वसुबारस

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   October 16, 2017 in   Festivals

गाय आणि तिचे वासरु हे निर्व्याज प्रेमाचे प्रतीक मानले जाते. गाय वासरावर जे प्रेम करते ते केवळ अनुपमेय असे असते, तसेच वत्साचे गायीवरचे प्रेम हे अनन्यसाधारण असते. दुसऱ्या कोणाला ते बधत नाही. ओळखत नाही. म्हणून देव-भक्त, आई-मूल, गुरु-शिष्य यामधील प्रेमसंबंधालाही आपली संतमंडळी नेहमी गाय-वासराच्या प्रेमाची उपमा देतात. नामदेवमहाराजांनी, तूं माझी माऊली, मी तुझें वासरुं । नको पान्हा चोरुं । पांडुरंगें ॥ अशी प्रत्यक्ष विठ्ठलाचीच मनधरणी केली आहे. धेनु चरे वनीं, वत्स असें घरीं । चित्त वत्सावरी । ठेवूनि फिरे ॥ अशासारखे अनेक गो-वत्स संदर्भ नामदेवांच्या अभंगांत येत असतात. नामदेवांप्रमाणेच जनाबाईंनादेखील

मी वत्स माझी गायी । न ये आतां करं काई ॽ॥

मज पाडसाची माय । भक्ति वत्साची ते गाय ॥

अशा शब्दांत पांडुरंग आणि आपल्यामधील नात्याचे वर्णन केले आहे. ते गाय-वासराचा दृष्टांत देऊनच.

 

तुकारामांनीही वत्स पळे धेनु, धांवे पाठीलागीं । प्रीतीचा तो अंगीं । आविर्भाव ॥ अशा शब्दात या नैसर्गिक अकृत्रिम प्रेमाची थोरवी गायिली आहे. ज्ञानदेवांच्या सदाप्रसन्न, तृप्त, शांत व्यक्तिमत्त्वाला वत्स-धेनू हा दृष्टांत अधिक आवडला नसता तरच नवल ! ज्ञानेश्र्वरीतील गाय-वासराचे असंख्य संदर्भ पुनःपुन्हा नवनवीन रुपांत आपल्यासमोर येतात. आपल्या विश्र्वरुपावर अर्जुनाचे अढळ प्रेम असणे आवश्यक आणि हिताचे आहे, हे सांगताना गाय डोंगरात चरत असते, पण तिचे सारे लक्ष घरातल्या वासरावर असते – नाना गाय चरे डोंगरीं । परि चित्त बांधिलें वत्स घरीं ॥ असा दृष्टांत देऊन श्रीकृष्ण भगवान आपले सांगणे अर्जुनाला पटवून देतात.

वत्सावरुनि धेनूचें । स्नेह राना न वचे ॥ स्थिरपुरुष देहाने फिरत असला तरीही त्याचे चित्त चंचल नसते, जशी गाय रानांत गेली तरी तिचे वासरावरील प्रेम रानांत जात नाही असा यथार्थ दृष्टांत ज्ञानदेव देतात. ज्ञानी भक्त आणि देव यांच्यामधील अव्दैत सांगताना वासरु जसे तनमनप्राणाने आपल्या आईलाच ओळखते, त्याच्या या अनन्यगमीमुळे गायीचीही त्याच्यावर तशीच अपार माया असते, तें येणें मानें अनन्यगती । म्हणूनि धेनूही तैसीचि प्रीती ॥ असा जो श्रीकृष्णानी दृष्टांत दिला आहे तो खरा आहे, असा ज्ञानदेवमहाराजांनी दुजोरा दिला आहे.

तृप्त झाल्यावरही गाय आपल्यापासून दूर जाऊ नये, असे वासराला जसे वाटते अगदी तसेच अर्जुनालाही वाटत आहे. या प्रसंगाचे वर्णन करताना ज्ञानोबा सांगतात, वत्स धालया परी । धेनु न वचावी दुरी । अनन्य प्रीतीची परी । ऐसीच आहे ॥ देवांची स्थिती तरी गायीपेक्षा वेगळी कुठे होती ॽ

अहो वासरु देखिलियाचि साठीं ॥ धेनु खडबडोनि मोहें उठीं ।

मग स्तनामुखाचिये भेटी । काय पान्हा न ये ॥

वासराला पाहून गाय प्रेमाने पटकन उठून उभी राहते. मग त्याने तिच्या स्तनाला मुख लावल्यावर तिला पान्हा फुटणारच. अर्जुनाच्या बाबतीत देवालाही असाच मायेचा पान्हा फुटल्याने अर्जुनाच्या विचारण्याची वाट न बघताच देव त्याला गुह्यतम असे अनेक प्रकारचे ज्ञान देत होते. अर्जुन हा कामधेनूचा पाडा असून शिवाय तो कल्पतरुच्या मांडवाखाली बसला आहे, मग त्याचे मनोरथ पूर्ण झाले यात नवल ते काय, असे कौतुकाने ज्ञानोबा विचारतात.

किरीटी कामधेनूचा पाडा परी कल्पतरुचा आहे मांदोडा । म्हणोनि मनोरथसिद्धीचिया चाडा । तो नवल नोहे ॥

ज्याप्रमाणे एका वासराच्या प्रेमापोटी गाय जे दूध देते ते त्या घरातील सर्वांना मिळते, तसेच एका अर्जुनासाठी भगवंतांनी गीता सांगितली तिचा साऱ्या जगाला लाभ झाला. परी वत्साचेनि वोरसें । दुभते होय घरोद्देशें । जाले पांडवाचेनि मिषें । जगदुद्धरण ॥ अशी अर्जुनाबद्दल ज्ञानोबा कृतज्ञताही व्यक्त करतात. ज्ञानेश्र्वरमाऊली ही कामधेनू, सगळे विश्र्व हे जणू तिचे वत्स म्हणजे वासरू. गेली सातशे वर्षे ही कामधेनू ज्ञानेश्र्वरीचे स्तन्य, म्हणजे ब्रह्मविद्येचे अमृत कोणताही भेदाभेद न ठेवता मराठीच्या मंडपात सर्वांना मुक्तपणे उपलब्ध करुन देत आहे.


 – ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर (धर्मबोध पुस्तकामधून )