सायबर पालकत्व
मुले जन्माला येताच त्यांच्या नजरेसमोर आज मोबाइल धरला जातो.चिऊ-काऊच्या गोष्टी सांगणाऱ्या आजीआजोबा, आईबाबा यांची जागा आज मोबाइलने घेतली आहे.हळूहळू मुले फक्त मोबाइलशी दोस्ती करत नाही, तर मोबाइल आणि इंटरनेटवर अवलंबून राहू लागतात.चित्र काढायचे आहे, निबंध लिहायचा आहे, गणित सोडवायचे आहे, विज्ञानाचा एखादा प्रयोग करून बघायचा आहे, प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना ‘गुगलदादा’ची मदत लागते.हळूहळू गुगलशिवाय आपण गोष्टी करू शकतो, तशा त्या केल्या पाहिजेत हा विचारच मुलांच्या मनातून बाजूला सरकतो.अशा सभोवतालात वाढणारी मुले हे आजचे आपले वास्तव आहे आणि म्हणूनच पालक म्हणून आपल्यापुढची आव्हाने मोठी आणि किचकट आहेत.परिणामी, आजच्या डिजिटल युगात पालकांना सायबर पालकत्वाची भूमिका पार पाडावी लागणार आहे.
सायबर पालकत्व म्हणजे नक्की काय, तर तंत्रज्ञानाबरोबरच सजग, समतोल आणि समृद्ध सहजीवन जगण्यासाठी मुलांना तयार करणे. म्हणजेच, इंटरनेटचे धोके मुलांना समजावून देणे, त्यांचा स्क्रीन टाइम प्रचंड असेल तर तो कमी व्हावा यासाठी मुलांना मदत करणे, ऑनलाइन जग जितके रंजक आहे तितकेच ऑफलाइन जगही सुंदर आहे हे समजावून देण्यासाठी, त्याचा अनुभव मुलांना घेऊ देण्यासाठी स्वतः वेळ काढणे.आपले मूल गेमिंग किंवा इंटरनेटमुळे निर्माण होणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या व्यसनात अडकू नये यासाठी जागरूक असणे आणि हे सगळे तेव्हाच घडू शकेल जेव्हा पालक म्हणून आपण जागरूक व संवादी असू.तसेच मुलांवर फक्त टीका न करता त्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी तयार असू.
सायबर पालकत्वासमोरची आव्हाने
१.इतिहास नाही: इंटरनेटच्या संदर्भात आताच्या ‘पालक पिढी’कडे मागच्या पिढीच्या अनुभवांचा ऐवज उपलब्ध नाही.आपले आईबाबा, आजीआजोबा यांना सायबर पालकत्व करण्याची वेळ कधीही आलेली नव्हती.त्यामुळे सायबर पालकत्व निभावताना काय करायचे आणि काय टाळायचे याचा अभ्यासक्रम आपल्याकडे नाही.उलट, आपणच अभ्यासक्रम तयार करतो आहोत, जो पुढील पिढ्यांच्या पालकांना उपयोगी व मार्गदर्शक ठरेल.त्यामुळे आताचा आपला प्रवास अधिक किचकट, परीक्षा पाहणारा आहे.
२.पालकांचा स्क्रीन टाइम: मुलांसाठी पालक हे सगळ्यात मोठे आदर्श असतात.अशा वेळी पालकांचा (अगदी आजीआजोबांसह कुटुंबातील सर्व मोठ्या व्यक्ती) स्क्रीन टाइम जास्त असेल तर ते मुलांना स्क्रीन टाइम कमी करायला कसे सांगणार? कँडी क्रश खेळत बसलेले पालक मुलांना गेमिंग करू नकोस हे कुठल्या तोंडाने सांगतील? त्यामुळे आपल्या मुलांनी मोबाइलचा योग्य आणि सजग वापर करावा असे वाटत असेल तर पालकांनी स्वतःपासून सुरुवात करावी‧
३.स्पर्धा आणि ताण: जीवन-शैलीची स्पर्धा फक्त मुलांमध्ये असते असे नाही.तंत्रज्ञानाबद्दल पालकही एकमेकांशी प्रचंड स्पर्धा करत असतात.मुलांना किती रुपयांचा मोबाइल घेऊन द्यायचा इथपासून किती महागडे गेमिंग गॅजेट्स घ्यायचे, कोणता स्मार्ट टीव्ही घ्यायचा इथपर्यंत अनेक गोष्टी.ही स्पर्धा अनेकदा मुलांसाठी हानिकारक असते.आपण मुलांना जे घेऊन देतो आहोत त्याची मुलांना खरेच गरज आहे का, त्यांच्या वयाला अनुरूप गोष्टी आपण घेतो आहोत का, हा विचार पालक म्हणून आपण करायला हवा.
सायबर पालकत्व निभावताना हे लक्षात ठेवा:
१.वयानुरुप गॅजेट्स द्या: मुलांना मूल राहू देणे गरजेचे असले तरी सायबर जग मुलांना मूल राहू देत नाही.त्यामुळे आपण मुलांना कुठली गोष्ट कधी देतो आहोत, याचा सुज्ञ विचार पालकांनी केला पाहिजे.गेमिंग गॅजेट्स देताना गेम खेळण्याची आवड कधी व्यसनात बदलू शकेल, हा धोका पालक म्हणून आपण ओळखायला हवा‧
२.फोन देताना नियम ठरवा: कोरोनामुळे लहान वयात मुलांना मोबाइल देण्याचे प्रमाण अचानक वाढले.गरज म्हणून मुलांना फोन दिला तरी अशा वेळी काही नियम करणे आणि ते काटेकोरपणे पाळले जात आहेत ना, हे बघायला हवे.मुलांना नियम लावताना काही नियम हे संपूर्ण कुटुंबासाठी असणे आवश्यक आहे.जेणेकरून मुले ते नियम पाळण्याच्या मानसिकतेत येतील.उदा.जेवताना किंवा रात्री झोपताना फोन वापरायचा नाही.असे काही नियम जर साऱ्या कुटुंबीयांनी पाळले तर मुलेही या नियमाचे अनुकरण करू लागतील.नाहीतर नियमांवरून घरात वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.कारण लहान असो वा मोठे; सगळेच मोबाइलच्या स्क्रीनला सतत चिकटलेले दिसतात‧
३.आपल्या मर्यादा काय?: हा विषय मुलांशी बोलणे अत्यावश्यक आहे.ऑनलाइन जगात अनेक प्रलोभने असतात, विविध प्रकारचे घातक ट्रेंड्स सुरू असतात, त्यात सहभागी व्हायचे की नाही, प्रलोभनांना बळी पडायचे की नाही याची चर्चा फोन देतानाच झाली पाहिजे.प्रत्येकाला आपल्या मर्यादा माहीत असायला हव्यात.आपली सीमारेषा मुलांना आखता आली पाहिजे आणि त्यासाठी पालकांनी मुलांना मदत केली पाहिजे.
४.परवानगीविषयी बोला: ‘कन्सेंट’ किंवा परवानगी हा विषय मुलांशी बोलणे अत्यावश्यक आहे.याची सुरुवात पालकांनी स्वतःपासून केली पाहिजे.मुलांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना मुलांची परवानगी विचारली पाहिजे.त्यांनी शेअरिंगला परवानगी दिली तरच फोटो शेअर केले पाहिजे.असे केल्यामुळे आपोआप मुलांना परवानगी हा विषय लक्षात येतो आणि इतरांकडून जर त्यांच्या वैयक्तिक खासगी माहितीचे उल्लंघन होत असेल, तर मुले ‘अलर्ट’ होऊन वेळीच त्या विरोधात बोलू शकतात.
५.सकारात्मक, योग्य आणि समतोल वापर: मुलांनी मोबाइलचा वापर चांगल्या गोष्टींसाठी, योग्य पद्धतीने आणि त्याचे विपरीत परिणाम टाळून करावा असे वाटत असेल तर त्यांच्याशी याविषयी सातत्याने बोलणे आवश्यक आहे.त्या त्या वयात जे समजेल त्या पद्धतीने गोष्टी त्यांना समजावून देता आल्या पाहिजेत.मुले सतत फोन वापरतात म्हणून त्यांचा अभ्यास होत नाही, मग चांगले गुण मिळत नाहीत, कमी गुण मिळाले की आपण रागावतो असे करण्यापेक्षा मूल जेव्हा जास्त मोबाइल वापरत आहे हे लक्षात येते तिथेच त्याच्याशी संवादाला सुरुवात केली पाहिजे.एकदा बोलून ही गोष्ट होऊ शकत नाही, वेळोवेळी निरनिराळ्या पद्धतीने त्यांना या गोष्टींची जाणीव करून द्यायला हवी.हा संवाद मित्रत्वाचा असावा.सूचना देणारा आणि सतत सल्ले देणारा संवाद मुलांना आवडत नाही.त्यामुळे मुलांना समजून घेऊन, त्यांच्या गरजांचा विचार करून संवाद साधण्याचा प्रयत्न झाला तर मुले आईबाबा काय सांगत आहेत हे ऐकण्याच्या मनःस्थितीत येतात.
६.ऑनलाइन जगातील धोके: मुलांना ऑनलाइन जगातले धोके माहीत असले पाहिजेत.तिथे काय करायचे आणि काय टाळायचे हेही त्यांना माहीत असले पाहिजे.सायबर गुन्हेगार मुलांपर्यंत पोहोचत आहेत.त्यामुळे इंटरनेटच्या जगात वावरताना त्या जगाने काय अपाय होऊ शकतो, याबद्दल मुले जागरूक असली पाहिजेत.
डिजिटल युगातील हे पालकत्व निभावताना पालकांची कसोटी नक्कीच लागू शकते.पण तरीही मुलांच्या आणि पर्यायाने आपल्या कुटुंबाच्या भविष्याचा विचार करता हे आव्हान यशस्वीपणे पेलायला हवे!
अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
मुक्ता चैतन्य
(लेखिका माणूस आणि तंत्रज्ञान यांच्या परस्परसंबंधांच्या अभ्यासक असून ‘सायबर मैत्र’ या संस्थेच्या सहसंस्थापक आहेत‧)
