हिरव्या पालेभाज्यांचे आहारातील महत्त्व

Published by Dr. Sarika Satav on   August 6, 2018 in   Health Mantra

हिरव्या पालेभाज्या – आरोग्य सुधारण्यासाठी वापरता येऊ शकणाऱ्या पदार्थांमध्ये अग्रगण्य अशा हिरव्या पालेभाज्या आहेत. रोजच्या आहारामध्ये वापरता येऊ शकणाऱ्या व भरपूर जीवनसत्त्वांचा स्त्रोत म्हणजे हिरव्या पालेभाज्या. या पालेभाज्या आबालवृद्धांसाठी हितकारक व आरोग्यवर्धक ठरतात.
सर्वसाधारणपणे हिरव्या पालेभाज्या या कमी कॅलरीज असलेल्या, पण त्यांच्यामध्ये प्रोटीन, तंतुमय पदार्थ, ‘ क ‘ जीवनसत्त्व, फोलिक अॅसिड, कॅल्शियम इ. जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात आढळतात.
कॅन्सर, डायबिटीस, अॅनिमिया, संधिवात, नेत्रविकार, हृदयविकार, कोलेस्टरॉलच्या तक्रारी इ. अनेक आजारांमध्ये या हिरव्या पालेभाज्यांचा वापर अतिशय चांगल्या प्रकारे करता येतो.
पालक, मेथी, शेपू चवळी, कोथिंबीर, पुदिना, मुळ्याची पाने, राजगिरा भाजी, आंबाडा, आंबट चुका, गाजराची पाने, फ्लॉवरची पाने, कोबी, अळूची पाने, कढीपत्ता, मोहरीची पाने, सेलेरी, सॅलड इ. अनेक भाज्या या गटात येतात.

हिरव्या पालेभाज्या अत्यंत उपयुक्त –
(१) अॅनिमिया – रक्ताचे प्रमाण कमी असणाऱ्यांना हिरव्या पालेभाज्या खाणे अत्यंत उपयुक्त आहे. व्हिटॅमिन ‘ बी ‘व’ ए ‘जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्याने हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढण्यास मदत मिळते. शिवाय लोहाचे प्रमाणही जास्त असते. इतर जीवनसत्त्वांमुळे लोह शोषण्यास मदत होते.

(२) स्थौल्य – तंतुमय पदार्थांचे  प्रमाण भरपूर असल्याने शरीरातील चरबी घटण्यास मदत होते. ज्यांचे वजन जास्त आहे अशा व्यक्तींनी हिरव्या पालेभाज्या वारंवार व भरपूर प्रमाणात खाल्याने भरपूर जीवनसत्त्वे मिळतात, पोटही भरते व वजनसुद्धा कमी होते. कॅलरीज खूप कमी असतात.

(३) मलावष्टभ – तंतुमय पदार्थांचे प्रमाण जास्त असल्याने हे तंतुमय पदार्थ पाणी धरून ठेवतात व संडासला कडक न होता मऊ होते. त्यामुळे ज्यांना मलावष्टभाचा त्रास आहे त्यांनी नियमितपणे हिरव्या पालेभाज्यांचा अंतर्भाव रोजच्या जेवणात करावा.

(४) कावीळ – उन्हाळा, पावसाळा इ. ऋतूंमध्ये पाणी/अन्न होणाऱ्या जंतुसंसर्गामुळे काविळीचे रुग्ण वाढतात. अशा रुग्णांना हिरव्या पालेभाज्या अत्यंत उपयुक्त आहेत. भाज्यांचे सूप किंवा कमी तेलामध्ये बनविलेली भाजी यामुळे रुग्णांना बरीच मदत होते.

(५) मधुमेह – मधुमेहाच्या रुग्णांना हिरव्या पालेभाज्या एक वरदानच आहे. भरपूर जीवनसत्त्वांचा स्त्रोत आहे. त्याशिवाय तंतुमय पदार्थही भरपूर प्रमाणात मिळतात. तंतुमय पदार्थ भरपूर मिळाल्याने जेवणानंतर वाढणारी रक्तातील साखर बऱ्यापैकी नियंत्रणात राहते. मधुमेहींना मलावष्टभाचा त्रास होऊ शकतो. तो त्रासही हिरव्या पालेभाज्या नियमित खाल्याने कमी होऊ शकतो.

(६) उच्च रक्तदाब व हृदयाचे विकार – शरीरात अतिरिक्त प्रमाणात ऊर्जा व चरबी साठल्याने रक्तवाहिन्यांमध्येही ती चरबी साठून हृदयविकाराची भीती बळावते. हिरव्या पालेभाज्या नियमित खाल्याने शरीरामध्ये चरबी साठण्याचे प्रमाण कमी होते शिवाय रक्तातही चरबी कमी होते. परिणामी  रक्तदाब व हृदयविकारामध्ये हिरव्या पालेभाज्या अत्यंत उपयुक्त आहेत.

(७) हाडांचे आरोग्य – हिरव्या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन ‘ सी ‘चे प्रमाण जास्त असल्याने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असल्याने हाडांचे आरोग्य चांगले राहते. हिरव्या पालेभाज्यांमध्ये ऑक्झॅॅलिक अॅसिड असल्याने बऱ्याच वेळेला कॅल्शियम शरीरात पूर्णपणे शोषले जात नाही पण व्हिटॅमिन सी मुळे ऑस्टिओकॅन्सिन नावाचे प्रोटीन चांगल्या प्रमाणात तयार होते जे हाडांच्या आरोग्यासाठी चांगले आहे.

(८) डोळ्यांचे आरोग्य – हिरव्या पालेभाज्यांमध्ये असलेले ल्युटिन डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी मदत करतात. मोतीबिंदू वयोमानानुसार डोळ्यांत होणारे बदल इ. मध्ये हिरव्या पालेभाज्या अत्यंत उपयुक्त आहेत. व्हिटॅमिन ‘ ए ‘च्या कमतरतेमुळे होणाऱ्या रातांधळेपणापासून बचाव होतो.

(९) गर्भिणी – फोलिक अॅसिड या जीवनसत्त्वाची गर्भिणी अवस्थेतील पहिल्या ३ महिन्यांमध्ये खूप गरज असते. जे बाळाच्या मेंदूच्या वाढीसाठी आवश्यक असते. हिरव्या पालेभाज्यांमधून फोलिक अॅसिड भरपूर प्रमाणात मिळते. शिवाय व्हिटॅमिन ‘ ए ‘, व्हिटॅमिन ‘ सी’, लोह आणि इतर अनेक जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असल्याने गर्भिणी अवस्थेतील उपयुक्त आहार म्हणून आहे.

हिरव्या भाज्या वर्ज्य

(१) जुलाब ( आत्ययिक अवस्था) – जुलाब होत असताना हिरव्या भाज्या खाऊ नयेत, कारण त्यातील रेषा व तंतुमय पदार्थांमुळे जुलाब आणखी वाढण्याची शक्यता असते. जुलाब बंद झाल्यानंतर पुन्हा लगेच सुरू करावे.

(२) अतिसार – आत्ययिक अवस्था असताना जुलाबाचे प्रमाण जास्त असते शिवाय मोठ्या आतड्याला अल्सर असतात. रेषा, तंतुमय पदार्थांमुळे जुलाबाचे प्रमाण वाढू शकते. शिवाय अल्सरमधून रक्तस्त्राव होऊ शकतो म्हणून आत्ययिक अवस्थेत हिरव्या पालेभाज्या खाऊ नयेत.

(३) रक्त पातळ होण्यासाठी औषधे घेत असल्यास – वार्फ! अॅसिट्रोम नावाची औषधे बऱ्याच पेशंटला रक्त पातळ होण्यासाठी वापरली जातात. या औषधांच्या कार्याला व्हिटॅमिन ‘ के ‘ जास्त असणाऱ्या पदार्थांमुळे अडथळा निर्माण होतो. हिरव्या पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन ‘ के ‘चे प्रमाण जास्त असते. त्यामुळे वरील औषधे घेत असणाऱ्या रुग्णांनी हिरव्या पालेभाज्या वर्ज्य कराव्यात किंवा खूप कमी प्रमाणात खाव्यात.

(४) मुतखडा – मूत्रपिंडाचे काम ज्या रुग्णामध्ये कमी झालेले आहे अशा रुग्णांना पोटॅशिअम ज्या पदार्थांमध्ये जास्त आहे अशा पदार्थांमुळे शरीरातील पोटॅशिअम वाढत जाते, कारण विकृत मूत्रपिंड हे वाढलेले पोटॅशिअम बाहेर काढू शकत नाही व ते शरीरात साठत राहते म्हणून अशा रुग्णांमध्ये हिरव्या पालेभाज्यांचे प्रमाण कमी द्यावे किंवा भाजी बनविताना वेगळ्या पद्धतीने बनवावी.

(५) किडनी स्टोन – ज्यांना किडनी स्टोन वारंवार होतात किंवा होऊन गेले आहेत त्यांनी पालक कमी प्रमाणात खावा.