प्रबोधिनी एकादशी

चातुर्मासात आषाढी एकादशीपासून कार्तिक शुक्ल दशमीपर्यंत क्षीरसागरात शेषशय्येवर झोपी गेलेले भगवान विष्णू ह्या दिवशी हळूहळू जागे होतात. म्हणून ह्या एकादशीला प्रबोधिनी (देवऊठी) एकादशी असे खास नाव आहे. ह्या दिवशी भक्तमंडळी भजन, कीर्तन, गायन तसेच विविध वाद्यांचा गरज करतात. प्रथम मंत्रोच्चारांसह देवाचे आसन तसेच देऊळ फुलापानांनी, तोरणांनी सजवावे. देवाची पूजा करावी. प्रल्हाद, नारद, व्यास आदी भगवद्‌भक्तांचे स्मरण करावे. जमलेल्या सर्व मंडळींना प्रसाद वाटावा. शेवटी देवाचा रथ ओढावा. (त्यामुळे देव जागे होऊन पुन्हा कल्याणकारी कार्याला सुरुवात करतात, अशी पूर्वापार श्रद्धा आहे.)

तुलसीविवाह प्रारंभ:


ह्या दिवसापासून तुलसीविवाहाला प्रारंभ होतो. भगवान विष्णूंना प्रिय असलेल्या तुळशीशी त्यांचा विवाह लावला जातो. (आपापल्या सोयीनुसार हा तुलसीविवाह कार्तिक पौर्णिमेपर्यंत पाच दिवसांत कधीही करावा.) त्यासाठी तीन महिने आधीपासून तुळशीची निगराणी केली जाते.

भगवान विष्णू एकादशी ते पौर्णिमा ह्या पाच दिवसात आपल्या योगनिद्रेतून हळूहळू जागे होत असतात. त्यामुळे ह्या पाच दिवसात बगळादेखील मासे खात नाही. म्हणून ह्या पाच दिवसांना ‘बकपंचक’ असे नाव आहे. (बगळ्याप्रमाणे माणसांनीही हे पाच दिवस मत्स्याहार (मांसाहारदेखील) घेऊ नये, असा ह्याचा मथितार्थ.) पौर्णिमेला तुलसीविवाहाबरोबरच ‘चातुर्माससमाप्ती’ देखील होते.

सद्यःस्थितीः


आपल्याकडे भागवतधर्मात त्यातही वारकरीसंप्रदायात ह्या एकादशीला देखील अतिशय महत्त्व आहे. आषाढीप्रमाणेच कार्तिकीवारी करणारी लाखो वारकरी भक्तमंडळी उभ्या महाराष्ट्रात आहेत. भक्तिभावनेला तोड नसते. उन्हाळा, पावसाळा, थंडी अशा निसर्गाच्या कुठल्याही प्रतिकूलतेचा बाऊ न करता, आधिव्याधींनाही काही काळासाठी विसरुन जाऊन विठुरायाचे भक्त त्याला भेटण्यासाठी अगदी अधीर झालेले असतात. ज्यांना शक्य असेल त्यांनी एकदा तरी ही ‘पंढरीची वारी’ जरुर करावी. ज्ञानोबांपासून लोकमान्य टिळकांपर्यंत ज्यांना ह्याचे दर्शन घ्यावे असे वाटले, त्या विठोबाला ह्या एकादशीच्या निमित्ताने भेटून यावयास हवे. प्रवासात आपल्या आजूबाजूच्या मंडळींना लागेल ती मदत (आपल्या शक्तीनुसार) जरुर करावी. ज्यांना वारीला जाणे शक्य नाही त्यांनी जवळच्या एखाद्या विठ्ठलमंदिरात जावे. ज्यांना तेदेखील शक्य होणार नसेल त्यांनी घरीच देवाची साग्रसंगीत पूजा करावी. ‘विष्णुसहस्त्रनाम’ म्हणावे. ज्यांच्याकडे तुळस असेल त्यांनी इमारतीमधील सर्वांनी एकत्र येऊन ‘तुलसीविवाह’ साजरा करावा. सार्वजनिक स्वरुपात करणार असल्यास प्रत्येकाने आपला खर्चाचा वाटा आनंदाने उचलावा. घरगुती स्वरुपाचा असल्यास पूर्वनियोजन करुन चारचौघांना बोलावून हा विवाह जरुर करावा.


 – ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर (धर्मबोध पुस्तकामधून)

One comment

  1. कार्तिक शुद्ध एकादशी – Vanilla affidavit site

    […] जयंत. “प्रबोधिनी एकादशी”. कालनिर्णय. |archive-date= मधील दिनांक मूल्ये […]

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.