September 12, 2024

वामन जयंती

दशावतारामधील वामन हा भगवंतांचा पाचवा अवतार आहे. भाद्रपद शुक्ल द्वादशीला ‘वामन जयंती’ म्हणून संबोधिले जाते. विष्णूभक्त प्रल्हादाचा मुलगा विरोचन. या विरोचनाला सूर्याने एक मुकुट दिला होता. त्या मुकुटाला दुसऱ्या कोणी स्पर्श केलाच तर त्यामुळे विरोचनाला मृत्यू येईल असा शाप होता. त्याप्रमाणे प्रत्यक्ष भगवंतानी स्त्री-रूप घेऊन त्याला आपल्या नादी लावले आणि संधी साधून त्याच्या मुकुटाला स्पर्श केला त्याबरोबर विरोचनाला मृत्यू आला.

या विरोचनाचा मुलगा बळी हा विष्णुभक्त होता. तो पापभीरु आणि सदाचरणी होता. दातृत्वाबद्दल त्याची दिगंतरात कीर्ती पसरली होती. स्वपराक्रमाच्या जोरावर त्याने कुबेराला लाजवील एवढी अफाट संपत्ती मिळविली होती. त्याचे प्रजाजनही अतिशय सुखात होते पुन्हा दैत्य असूनही तो देवांनाही अजिबात त्रास देत नसे हे विशेष!

दैत्यगुरू शुक्राचार्य यांच्या सांगण्यावरून त्याने इंद्रपदासाठी शंभर यज्ञ करण्यास सुरुवात केली. त्याप्रमाणे शंभरावा यज्ञ चालू होताच इंद्र काळजीत पडला त्याने विष्णूला शरण जाऊन उपाय विचारला. विष्णूने आपल्या भक्ताला तपाचे फळ मिळेलच, पण तरीही इंद्राची कार्यसिद्धी आपण स्वत: करू, असे आश्वासन दिले.

इकडे अदितीला पुत्र झाला तो तेजस्वी बुद्धिमान होता त्याचे नाव वामन या वामनाने वेदाभ्यासही केला होता. त्याने देवांना त्यांच्या पदाची प्राप्ती पुन्हा होण्यासाठी वडिलांना उपाय विचारला त्या वेळी वडिलांनी त्याला गणेशाचा षडाक्षरी मंत्र दिला.  त्यांच्या सांगण्यावरून वामनाने वर्षभर गणेशाची तपश्चर्या केली. गणेशाने, प्रसन्न होऊन त्याला दर्शन देताच त्याने गणेशाची स्तुती केली त्या वेळी गणेशाने त्याला  ‘तुझी मनोकामना पूर्ण होईल’ असा आशीर्वाद दिला.

त्यानंतर वामनाने बळीच्या यज्ञमंडपात जाऊन त्याला आपल्या वाक्‌चातुर्याने चकित केले अणि त्याच्याकडे तीन पावले जमीन मागितली. त्याप्रमाणे बळीने तीन, पावले जमिनीचे दान बटू वामनाला केले.

शुक्राचार्यांनी वामनाचे हे कपट अंतर्ज्ञानाने जाणून भूमीदान करू नकोस म्हणून बळीराजाला सांगितले. पण तत्पूर्वीच बळीने बटुवेशातील वामनाला वचन दिल्यामुळे बळीराजा ते वचन परत घेईना. त्यानंतर शास्त्रोक्त रीतीने वामनाच्या हातावर उदक सोडताच वामनाने आपले खरे रूप प्रकट केले.

ह्या विश्वरूपात त्याने एका पावलाने भूमी, स्वर्ग आणि अंतरिक्ष व्यापले. दुसऱ्या पावलात पाताळ व्यापले आणि आता तिसरे पाऊल कुठे ठेवू, असे बळीलाच विचारले असता, बळीने नम्रपणे आपले मस्तक वाकवून त्या मस्तकावर पाऊल ठेव असे सांगताच वामनाने त्याच्या मस्तकावर आपले पाऊल ठेवून बळीला पाताळात लोटले.

वामन, बळी व सुमुख गणेश

मात्र बळीराजाचा दानशूरपणा, त्याचे शील आणि सद्‌वर्तन पाहून वामन संतोषला. त्याने बळीला ‘मी तुझा द्वारपाल होईन’ , असे आश्वासन दिले. त्या वेळी वामनाच्या कर्तृत्वाने संतोषून देवांनी त्याच्यावर पुष्पवृष्टी केली. वामनाने यानिमित्ताने ‘ सुमुख ‘ नावाची जी गणेशमूर्ती स्थापली, ती पुढे विशेष प्रसिद्धी पावली.

भाद्रपद शुद्ध एकादशीला वामनाप्रीत्यर्थ उपवास करून माध्यान्हकाळी वामनाची शास्त्रोक्त पूजा केली जाते. रात्रभर जागरण करून भजनकीर्तन, नामस्मरण करून द्वादशीला पंचोपचारे पूजा केली जाते व दान म्हणून दही-दूध घातलेले भांडे शिंकाळ्यासह दिले जाते.

केरळात त्या दिवशी दिवाळीसारखा सण साजरा केला जातो. नवीन कपड्यांची, भांड्यांची खरेदी करतात. असुरांचे राज्य जाऊन देवाचे राज्य आल्यावर प्रजेची आर्थिक स्थिती कशी झाली हे बघण्यासाठी या दिवशी बळीराजा पृथ्वीवर येतो, अशी श्रद्धा असल्याने त्या वेळी बळीला आपले वैभव दिसावे म्हणून हा उत्सव दिमाखात केला जातो. महाराष्ट्रात मात्र वामनावतारासंबंधातच धार्मिक पूजाविधी होतात.

आजच्या वामन जयंतीला आपणही भगवतांच्या या पाचव्या अवताराला स्मरणपूर्वक वंदन करूया!

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.