बहुगुणी हिंग
कढईतले तेल गरम झाले की त्यात मोहरी, जिरे टाकले, ते तडतडले की हिंग. जिरे-मोहरी आणि हिंग घालून केलेली फोडणी ही भारतीय पदार्थांची खासियत म्हणावी लागेल. उत्तर भारतापासून दक्षिण भारतातल्या गृहिणी वर्षानुवर्षांच्या सरावाने अशीच फोडणी देतात. बहुसंख्य भारतीय पदार्थ फोडणीशिवाय अपूर्णच म्हणावे लागतील किंवा त्याशिवाय पदार्थाला चव येत नाही. याच फोडणीतील एक महत्त्वाचा घटक म्हणजे हिंग.
भारतात मसाल्याच्या डब्यामध्ये हमखास आढळणारा हा जिन्नस ‘फेरुला फोइटिडा’ या वनस्पतीच्या मुळाचा रस सुकवून त्यापासून बनवला जातो. हिंगाची लागवड प्रामुख्याने मध्य आशिया आणि विशेषतः पश्चिम अफगाणिस्तान, तुर्की, इराक, पूर्व इराण आणि उत्तर आफ्रिकेमध्ये केली जाते. हिंगाला एक उग्र वास असतो. त्याची चव घेतल्यास ती तिखट असल्याचे जाणवते. मुळाच्या रसापासून ते आपल्याला मिळणारा पावडर हिंग बनवण्याची प्रक्रिया वेळखाऊ आहेच परंतु त्यामागे मोठी मेहनतही आहे. स्वयंपाकातील फोडणीबरोबर हिंगाचे इतरही बरेच उपयोग आहेत. आयुर्वेदात औषधी वनस्पती म्हणून हिंगाचा उल्लेख आढळतो. हिंग पाचक असल्याने पोटाच्या तक्रारींसाठी हिंगाचा वापर केला जातो.खडे हिंग, हिंगाची पावडर आणि हिंगाचे पाणी करूनही वापरले जाते.
* हिंग आणि जिऱ्याचा वापर करून हिंग गोळी बनवली जाते. पचनक्रिया सुधारण्यासाठी हिंग गोळी खाल्ली जाते.
* लहान मुलांच्या पोटात गॅस धरला असेल किंवा पोट दुखत असेल तर हिंगाचा खडा उगाळून त्यात थोडे पाणी टाकून कोमट करून ते लहान मुलांच्या नाभीभोवती हलक्या हाताने चोळावे, ज्यामुळे पोटातील गॅस कमी होऊन आराम मिळतो. (लहान मुलांना किंवा स्तनदा मातांनी हिंग खाणे टाळावे, असे आयुर्वेदात म्हटले आहे.)
* वात आणि पित्त दोषामुळे अनेकदा शरीरात वायू तयार होतो. शरीरातील हा गॅस काढण्यासाठी पाव चमचा तुपात एक ते दोन चिमूट हिंग तळून, ग्लासभर ताकातून सेवन करावा. हे ताक जेवणानंतर प्यावे. जेवणानंतर एक ग्लास कोमट पाण्यात चिमूटभर हिंग टाकून प्यायल्यानेही पोटात झालेला गॅस कमी होतो.
* पोट फुगण्याची समस्या दूर करण्यासाठी हिंगाचा चहा उपयुक्त आहे. यासाठी एक कप गरम पाण्यात पाव चमचा सुंठ, खडे मीठ आणि चिमूटभर हिंग मिसळून घ्या. याच्या सेवनाने पोट दुखण्यापासून आराम मिळेल. पोटदुखी किंवा अपचन झाले असेल तर ओवा, मीठ आणि एक चिमूटभर हिंग खावे. याने त्वरित बरे वाटते.
* अपचन झाले असेल तर एक चमचा सुंठ, एक चमचा काळीमिरी, कढीपत्ता, एक चमचा ओवा आणि एक चमचा जिरे एकत्र वाटून त्याची बारीक पूड करा. एक चमचा तिळाच्या तेलामध्ये एक चिमूटभर हिंग भाजून या पूडमध्ये एकत्र करा. शेवटी थोडे काळे मीठ मिसळा. हे चूर्ण भाताबरोबर खाल्ल्यास अपचन कमी होऊन आराम मिळेल.
* रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठीही हिंगाचे पाणी फायदेशीर ठरते. एक ग्लास कोमट पाण्यात चिमूटभर हिंग टाकून रिकाम्या पोटी हे पाणी प्यायल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो.
* हिंग शरीरातील रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतो.
* मासिक पाळीच्या तीव्र वेदनांमध्ये हिंगाचे पाणी किंवा ताक प्यायल्याने आराम मिळतो. मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या शारीरिक वेदना दूर करण्यासाठी गरम तव्यावर ओवा भाजून घ्या. ओवा भाजत असतानाच त्यावर चिमूटभर हिंग टाका. हिंग आणि ओव्याचे मिश्रण तयार करून एक ग्लास ताकामध्ये मिसळा. या ताकामध्ये एक चमचा मेथी पूड आणि काळे मीठ टाकून नीट ढवळून प्यावे. यामुळे मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या समस्या कमी होण्यास मदत होते.
* हिंगाला अँटिडिप्रेसेंट म्हणूनही ओळखले जाते. मूड सुधारणे आणि उदासीन विचारांना दूर ठेवण्यासाठी आहारात हिंगाचा नियमित वापर करावा. यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते.
* तीव्र डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास होत असेल तर दररोज सकाळी रिकाम्या पोटी चिमूटभर हिंगाचे सेवन करावे. त्यावर अर्धा कप कोमट पाणी प्यावे, डोकेदुखीपासून आराम मिळतो.
* हिंगाचे पाणी सौम्य सर्दी आणि खोकल्याच्या लक्षणांवर थोडा आराम देऊ शकते. हिंगामध्ये कफ पाडणारे गुणधर्म आहेत. हिंगाचे कोमट पाणी प्यायल्यास, कफ सुटून घसा मोकळा होतो. हिंगाचे दाहकविरोधी गुणधर्म घशातील जळजळ कमी करण्यास मदत करतात.
* ब्राँकायटीसवर (दमा) हिंग उपयुक्त ठरते. एक किंवा दोन चिमूट हिंग पावडर अर्धा चमचा तुपात तळून घ्या. त्यात अर्धा चमचा मध मिसळा. जेवणानंतर दिवसातून एक-दोनदा हे चाटण घ्यावे.
* हिरड्यातून रक्तस्राव होत असल्यास किंवा दात किडला असल्यास एक कप पाण्यात हिंगाचा एक छोटा तुकडा आणि एक लवंग उकळवा. हे पाणी कोमट झाल्यावर त्याने गुळण्या केल्यास आराम मिळतो.
* सतत वाढणाऱ्या वजनाला आटोक्यात आणण्यासाठी सकाळी हिंगाचे पाणी प्यावे.
* तारुण्यपीटिकांवर हिंगाचा फेसपॅक प्रभावी उपाय आहे. यासाठी एका वाटीत दोन चमचे मुलतानी माती, एक चमचा मध, चिमूटभर हिंग, एक चमचा गुलाबपाणी एकत्र करावे. हा फेसपॅक चेहऱ्यावर लावून सुकू द्यावा. नंतर थंड पाण्याने चेहरा धुऊन घ्या. या उपायाने त्वचेवरील काळे डाग आणि कोरडेपणा कमी होऊन त्वचा चमकदार होते.
* केसांच्या कंडिशनिंगसाठी हिंगाचा वापर उपयुक्त ठरतो. त्यासाठी एका भांड्यात दोन चमचे दही, एक चमचा बदामाचे तेल आणि ग्रीन टी अर्क एकत्र करून चांगले मिसळा. मिश्रणात थोडा पावडर हिंग घालून चांगले फेटून घ्या. ही पेस्ट केसांच्या मुळांवर आणि संपूर्ण केसांवर लावून तासभर तशीच ठेवा. सौम्य शाम्पूने केस स्वच्छ धुवा, केस मऊ आणि चमकदार होतील.
* हिंगाचा वापर मधमाशी आणि इतर कीटकांच्या डंखावर उपचार करण्यासाठी केला जातो. हिंगाचा खडा उगाळून डंख केलेल्या ठिकाणी लावा, त्यामुळे दाह कमी होतो.
हिंगाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, परंतु ते मर्यादित प्रमाणात सेवन केले तरच. हिंगाचा मर्यादित वापरच त्याला बहुगुणी बनवतो अन्यथा त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. चूर्ण, कॅप्सूल, गोळ्यांच्या स्वरूपातही हिंग बाजारात उपलब्ध आहेत. मात्र, त्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्याव्यात.
अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
रश्मी विरेन
