सर्वपित्री दर्श अमावास्या

Published by Jyotirbhaskar Jayant Salgaonkar on   October 8, 2018 in   Festivals

सर्वपित्री दर्श अमावास्या म्हणजे काय?

भाद्रपदाच्या पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंतचे सोळा दिवस पितृकार्यासाठी अतिशय योग्य असल्याचे आपल्या धर्मशास्त्रात म्हटले आहे. आपल्या आप्तेष्टांपैकी जे ज्या तिथीला मृत पावले असतील त्यांचे त्या त्या तिथीला श्राद्ध करावे, असा शास्त्रसंकेत आहे. वास्तविक भाद्रपदाचा कृष्ण पक्ष म्हणजे महालयपक्ष अर्थात ‘पितृपक्ष’ म्हणून ओळखला जातो. परंतु एखादी व्यक्ती पौर्णिमेला गेली असल्यास तिचे श्राद्धकर्म भाद्रपद पौर्णिमेला आणि ते न जमल्यास सर्वपित्री अमावास्येला करण्याची प्रथा आहे. त्या त्या तिथीला असे श्राद्ध करणे शक्य नसेल तर अशावेळी अथवा एखाद्या आप्तसंबंधिताची निश्चित तिथी ज्ञात नसल्यास अशा सर्वांचे भाद्रपद अमावास्येला एकत्रितपणे श्राद्ध केले जाते; म्हणून ह्या अमावास्येला ‘ सर्वपित्री दर्श अमावास्या’ असे म्हटले जाते.

सद्य स्थिती:

एरव्ही आपल्या पूर्वजांचे स्मरण सध्याच्या धकाधकीच्या जीवनपद्धतीत करण्याएवढी फुरसद सर्वांकडे नसते. मात्र त्यांच्याबद्दलची आपुलकी, आदर, कृतज्ञता व्यक्त करण्याची एक संधी दरवर्षी पितृपक्षाच्या रुपाने धर्माने आपल्याला प्राप्त करुन दिली आहे.

ज्यांना विविध सांसारिक अडचणींमुळे ह्या पितृपक्षातही श्राद्धकर्म यथाविधी करणे इच्छा असूनही शक्य नसेल त्यांनी सर्वपित्री अमावास्येला अथवा आपल्या मृतपरिजनांच्या श्राद्धतिथीच्या दिवशी एखाद्या संस्थेला यथाशक्ती देणगी द्यावी. एखाद्या वाचनालयात आपल्या एेपतीनुसार एकदोन ग्रंथ भेट म्हणून द्यावे. आजकाल अशा अनेक सामाजिक संस्था व मंडळे रोज गरीबांना सुग्रास अन्नदान करते. अशा संस्थांना आपल्या एेपतीप्रमाणे २५०, ५०० रुपये देऊन त्या विशिष्ट दिवसाचा निर्देश केल्यास त्या दिवशी अन्नदान केले जाते.

 – ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर (‘धर्मबोध’ ग्रंथामधून)