सुरक्षित मातृत्व आणि आयुर्वेद

गर्भवती स्त्री स्वतःबरोबर बाळाचेही पोषण करीत असते. त्यामुळे तिच्यावर दोघांच्या आरोग्याची जबाबदारी असते. त्या दृष्टीने ‘ आयुर्वेद ‘ या प्राचीन चिकित्साशास्त्रात सुप्रजननावर विशेष भर देण्यात आला आहे.

गर्भवती स्त्री ज्या वातावरणात राहते, जो आहार घेते, त्या काळात ती ज्या ताणतणावातून जात असते, जी औषधे घेते ह्या सगळ्यांचे बरे – वाईट परिणाम तिच्या होणाऱ्या बाळावर होत असतात. हे परिणाम कधी जन्मत:च दिसून येतात, तर कधी त्याच्या भविष्याच्या आजारातून ते प्रकट होतात. अनेकविध लढाया लढत बाळाला जन्माला घालण्याचे दिव्य माता करत असते, तेव्हा गर्भधारणेच्या काळात मातेने स्वत:ला कसे जपायला पाहिजे ह्याचा विचार तिच्या कुटुंबानेही करायला हवा.

पूर्वी जनजीवन निसर्गाशी एकरूप होते. त्यामुळे स्त्री पुरुष निसर्गाशी लयबद्ध जीवन व्यतीत करीत. तेव्हा सुप्रजननासाठी वेगळ्या मार्गदर्शनाची गरज नव्हती. अलीकडच्या काळात विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगती, विभक्त कुटुंब पद्धतीमुळे व्यक्तीनिष्ठ जगण्यास महत्त्व प्राप्त झाले आहे. परिणामी आज गर्भधारणा हीच मुळी अवघड बाब बनत चालली आहे. ती सुखकर आणि सुरक्षित करण्यासाठीच आयुर्वेदाचा अंगीकार करणे गरजेचे बनले आहे. सुप्रजननासाठी महर्षी चरक यांनी गर्भिणी परिचर्येला महत्व दिले आहे. गर्भिणी परिचर्येमुळे उत्तम रोगप्रतिकारकशक्ती निर्माण होऊन सद्‌गुणी व मेधावी अपत्यप्राप्ती होते.

सुप्रजननासाठी गर्भवती स्त्रीच्या जीवनशैलीचे नियोजन असणे आवश्यक आहे. ह्याम ध्ये सामान्य दिनचर्या,  ऋतुचर्या अंतर्भूत आहे. परिचर्येची सुरुवात ब्राम्ह मुहूर्तापासून अपेक्षित आहे. कारण ह्या काळात विविध प्रकारची उपयुक्त संप्रेरके शरीरामध्ये निर्माण होत असतात. आयुर्वेद तज्ज्ञांनी गर्भ गर्भाशयात २८० दिवस कसा वाढतो ह्या संदर्भातील विवेचन केलेले आहे. गर्भपोषण आणि मातृपोषण हा परिचर्येचा गाभा आहे. गर्भिणी परिचर्येत वापरण्यात येणाऱ्या औषधींमुळे १० महिन्यांच्या काळात कुठल्याही प्रकारचा त्रास झालेला नाही. गर्भविकासासाठी १० महिन्यांचा औषधोपचार संकल्प पहिल्या महिन्यापासून केल्यास गर्भाचे योग्य पोषण होऊन गर्भिणीचे बल टिकून राहते. याठिकाणी प्रथम आपण महर्षी चरक व आचार्य सुश्रुत यांनी सुचविलेल्या गर्भिणी परीचर्येचा संक्षिप्त मागोवा घेऊ.

  1. पहिल्या महिन्यामध्ये देशी गायीचे ताजे दूध व मधुर, शीत द्रव आहार घ्यावा. ह्यामध्ये गरम पोळी, दूध, साजूक तूप, भाज्या घातलेला पराठा, शिरा, कणीक किंवा नारळ घातलेल्या करंज्या असा आहार घ्यावा.
  2. दुसऱ्या महिन्यात मधुर औषधांनी सिद्ध केलेले देशी गायीचे दूध प्यावे. वातदोषांचा प्रकोप करणारा आहार ( वांगी, मोड आलेली कडधान्ये, बटाटे इ.) घेऊ नये. आहारामध्ये दूध, तूप, मध, लोणी, साखर यांचा समावेश करावा.
  3. तिसऱ्या महिन्यापासून सहावा महिना पूर्ण होईपर्यंत गर्भिणीस हेमप्राश ६ थेंब रोज सकाळी द्यावेत. ह्याने गर्भाच्या ज्ञानेंद्रियांची क्षमता व बालकाची रोगप्रतिकार क्षमता वाढते.
  4. लोणी दुधाचे पदार्थ व ताजे दही- भात खाण्यास हरकत नाही. देशी गायींच्या दुधापासून काढलेले लोणी शक्य झाल्यास खावे. जर्सी गायीचे दूध व त्यापासून केलेले पदार्थ योग्य नाहीत. ह्या काळात डाळिंब हृदयाला पोषक असल्यामुळे तसेच अग्निदीपक असल्यामुळे हितकर आहे.
  5. ‘पंचमे मन: प्रतिबुद्धतरं भवति ।। ‘ पाचव्या महिन्यात बीजरूप मनाचे व्यक्तीकरण होते. रक्तधातू, मांसधातू पुष्ट होतात. त्यामुळे दूध, तुपाचा वापर बंद करू नये. विशेषतः स्त्रिया दूध, तूप सेवनास राजी नसतात. त्यामुळे आचार्यांनी ह्यावर भर दिलेला दिसतो.
  6. ‘षष्ठे बुद्धी: ।। ‘ बुद्धीच्या विकासासाठी सहाव्या महिन्यात औषधी सिद्ध दूध, गोधुर सिद्ध तूप, मुगाचे कढण हमखास वापरावे.
  7. ‘ सप्तमे सर्वांग प्रत्यंग विभाग:।। ‘ मधुर औषधी सिद्ध दूध, तूप तसेच भोजनामध्ये पहिला घास साजूक तूप व भाताचा असावा. ह्या महिन्यात लघवीला आग व जळजळ होऊन संसर्ग होण्याची शक्यता असते म्हणून मीठ कमी खावे. अस्थि पोषणासाठी शतावरी, गुळवेल, शुठी, चंदन वापरावे.
  8. ‘ अष्टमे अस्थिरी भवति ओजः।। ‘ मुगाचे कढण दूधतुपासह तसेच आस्थापन, अनुवासन बस्तीचा वापर तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच करावा.
  9. ‘ नवम दशम एकादश द्वाद्‌शानामू अन्यतम् जायते । अतो अन्यथा विकारी भवति ।। ‘ नवव्या महिन्यात गर्भ सर्वांग प्रत्यंगांनी युक्त होतो. योग्य वेळी रुग्णालयामध्ये जावे.
  10. ‘ नवमे विविधावानि दशमे….।।’ दहावा महिना बालकाच्या आगमनाची चाहूल लावणारा असतो. ह्या महिन्यात उपरोक्त आहार तसाच चालू ठेवावा. ह्या महिन्यात आचार्यांनी विविध अन्न सेवन करण्यास सांगितले आहे. ह्यामध्ये दूध, तूप, इ.नी युक्त आहार सेवन करावा.

प्रसूतीनंतर बाळंतिणीने किमान २ ते ३ महिने सूतिकाभ्यंग तेलाने दररोज स्नानापूर्वी अभ्यंग करावे. गर्भावस्थेत व प्रसूतीदरम्यान पडलेला ताण व धातूंची झीज ह्या अभ्यंगाने लवकर भरून निघते.

पित्याचा सहभाग –

‘ पितृत्व ‘ हे पण स्त्रीमुळे मिळालेले वरदान आहे. त्यामुळे पतीने गरोदरपणात पत्नीची साथ द्यावी. गर्भाची होणारी वाढ बाळाचे वजन व प्राथमिक ज्ञान पित्याला असावे. बाळाचा ७० टक्के विकास गर्भावस्थेत होत असतो. गर्भवतीचा आहार, मानसिक ताणतणाव, प्रदूषण, पर्यावरण इ. चा जनुकावर ठसा उमटतो आणि त्याची अभिव्यक्ती बदलते. हे जनुकीय बदल पुढच्या अनेक पिढ्यांमध्ये आनुवंशिकतेने धारण केले जातात. पोटात वाढणारा गर्भ आपल्या पोषणासाठी सर्वस्वी आई वरच अवलंबून असतो. तिच्याकडून पुरेसे पोषण मिळाले नाही तर अवयवांचे पोषण नीट होत नाही. परिणामी बाळाच्या हृदयाचे ठोके वाढतात. भविष्यात अशा बाळांना मानसिक व्याधीला सामोरे जावे लागते. म्हणून भावी पित्याने गर्भवतीच्या आहाराकडे लक्ष द्यावे. तसेच ती शारीरिक व मानसिकदृष्ट्या आनंदी राहील याची काळजी घ्यावी. संगीतज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अहिरभैरव, कलावती, दीपक, पुरिया, दरबारी कानडा हे राग गर्भवती मातेने ऐकावेत. ह्या रागांवर आधारित गाणी गर्भपोषणासाठी व मनस्वास्थ्यासाठी उपयुक्त ठरतात.

माता – पित्याच्या अशा सजगतेतून, आयुर्वेदीय संस्कारातून जन्माला येणारी भावी पिढी ही निरोगी असेलच, शिवाय निरामय समाज घडविण्यासाठी ती वरदायी ठरणारीच असेल!

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.