. परंतु अशी अधिक मुले आहेत, ज्यांना विशिष्ट विषयातच गती असते. कोणाला अभ्यास चांगला जमतो तर कोणाला खेळ. प्रत्येकाकडे असे काही ना काही असामान्य गुण असतात. मुलांमधील सुप्त गुणांचे रक्तगट पालकांना ओळखता आले पाहिजेत. कारण हे सुप्त गुणांचे रक्तच ओढ निर्माण करते, आकर्षण निर्माण करते, महत्त्वाकांक्षा निर्माण करते आणि प्रयत्नांचा जन्मही या रक्तातच होतो! यश किंवा अपयश या रक्तावर अवलंबून आहे. कमी पडणे म्हणजे अपयश नव्हे. प्रयत्न थांबले तर ते अपयश. मूल प्रयत्नात कमी का पडत आहे, याचा विचार सर्व पालक करतातच असे नाही. जिथे मूल कमी पडते त्या गोष्टीचा अतिविचार न करता ज्यात ते जास्त गुणप्रदर्शन करू शकते, त्या गोष्टीत मुलांना प्रोत्साहन आणि प्रेरणा देण्याचा विचार करायला हवा. मुलांना उभारी देण्याआधी पालकांनी स्वतःला उभारी दिली पाहिजे. आपल्या मुलांकडे समाज, नातलग, शेजारी यांच्या चष्म्यातून पाहण्यापेक्षा मुलांच्या चष्म्यातूनच बघता आले पाहिजे.

यश हे फळामध्ये दडलेले नसून प्रयत्नांमध्ये दडलेले आहे. मुलांना सतत फळाचा विचार करायला लावू नये, त्याऐवजी त्यांचा सर्व भर प्रयत्नांवर कसा राहील याची सवय त्यांना लावावी. आपल्या मुलांचा पिंड, प्रकृती, स्वभाव, हुशारी ही इतर मुलांपेक्षा वेगळीच असणार आहे.त्यात डावे-उजवे करता येणार नाही. आपली शिक्षणपद्धती केवळ असाहाय्यतेमुळे आणि अपरिहार्यतेमुळे सब घोडे बारा टक्के पद्धतीने चालवली जाते. मुलांचे संगोपन मात्र अशा प्रकारे करता येत नाही. ते अत्यंत सापेक्षपणेच करावे लागते आणि त्यांची वाढही सापेक्षपणेच होते. त्यामुळेच यश हेसुद्धा सापेक्ष असते. यशाला कधीही निरपेक्ष ठरवण्याचा प्रयत्न करू नये. कारण त्यात तुलना उद्भवते आणि मुलांमध्ये न्यूनगंडाची भावना तयार होऊ शकते. आपण जे काम करतोय ते आनंदाने करावे, त्याची मजा घ्यावी ही मुलांची मूळ प्रवृत्ती असते. ‘खेळायला जा’ असे त्यांना सांगावे लागत नाही पण ‘अभ्यासाला बस’ हे सांगावे लागते. कारण सामान्य मुलांना खेळताना जो आनंद मिळतो, तो अभ्यास करताना मिळत नाही. परंतु अभ्यास करताना निदान मुलांना त्रास होऊ नये याची काळजी पालक म्हणून आपण घेऊ शकतो. सगळ्याच गोष्टी मुले उघडपणे पालकांकडे बोलत नाहीत. अशा वेळेला पालकांना मुलांपर्यंत पोहोचावे लागते. मुलांच्या अडचणी, समस्या समजून घ्याव्या लागतात. मुलांबरोबरचा सहवास हा आनंदाचा व्हावा, मजेचा व्हावा. मुलांना तो हवाहवासा वाटावा, याची काळजी पालक म्हणून आपल्याला घ्यायला हवी. मुलांना उपदेशामृत पाजण्यापेक्षा त्यांना समजून घेण्याकडे आपला कल असला पाहिजे. पालकांनी ओढवून घेतलेले मुलांचे अपयश हे एक प्रकारे पालकांचेच मोठे अपयश असते हे नाकारून कसे चालेल?

आपण मुलांवर अपेक्षांचे जेवढे अवाजवी ओझे टाकू, त्यांना तथाकथित यशासाठी जितक्या अनाठायी अटी आणि शर्ती घालू, जितकी अवास्तव उद्दिष्टे त्यांना आखून देऊ, तितक्या मोठ्या अपयशाला मुलांना तोंड द्यावे लागू शकते. मुळात आपल्या डिक्शनरीतून अपयश हा शब्द हद्दपारच करायला हवा. यशात फक्त कमी-जास्त असू शकते. आजची यशामधली कमतरता अथक प्रयत्नांनी उद्या दूर होऊ शकते. मूल एखाद्या विषयात, एखाद्या क्षेत्रात अपयशी ठरत असेल तर दुसऱ्या विषयात किंवा दुसऱ्या क्षेत्रात ते नक्कीच घवघवीत यश मिळवण्याची शक्यता असते. त्यामुळे अपयश हा शब्द शक्य तितक्या लवकर घरातून बाहेर फेकून दिला तर मुलांच्या संगोपनासाठी ते फारच उपकारक ठरेल. मुलांवर अपयश नावाचे विष गिळण्याची किंवा पचवण्याची वेळच येणार नाही!

हा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


संजीव लाटकर

(लेखक लाईफ स्किल-पेरेंटिंग मार्गदर्शक, लेखक व वक्ते आहेत.)

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.