मन करा रे प्रसन्न!

डिप्रेशन बद्दल आपण सहजपणे बोलत असतो. एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडली, मनाला झोंबली जसे की कुणाशी भांडण झाले, परीक्षेत कमी गुण मिळाले, खूप प्रयत्न करूनही अपयश आले, प्रेमभंग झाला. जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर मन जणू काळोखात गडप होते. डोळे भरून येतात, काही सुचत नाही. हे औदासीन्य आपल्या सर्वाच्या आयुष्याचा भाग आहे. पण हे नॉर्मल आहे का? होय. एका मर्यादित सीमारेषेपर्यंत जीवनातल्या या दुःखद घटना आपल्याला काही काळासाठी नामोहरम करतात. मन भरून येते. पण नंतर आपण पुन्हा एकदा कार्यतत्पर होतो. आपला जीवनक्रम चालूच राहतो. आपण जगरहाटीला खऱ्या अर्थाने सामोरे जातो. ‘ जगण्यात खरोखर जग जगते, ‘ या उक्तीवर आपण विश्वास ठेवतो. सगळ्या वाईट-दुःखी गोष्टींना, परिस्थितीला मागे टाकून आपण मोठ्या आशेने भविष्याला सामोरे जातो.

भारतात मानसिक आजाराची मर्यादा ही वेडेपणा, पागलपन एवढीच मानली जाते, पण मानसिक आरोग्याच्या समस्या यापेक्षा कमी तीव्रतेच्या असतात. उदा., औदासीन्य, चिंता वगैरे यात माणूस शहाणा आहे, पण त्याचा मानसिक विकार त्याचे जगणे मुश्कील करतो हे खरे. निराशेचा आजार किंवा डिप्रेशन ही तशी एक समस्या आहे. डॉक्टरी भाषेत औदासीन्य हे एखाद्या पुरासारखे आहे की ज्यामुळे माणसाची आनंद अनुभवायची क्षमता, विधायकता वाहून जाते. आयुष्य जणू एका काळ्या ढगाने व्यापून जाते. मग व्यक्तीची सारासार विचार करायची क्षमता, जगण्याची ऊर्जाच नष्ट व्हायला लागते. भविष्य धूसर दिसायला लागते. सगळेच कसे निरर्थक वाटायला लागते.

डिप्रेशनचा सामना कसा करावा, हे ठरविण्यापूर्वी आपल्याला ते कसे ओळखायचे हे समजले पाहिजे. डिप्रेशन म्हणजे व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा दोष नव्हे किंवा त्यांची विकलताही नव्हे. तो इतर शारीरिक आजारांसारखाच आजार आहे. डिप्रेशनची लक्षणे विविध प्रकारची आहेत.

डिप्रेशनची प्रमुख तीन कारणे:

  1. मन उदास होणे.
  2. आंतरिक ऊर्जा कमी होणे.
  3. आयुष्य निरस वाटणे.

मानसिक दृष्टिकोनातून पाहिले तर व्यक्तीला असहाय्य वाटते, आपण निरर्थक आहोत आणि निरुपयोगी आहोत असे वाटते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या आयुष्यात पुढे काही चांगले होणार नाही अशी घोर निराशा त्यांना वाटते. यामुळेच औदासीन्याच्या आजारात आपल्याला आत्महत्या अधिक पाहावयास मिळतात. त्यांना चुकचुकल्यासारखे वाटते. आपण कुणाला दुखावले, असे उगाचच वाटते.

डिप्रेशन व शारीरिक लक्षणे:

  • झोप न येणे
  • सकाळी खूप लवकर जाग येणे
  • सकाळपासूनच आयुष्यात काही रस नाही असे वाटणे
  • भूक न लागणे
  • वजन कमी होणे
  • थकवा वाटणे

डिप्रेशन मध्ये तसे पाहिले तर वागण्या – बोलण्यात व्यक्ती खूप मंदावते, पण काही वेळा काही व्यक्तीमध्ये प्रचंड चलबिचल आढळते. सतत येरझाऱ्या घालतात. एका जागेवर बसावेसे वाटत नाही. अतिशय चपळ, खेळकर आनंदी असलेल्या व्यक्तीमध्ये अशा प्रकारचे बदल जर दोन – तीन आठवड्यांपेक्षा अधिक काळ राहिले तर आपण डिप्रेशन आहे की नाही हे तपासून पाहिले पाहिजेच. डिप्रेशनमुळे येणारी अक्षमता प्रचंड आहे. यामुळेच जगातल्या दहा मुख्य आजारांमध्ये डिप्रेशन हा आजार गणला जातो.

जगात डिप्रेशन हा मानसिक आजारांमधला सर्वात जास्त प्रमाणात आढळणारा आजार आहे. जागतिक अंदाजाप्रमाणे १० ते २१ टक्के लोकांना हा आजार आढळतो. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये हा आजार दुपटीपेक्षा जास्त आढळतो. तसे पाहिले तर स्त्रियांमध्ये हा आजार पहिल्या क्रमांकावर आहे असे म्हटले तरी अयोग्य ठरणार नाही. पण स्त्रियांचे रडणे वा आजाराची सतत तक्रार करणे गृहीत धरले जाते. त्या खूप काम करतात म्हणून थकतात. त्याना समस्यांशी दोन हात करता येत नाही, म्हणून त्या रडतात व चिडचिड करतात. या सामाजिक गैरसमजाने स्त्रियांना डिप्रेशनची ट्रीटमेंट घ्यायचा सल्ला कुणी देत नाही. किंबहुना, त्यांना पण ” आपण केवळ भावूक आहोत, संवेदनशील आहोत म्हणून खूप रडत राहतो एवढेच, कामांमुळे थकतो म्हणून झोप येत नाही इतकेच. ” असे वाटते. समाजाचा आणि विशेषत: स्त्रियांचा हा समज खरेच चुकीचा व दुर्दैवी आहे.

कॅन्सरसारख्या आजारात बऱ्याच रुग्णांना घोर निराशा येते. याच्या अगदी विरुद्ध बऱ्याच रुग्णांना शारीरिक लक्षणे सांगायची सवय असते जसे की थकवा वाटतो, पोट दुखते, डोके दुखते, अंगात शिरशिरी येते वगैरे. या शारीरिक दुखण्यामागे शारीरिक आजार असत नाही. पण ही निराशेची शारीरिक भाषा असते. ती समजून घेणे खूप आवश्यक आहे. रुग्णालाही हा शारीरिक आजार नसून डिप्रेशन आहे, याची जाणीव करून द्यावी जेणेकरून त्याची याविषयीची चिंता कमी होईल.

डिप्रेशनचे उपचार असतात का?

अगदी सकारात्मक उत्तर व प्रामाणिक उत्तर द्यायचे म्हणजे  ‘ होय ‘. म्हणूनच लोकांनी डिप्रेशनच्या आजाराचे गुलाम का व्हावे, असा प्रश्न पडतो. कारण आजार उपचार देऊन ठीक करता येण्यासारखा आहे. असमतोल रसायनांची समतोलता साधण्यासाठी विशेष प्रकारच्या अँटीडिप्रेसटच्या गोळ्या या योग्य प्रमाणात द्यायच्या असतात. अर्थात या गोळ्या आज खाल्ल्या आणि उद्या व्यक्ती प्रफुल्लित झाली असे होत नाही. मजासंस्थेतील रसायनांवर परिणाम व्हायला साधारणत: सहा आठवडे लागतात. त्यानंतर डिप्रेशन पहिल्यांदाच आहे का, दीर्घकालीन आहे का किंवा पुन्हा परत आले आहे याचे विश्लेषण करून गोळ्या किती अवधीसाठी द्यायच्या हे ठरवावे लागते. कधी दोन वर्षे, पाच वर्षे वा जीवनभर घ्यावयास लागते. घाबरायचे कारण नाही आपण डायबिटिस किंवा उच्च रक्तदाबासाठी आयुष्यभर उपचार घेतो. आपली स्वप्नपूर्ती करतो, ध्येयशिखर गाठतो तसेच डिप्रेशनम ध्येसुद्धा आपण सगळे सा ध्य करू शकतो. याशिवाय विविध मानसोपचार पद्धती आहेत, त्या व्यक्तीच्या औदासीन्याशी निगडित असलेल्या नकारात्मक विचारांवर मात कशी मिळवायची हे शिकवितात. ‘ मन चिंती ते वैरी न चिंती ‘ ही उक्ती उदासीन मनाच्या बाबतीत उचित आहे. या व्यक्ती नकारात्मक दु : खी विचारांच्या गर्तेत खोलवर रुततात. अशा वेळी त्यांना  ‘ आधी रात का मेहमा है अंधेरा ‘ हे समजावून सांगत प्रकाशाच्या वाटेवर उभे करण्यासाठी सी. बी. टी. व आर. ई. टी. सारख्या मानसिक थेरपीचा सुंदर उपयोग होतो. डिप्रेशनच्या आधारात कुटुंबाचा आधार व मित्रमंडळींचा आधार खूप मोलाचा आहे. यामध्ये व्यक्ती एकटी पडत नाही, यामुळे बावरून जात नाही. उदासीनतेच्या विचारांशी सामना करायचे बळ त्यांना सग्यासोयऱ्यांच्या प्रेमातूनच मिळत असते. त्यांचे जीवन काळोखी डोहात न डबता प्रसन्नतेच्या आकाशात उडू लागते, म्हणूनच आपण या सर्व मित्रमंडळींना सांगायचे असते की ‘ मन करा रे प्रसन्न… ‘

 मन: शांतीसाठी सोपे उपाय:

  • मार्गदर्शकाची मदत घेऊन अथवा ध्वनिमुद्रित मंत्रांची सीडी ऐकून दिवसाची सुरुवात करा. मनाच्या एकतानतेमुळे मन शांत होण्यास मदत होईल.
  • आसपास घडणाऱ्या सकारात्मक घटनांविषयी विशेष जागृत राहून त्यांचा दैनंदिन जीवनात उपयोग करता येईल किंवा कसे हे ठरवावे. आवडीचा सुगंध, आवाज, संगीत, वस्त्र यांमुळे देखील मानसिक शांतता मिळून मन उल्हसित होते.
  • विशिष्ट मंत्रोच्चारांमुळे अथवा पठणामुळे हळूहळू चित्तवृत्ती प्रफुल्लित होऊ लागतात. ताणतणाव, नैराश्य, औदासीन्य विसरण्यास मदत होते. दैनंदिन धावपळीतून स्वत : साठी वेळ काढून एखादे आवडीचे नाटक, संगीत, सिनेमा यांसारख्या विरंगुळ्याच्या क्षणांचा जरूर अनुभव घ्यावा.
  • प्रार्थनेमुळे मन शुद्ध होण्यास मदत होते. नियमितपणे विशिष्ट वेळी विशिष्ट प्रार्थना म्हटल्यामुळे आत्मिक समाधानाची अनुभूती होते.

दीर्घ श्वास

दैनंदिन धावपळीत आपण श्वासही अर्धवट घेतो परिणामी अनेक विकार अथवा व्याधी कायमस्वरूपी येऊन चिकटतात. औदासीन्यासारख्या कोणत्याही मानसिक विकारात दीर्घ श्वास घेत राहिल्यास रक्ताभिसरणाच्या प्रक्रियेवर याचा चांगला परिणाम होतो. त्यामुळे छातीवर येणारे दडपण व सतत होणारी धडधड नक्कीच कमी होते.

One comment

  1. janrao premdas khandare

    If you apply the mediation tech that is ” vipassana ” so many depression it definitely gone. so that please give your 10 days for the vipassana.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.