उन्हाळ्याच्या त्रासापासून वाचावे कसे?

१) जेवणात कांद्याचे प्रमाण वाढवावे. शक्यतो कच्चा कांदा जास्तीत जास्त प्रमाणात खावा.

२) उन्हाळ्यात तहानेने जीव बेजार होतो. कितीही पाणी प्याले तरी शोष पडल्यासारखा वाटतो. दिवसभर असे सारखे पाणी पीत

राहिल्याने पचनशक्तीवर परिणाम होतो. जेवण कमी होते. हे सगळे टाळण्यासाठी सकाळी उठल्याबरोबर गरम पाणी फक्त पेलाभर

प्याले तरी दिवसभर तहानेने जीव व्याकूळ होत नाही.

३) पुष्कळांना उन्हाळा लागतो. तळपायाची मनस्वी आग होते. लघवी थेंबाथेंबाने होते व वेदना आणि जळजळही होते. अशा वेळी बार्ली वॉटर किंवा शहाळ्याचे पाणी घ्यावे. उन्हाळा लागू नये यासाठी तुळशीच्या बियांचे तुकुमराई सरबत घ्यावे. तुकुमराई ही काळ्या खसखशीसारखी दिसते. चमचाभर तुळशीचे बी रात्री किंवा घेण्याच्या दोन-तीन तास आधी पाण्यात भिजत घालावे. ते फुगून वर आले की त्यात दूध व साखर घालून घ्यावे. उष्णतेवर अतिशय स्वस्त, चटकन लागू होणारा हा घरगुती खात्रीलायक उपाय आहे.

४) उन्हाळ्यात पुष्कळदा घामोळे येते. त्यावर कैरी उकडून तो गर लावावा किंवा बर्फ चोळावा.

५) लहान मुलांना उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून रात्री मुगाची वा हरभऱ्याची डाळ भिजत घालावी व सकाळी मुलांना थोडी थोडी द्यावी.

६) उन्हात हिंडल्याने चेहरा रापल्यासारखा होतो. हात काळवंडतात. त्यावर गुणकारी इलाज म्हणजे दूध व लिंबाचा रस समप्रमाणात एकत्र करून हात, मान, चेहऱ्यास लावावे. आंघोळीच्या आधी पाच-दहा मिनिटे हे करावे. इतर वेळीही करण्यास हरकत नाही. पण दहा मिनिटे हे मिश्रण लावून ठेवल्यानंतर स्वच्छ धुऊन टाकावे.

७) पुष्कळदा उन्हाळ्यात रात्री झोप लागत नाही. अशा वेळी रात्रीच्या जेवणात कच्चा कांदा खावा. झोपण्यापूर्वी पाय वारंवार थंड पाण्याने धुवावे. माथ्यावर ब्राह्मी तेल चोळावे किंवा डोळ्यावर दुधाच्या घड्या ठेवाव्या.

८) उन्हामुळे पुष्कळदा अस्वस्थता वाटते. जीव घाबरल्यासारखा होतो. बेचैनी होते. अशा वेळी अमृत कोकम घ्यावे. घरात तयार

नसल्यास चटकन तयार करता येते. पेलाभर उकळत्या पाण्यात एक-दोन आमसुले टाकून ती जरा मुरली व पाणी लालसर झाले

की त्यात चवीपुरती साखर व मीठ घालून घ्यावे. उन्हाळ्यात लिंबे फारच महाग होतात. अशा वेळी आमसुलाच्या या सरबताचा फार उपयोग होतो. लिंबू सरबतापेक्षा ते जास्त गुणकारी व स्वस्तही !

९) उतारवयाच्या लोकांना तर उन्हाळ्याचा फारच त्रास होतो.बाजारात आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात चंद्रपुरी प्रवाळ मिळतो. तो दुधातून हरभऱ्याच्या डाळीएवढा द्यावा. या दिवसात गुलकंद उत्तम, पण तो फारच महाग असतो. परवडत असेल तर तोही खावा.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.