September 20, 2024

रघुनाथाचा गुण घ्यावा

रामाचे स्मरण म्हणजे काय? रामाचे नाव घेणे हे तर रामाचे स्मरण होतेच, पण स्वतः ला ‘ रामदास ‘ म्हणवून घेण्यात गौरव मानणाऱ्या समर्थांनी दास म्हणे, रघुनाथाचा गुण घ्यावा । असे म्हटले आहे. देवाचे नाव घेत असताना त्या देवाची गुणसंपदा, त्या देवाचे कर्तृत्व, त्या देवाचे वैशिष्ट्य नजरेसमोर ठेवले पाहिजे. रामाची कुटुंबवत्सलता, रामाची सत्यनिष्ठा, रामाचा सत्यवचनी म्हणून असलेला लौकिक, त्याचे शुद्ध आचरण, प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढण्याची त्याची हातोटी, केवढ्याही मोठ्या संकटाला सामोरे जाण्याची त्याची तत्पर वीरवृत्ती, त्याचा त्याग असे कितीतरी गुण श्रीराम नवमी दिनी नजरेसमोर आणता येण्यासारखे आहेत. या गुणांचा आपण जमेल तेवढा यथामती, यथाशक्ती स्वीकार केला पाहिजे, असे समर्थ रामदासस्वामींनी आपल्याला रघुनाथाचा गुण घ्यावा असे सांगताना सुचविले आहे.

देव हे आपले आदर्श आहेत आणि आपल्या सद्‌भाग्याने आपले देव हे प्रत्यक्ष जीवनाच्या रणांगणावर लढलेले आहेत. आपले देव तत्त्वज्ञ आहेत, ते भावभक्तीने वागणारे आहेत. पण त्याबरोबरच राम तर प्रत्यक्ष रणांगणावर लढला. योग्य वेळी योग्य व्यक्तीची मदत घेऊन आपले कार्य सिद्धीला नेण्यासाठी त्याने अपार कष्ट केले. ‘ प्रजाहितदक्ष राजा ‘ ही रामाची प्रतिमा अशीच अत्युच्च स्वरूपाची आहे. ‘ रामराज्य ‘ असा मुळी शब्दच आपल्याकडे रूढ झाला. रामाने सीतेचा त्याग केला हे चूक की बरोबर हा वादाचा विषय होऊ शकतो. पण ज्या सीतेसाठी त्याने एवढे मोठे घनघोर युद्ध केले, त्या सीतेचा त्याग करण्याएवढा राम कठोरही झाला. केवळ लोकमताचा आदर करावा या हेतूने कठोर झाला.

राम तसा कठोर हृदयाचा नाही. शबरीची बोरे स्वीकारताना, हनुमंताची सर्व प्रकारची सेवा गोड मानून घेताना रामाच्या हृदयाची कोमलता, त्याच्या मनातील सद्‌भाव यांचे दर्शन आपल्याला घडते. गुहकासारखा कोळी राजा रामाच्या सेवेत धन्यता मानतो. भरत हा रामावर स्वारी करण्यासाठी आला आहे, अशा चुकीच्या समजुतीने भरताविरुद्ध लढण्यास गुहक उभा राहतो. ह्यात रामाची लोकोत्तर लोकप्रियता दिसते. परिस्थितीनुसार आणि बदलत्या काळाप्रमाणे रामकथा पुनःपुन्हा जन्म घेते, असे रवींद्रनाथ टागोरांनी म्हटले आहे.

रामाच्या ठायी असलेले असंख्य गुण वेगवेगळ्या काळात लोकांसमोर ठेवणे इष्ट असते. ती त्या त्या काळाची गरज असते. मोगलांच्या आक्रमणाच्या वेळी समर्थ रामदासस्वामींना रामाचे रणकौशल्य महत्त्वाचे वाटले. सत्यासाठी लढणे, दुष्टदुर्जनांपासून साधुसंतांचे रक्षण करणे हा रामाचा गुणविशेष समर्थांनी त्या काळात मांडला. आजच्या काळात सत्यवचनी आणि त्यागी असे जे रामाचे स्वरूप आहे ते समाजासमोर येणे ही गरज आहे.

भ्रष्टाचार, लाचलुचपत अशा दलदलीत सापडलेली पौरुषाची पराक्रमी प्रतिमा मुक्त होण्यासाठी अशा सद्‌गुणांचे आदर्श उगवत्या पिढीसमोर असणे इष्ट आहे. .अर्थात् असे लोकोत्तर आदर्श आपण आता केवळ इतिहास- पुराणातून शोधले पाहिजेत. वर्तमानकाळातील सगळीकडून घेरून टाकणारे वातावरण मनातील निराशेचा काळोख अधिक दाट आणि गडद करणारे आहे.

या दृष्टीनेच रामकथा काळानुरूप आणि परिस्थितीनुरूप पुनः पुन्हा जन्म घेते, हा विचार आपल्याला उपयुक्तही वाटू लागतो. रामाचे नाव हे भवसागर तरून जाण्यास प्राप्त झालेली एक नौका आहे, असे रूपक प्रचलित आहे. केवळ राम नामाचा आधार घेण्यापेक्षा रामाच्या गुणांचा विचार करणे हे समाजहिताच्या दृष्टीने अधिक उपकारक ठरू शकेल.

 – ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर (देवाचिये व्दारी पुस्तकामधून)

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.