लक्ष्मीपूजन

लक्ष्मीपूजन कसे करावे?


  • दीपावलीच्या ह्या दुसऱ्या दिवशीदेखील पहाटे लवकर उठून तेल-उटण्याने अभ्यंगस्नान करण्याची प्रथा आहे.
  • सकाळी देवपूजा, दुपारी पितरांचे श्राद्धविधी करुन प्रदोषकाळी पुन्हा स्नान करुन शुचिर्भूत व्हावे.
  • नंतर पूजायोग्यस्थळी चौरंगावर अथवा पाटावर कुंकुम अक्षतांच्या साहाय्याने आठ पाकळ्यांचे कमळ काढून त्यावर लक्ष्मी, विष्णू, कुबेर ह्यांची पूजा करावी. त्या तिघांचीही मनोमन सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करावी.
  • नंतर त्यांना लवंग, वेलची, साखरयुक्त गाईच्या दुधापासून केलेल्या मिठायांचा नैवेद्य दाखवावा. त्याबरोबरच धणे, गूळ, साळीच्या लाह्या, फळे, बत्तासे अशा विविध पदार्थांचाही नैवेद्य दाखवावा.

या दिवशी बळीच्या कारागृहातून लक्ष्मीसमवेत सर्व देवांची भगवान विष्णूंनी सुटका केली होती- असे मानतात. ती मुक्त झालेली लक्ष्मी आपल्या घरी येणे ही भावनाही ह्या लक्ष्मीपूजनापाठी असावी.

 

सद्यःस्थितीः


लक्ष्मी कोणाला नको असते ॽ लक्ष्मी प्रसन्न असली तर सर्व सुखांचा लाभ माणसाला होतो. म्हणूनच लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी प्रत्येकजण जीव टाकत असतो. विशेष म्हणजे हिंदू धर्मात विहित असलेले हे ‘लक्ष्मीपूजन’ सर्वधर्मीय मंडळी सारख्याच ‘भाव-भक्तीने’ करीत असताना दिसतात. कारण ‘लक्ष्मीमाहात्म्य’ त्यांनाही कळत असते. अमावास्येमुळे संपूर्ण जगतामध्ये अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते. परंतु पणत्या, कंदील लावून आपण सर्व त्या दिव्यांच्या प्रकाशात तो अंधार आपल्यापरीने दूर करीत असतो.

‘तमसो मा ज्योतिर्गमय’ अंधाराकडून प्रकाशाकडे, प्रगतीकडे, आशेकडे, यशाकडे वाटचाल करण्याची प्रेरणा ह्या आश्विन अमावास्येच्या रात्री लखलखणाऱ्या असंख्य पणत्यांकडून आपल्याला मिळत असते, म्हणून तर आपण दिवाळीची दरवर्षी उत्सुकतेने वाट बघत असतो. तिच्या स्वागताची उत्साहाने तयारी करीत असतो. स्वतः नटून सजून तिचे स्वागत करतो. तिच्या येण्याने आनंदाच्या फुलबाज्या, चंद्रज्योती आपल्या मनातही सुखस्वप्नांची आतषबाजी करीत असतात.

नेहमीचे ताणतणाव घटकाभर, चार दिवस विसरता यावेत म्हणून आपण ही दिवाळी साजरी करतो. तिला अधिष्ठान असते ते लक्ष्मीपूजनासारख्या धार्मिक विधींचे ! प्रत्येकजण आपापल्या परीने भक्तिपूर्वक लक्ष्मीपूजन करतोच. शिवाय व्यापारीमंडळी ह्या पूजेनंतर पुढील वर्षाच्या जमाखर्चाच्या वह्यांची पूजादेखील ह्याच दिवशी करतात. त्याला ‘चोपडीपूजन’ म्हणतात.

एरव्ही अमावास्या आपण कुठल्याही शुभकार्यासाठी योग्य मानत नाही. अपवाद असतो तो ह्या लक्ष्मीपूजनाचा ! आचारविचार शुद्ध, चांगले असतील तर ‘अमावास्या’ देखील अनुकूल होऊन जीवनात पौर्णिमेचे चांदणे शिंपू शकते असा मनाला आश्र्वासक संदेश देते ते हे लक्ष्मीपूजन ! ह्या आनंदात इतरांनाही सहभागी करुन घेता आले तर सर्व समाज सुखी होईल, असे सुंदर स्वप्न बघण्यास काय हरकत आहे ॽ

 

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.