ऋतुचक्र व आरोग्य

Published by Kalnirnay on   August 7, 2018 in   2018Health Mantra

” स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणं, आतुरस्य व्याधि परिमोक्षः । ” या तत्त्वावर आधारलेला आयुर्वेद हा रोगपरिमार्जनार्थ चिकित्सा सांगताना रोग होऊच नयेत यासाठी शरीर-मनाच्या आरोग्यरक्षणासाठी दिनचर्या, ऋतुचर्या आदी नियमांचे वर्णन करून जातो. आज समाजात वेगाने पसरत जाणाऱ्या रोगांच्या पार्श्वभूमीवर ऋतुचर्या(ऋतुचक्र व आरोग्य) पालनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

ऋतुचर्या म्हणजे ऋतूनुसार पाळावयाचे आहार-विहारविषयक विशिष्ट नियम. ऋतूनुसार बदलणाऱ्या हवामानामुळे सृष्टीतील सजीव व निर्जीव दोहोंवर अनुकूल व प्रतिकूल परिणाम होत असतात. प्रतिकूल परिणामांपासून स्वत:चे रक्षण करणे व अनुकूल परिणामांनी सुयोग्य आहार-विहाराची जोड देऊन आरोग्य संवर्धन करणे हा ऋतुचर्येचा प्रमुख उद्देश आहे. ऋतुचर्येतील नियमांचे पालन केल्यास आपण त्या त्या ऋतूत उद्‌भवणाऱ्या व्याधींना, तक्रारींना रोखून ठेवू शकतो.

आयुर्वेदाने उन्हाळा-पावसाळा-हिवाळा यांनुसार संपूर्ण वर्षाचे विभाजन सर्वसाधारणपणे:

  • वसंत(मार्च-एप्रिल)
  • ग्रीष्म(मे-जून)
  • वर्षा(जुलै-ऑगस्ट)
  • शरद(सप्टेंबर-ऑक्टोबर)
  • हेमंत(नोव्हेंबर-डिसेंबर)
  • शिशिर(जानेवारी-फेब्रुवारी) 

या सहा ऋतूंत केले आहे.

शिशिर ऋतू

शिशिर ऋतूतील हुडहुडी भरविणाऱ्या थंडीमुळे संचित झालेल्या कफदोषाचा वसंत ऋतूत प्रकोप होतो व सर्दी, खोकला, दमा इ. कफप्रधान आजार या ऋतूत संभवतात. त्यामुळे कफाचा नाश करणारे कडू, तिखट, तुरट चवीचे, उष्ण गुणाचे आहारीय पदार्थ यावेळी पथ्यकर ठरतात. यात पडवळ, मेथी, कारले, सुंठ, मिरी, लसूण, मध, कोमट पाणी अशा पदार्थांचा समावेश होतो. वसंत ऋतूत आहारात प्राधान्याने तेलकट व शीत पदार्थ, आंबट व मधुर रसाचे पदार्थ, पचण्यास जड असा आहार वर्ज्य करावा. दिवसा झोपणे टाळावे.

ग्रीष्म ऋतू

ग्रीष्म ऋतूत अतिशय कडक उन्हात, शरीरात कफदोषाचा क्षय व वातदोषाचा संचय अशी परिस्थिती असल्याने डाळिंब, द्राक्षे अशा फळांचे रस, लिंबू सरबत, शहाळ्याचे पाणी, कोकमाचे सार असे तर्पण करणारे द्रव पदार्थ आहारात अधिक असावेत. या ऋतूत हरभरा-पावटा यासारखे वातूळ पदार्थ, मिसळ-पावभाजी यासारखे जळजळ उत्पन्न करणारे पदार्थ, वेफर्स-बटर-चीज यासारखे खारट रसप्राधान्य असणारे पदार्थ जास्त प्रमाणात खाऊ नयेत. दुपारी उन्हात बाहेर जावे लागलेच तर टोपी, गॉगल यांनी डोक्याचे व डोळ्यांचे रक्षण करावे. दिवसा जेवल्यानंतर झोपणे आयुर्वेदाने निषिद्ध मानले आहे. अपवाद आहे फक्त ग्रीष्म ऋतूचा!

वर्षा ऋतू

वर्षा ऋतू म्हणजे पावसाळा हा वातप्रकोपाचा काळ असल्याने व अन्नाचे पचन करणारी पचनशक्ती या ऋतूत अतिशय मंद असल्याने पचण्यास हलका परंतु गोड, आंबट, खारट चवीचा, किंचित उद्या व स्निग्ध गुणांचा आहार पथ्यकर असतो. यांत गरम पाणी, मऊ भात-तूप, मुगाची खिचडी, भाज्यांचे गरम सूप याचा विशेष समावेश असावा. या ऋतूत जेवण प्रमाणातच घ्यावे व वर्षा ऋतूत पावसात भिजणे, अधिक श्रम करणे या गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात.

शरद ऋतू

यापुढील शरद ऋतू म्हणजे ऑक्टोबर हीट किंवा पित्तप्रकोपाचा काळ. त्यामुळे पित्तशमन करणाऱ्या दूध, तूप, लोणी, साखर तसेच तांदळाचे धिरडे, गव्हाचे सत्त्व, गव्हाच्या रव्याचा गोड शिरा- खीर, मुगाचा शिरा, दुधीची खीर- हलवा याचा आहारात समावेश असावा. फळांमध्ये गोड व ताजी द्राक्षे, डाळिंब, काळ्या मनुका खाव्यात. कोकम सरबत, आवळ्याचे सरबत यासारखी शीतपेये प्यावीत. मांसाहारी व्यक्तींनी, व सुंठ यांची तुपातील चिकन सूप, मटन सूप घ्यावे. पित्तशमनासाठी गुलकंद किंवा मोरावळा यांचा वापर करावा. यामुळे आम्लपित्त, कावीळ, त्वचाविकार इ. दुष्ट पित्तप्रधान व रक्तप्रधान सर्व आजारांना प्रतिबंध केला जातो. या ऋतूत उन्हात काम करणे, आंबट-तिखट-खारट व उष्ण पदार्थ खाणे, तीक्ष्ण मद्यसेवन वर्ज्य करावे.

हेमंत व शिशिर ऋतू 

हेमंत व शिशिर हे दोन्ही ऋतू हिवाळ्याचे ऋतू असल्याने, तसेच या काळात पचनशक्ती बलवान असल्याने पचण्यास जड व शरीराचे बल वाढविणारे बासुंदी, पेढे असे दुग्धजन्य गोड पदार्थ, उडदाचे पदार्थ, स्निग्ध पदार्थ हितकर ठरतात. मांसाहारी व्यक्तींनी या ऋतूत मटण सूप, मटण/चिकन बिर्याणी असे पचण्यास जड परंतु पोषण करणारे पदार्थ सेवन करणे हितकर ठरते. हेमंत व शिशिर ऋतूत मनुष्याचे शरीरबल स्वभावतःच उत्तम असल्याने, अर्धशक्ती व्यायाम करावा. व्यायामानंतर सर्वांगास सुगंधी उटणे लावून सोसवेल इतक्या गरम पाण्याने स्नान करावे. उबदार वस्त्रे परिधान करावीत. या दोन्ही कशे पचण्यास हलके व वातवर्धक पदा, शीतपेये कटाक्षाने टाळावीत.

भारतीय सण व आहार

आपल्या भारतीय संस्कृतीतील सण व ते साजरे करताना आहार- विहारातील सांगितलेल्या प्रथा म्हणजे शास्त्र व संस्कृती यांचा अनोखा समन्वयच आहे. म्हणूनच थंडीत संक्रांतीला पचण्यास जड असे तीळ व उष्णगुणांचा गूळ यापासून तिळगूळ करण्याची प्रथा आहे. वसंत ऋतूत चैत्रगौरीच्या हळदीकुंकवास कफस्त असे चटपटीत हरभरे, वाटली डाळ व उष्णतानाशक कैरीचे पन्हे दिले जाते. श्रावणातील उपवास हे पावसाळ्यात मंद झालेल्या पचनशक्तीस हितकर आहेत. शरद ऋतूत प्रकुपित झालेल्या पित्तदोषाच्या शमनासाठी कोजागरीला चांदण्या रात्री मसाल्याचे दूध घेण्याची पद्धत आहे. हेमंत ऋतूतील दिवाळीत प्रदीप्त पचनशक्तीच्या पोषणासाठी करंजी, लाडू असा पचण्यास जड व स्निग्ध गुणांचा फराळ केला जातो.

अशा प्रकारे या सहा ऋतूतील परिचर्येचा बंधन म्हणून नव्हे तर नियम म्हणून अवलंब केल्यास आरोग्यरूपी धनसंपदेचे रक्षण करणे सहज शक्य होईल.