रक्षाबंधन

रक्षाबंधन (राखीपौर्णिमा) :

श्रावण पौर्णिमेला नारळीपौर्णिमेच्या उत्सवाएवढेच आणखी एका सणामुळे महत्त्व आहे. ते म्हणजे रक्षाबंधन, राखीपौर्णिमा । रक्षाबंधनासाठी सूर्योदयापासून सहा घटिकांहून अधिक व्यापिनी आणि भद्रारहित अशी श्रावण पौर्णिमा असावी असा शास्त्रार्थ आहे. पौर्णिमेची वृद्धी असेल म्हणजे दोन दिवस पौर्णिमा असेल तर दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्यावेळी सहा घटिकांपेक्षा कमी वेळ ही पौर्णिमा असेल आणि आदल्या दिवशी भद्रारहित असा अपराण्हकाल किंवा प्रदोषकाल असल्यास त्या आदल्या दिवशी, त्याकाळी रक्षाबंधन करावे असा शास्त्रसंकेत आहे, तो पाळून राखी बांधली जावी. ह्मा दिवशी बहीण भावाच्या हाताला राखी बांधून पवित्र बंधनाचे त्याला पुन्हा एकदा स्मरण करून देते. भाऊ बहिणीला प्रेमाची भेटवस्तू देतो. गोडाधोडाच्या जेवणाचा थाट असतो. आपल्याकडे राजस्थान, उत्तर प्रदेश ह्या ठिकाणी रक्षाबंधन ह्या सणाला विशेष महत्त्व आहे. मारवाडी मंडळींमध्ये तर भावाबरोबर वहिनीलादेखील राखी बांधण्याची प्रथा आहे. त्यांच्यामध्ये सासुरवाशिणींना ह्यावेळी माहेरी आणण्याची प्रथादेखील आहे. ह्मा राखीबंधनाच्या अनेक कथा, लोककथा आपल्याकडे पूर्वापार सांगितल्या जातात.

द्रौपदीसि बंधु शोभे नारायण 

नारदमुनी कृष्णाच्या महालात पोहोचले. त्यांनी सुभद्रेची तक्रार कृष्णाच्या कानावर घातली. ते सारे ऐकून कृष्णाला हसू आले. नारदांना त्याने विश्वासात घेतले आणि एक नाटक रचले. खोटी खोटीच आपली करंगळी कापल्याचे वृत्त प्रथम सुभद्रेच्या आणि नंतर द्रौपदीच्या कानावर घालून कापलेल्या करंगळीतून होणारा रक्तस्त्राव थांबावा म्हणून जखमेवर बांधण्यासाठी एक चिंधी दोघींकडे मागण्यासाठी कृष्णाने नारदमुनींना पाठविले. त्याप्रमाणे घाबरल्याच्या अभिनय करीत सुभद्रेच्या महालात जाऊन नारदांनी तिला कृष्णाची करंगळी कापून रक्ताची धार लागल्याचे हृदयद्रावक वर्णन करून सुभद्रेकडे एक चिंधी मागितली.

सुभद्रा उठली, तिने बासनात नीट बांधून ठेवलेल्या आपल्या साड्यांची उलथापालथ केली. पण त्या भरजरी किंमती गर्भरेशमी शालूमध्ये चिंधी म्हणून फाडण्यासारखा असा एकही जुना शालू दिसेना. ती ओशाळली. नारदांना म्हणाली, ” बघता आहात ना नारदमुनी तुम्ही? आहे का माझ्याकडे एकतरी जुना शालू किंवा साडी? साऱ्या एवढ्या किंमती, नुकत्याच घेतलेल्या, काहींच्या तर घड्याही अजून उलगडलेल्या नाहीत. तेव्हा दादाला सांगा, त्याची शप्पथ घेऊन सांगते माझ्याकडे एकही चिंधी नाही. असती तर दिली नसती का? माझा एवढा लाडका भाऊ, त्याला काय मी चिंधी द्यायला मागे-पुढे पाहिले असते? पण काय करू, माझा अगदी नाइलाजच आहे.

 

सुभद्रादेवी की असते द्वारकेशी । बोट चिरलं देव पडले धरणीशी । एक चिंधी द्यावी बोटा बांधायासी । ही काल घेतली नवीच बाभळगुजरी । हा काल घेतला पितांबर भरजरी । आवघें दिंड पाहिलें सोडून, एक चिंधी नाही कृष्णा, तुझी आण । द्रौपदीसि बंधु शोभे नारायण ।।

 

सुभद्रेकडून नारदमुनी जे निघाले ते थेट द्रौपदीकडे जाऊन पोहोचले. त्यांनी जे सुभद्रेला सांगितले, तेच द्रौपदीलाही सांगितले. वेदना सहन न होऊन कृष्ण जमिनीवर अगदी गडबडा लोळत आहे हे ऐकून द्रौपदीच्या काळजाचे अगदी पाणी पाणी झाले. देवा, काय करू आता मी. म्हणून ती विचार करू लागली, तोच नारदांनी तिच्याकडे एक चिंधी मागितली. त्याबरोबर द्रौपदी त्यांना म्हणाली, ” नारदमुनी, आधी माझे काळीज नेऊन त्या जखमेवर बांधा ” आणि असे म्हणता म्हणता दुसरीकडे ती जो गर्भरेशमी सुरेख शालू नेसली होती त्याचा जरतारी पदर तिने फाडला आणि नारदांकडे देऊन म्हणाली, ” लवकर जा, वेळ घालवू नका. ”

 

नारदमुनी म्हणती द्रौपदीसी । बोट चिरलं, देव पडले धरणीशी । एक चिंधी द्यावी बोटा बांधायासी । माझं काळिज पहिलं बांधा तें नेऊन ।

भरजरी पितांबर पदर दिला फाडून । द्रौपदीसि बंधु शोभे नारायण ।।

 

थोड्या वेळानंतर सुभद्रेला हे सारे  वृत्त सविस्तरपणे कळेल अशी व्यवस्था नारदमुनींमार्फत कृष्णाने केली. द्रौपदीने आपला नवा किंमती शालू फाडून दिला. आपण बंधुप्रेमात कमी पडलो याची चुटपुट सुभद्रेला. मात्र आपल्यापेक्षा द्रौपदी ही दादाची अधिक लाडकी का? ते कोडेही उलगडले. त्यानंतर मात्र तिने कधी द्रौपदीचा मत्सर केला नाही. खरोखरच द्रौपदीलाच कृष्णदादा भाऊ म्हणून अधिक शोभतो हे तिलाही मनोमन पटले होते. या प्रसंगावरची इतर अनेकांची पदे उपलब्ध आहेत. पण अधिक लोकप्रियता मात्र मिळाली ती या पदाला.

आपण घेतलेल्या परीक्षेत द्रौपदी खरी ठरली. तिने स्वत:चा शालू आपल्यावरील प्रेमापोटी फाडला हे कृष्ण कधीच विसरला नाही. द्रौपदीने बंधुप्रेमाने जखम बांधण्यास दिलेली चिंधी आणि दुःशासनाने आरंभलेल्या वस्त्रहरणाच्या प्रसंगाच्या वेळी कृष्णाने पुरविलेल्या साड्या यांचे भावनिक मोल सारखेच ठरले. वस्त्रहरणाच्या बिकट प्रसंगी कृष्णाने द्रौपदीची लाज राखली. भावाच्या कर्तव्याला तो जागला. बहीण- भावाच्या नातेसंबंधाचे गहिरे रंग आणि कोमल भाव जपले. ती चिंधी हीदेखील राखीचेच एक दुसरे रूप होती. म्हणून तर त्या बंधनाला जागून देवाने द्रौपदीचे रक्षण केले.

सद्यःस्थिती:


आता मुली स्वत:च स्वत: चे रक्षण करण्याएवढ्या सक्षम झालेल्या असल्या तरीही भावा-बहिर्णीच्या पवित्र नातेसंबधाची, आपल्या संस्कृतीची एक रेशमी आठवण, एक सुंदर प्रतीक म्हणून हा सण आपण आवर्जून साजरा करावयास हवा. अनाथाश्रमातील भगिनी, मुली ह्यांच्याकडून राखी बांधून घेता येईल. बहीण नसलेली अनेक मंडळी वर्षानुवर्षे अशा महिलाश्रमात आवर्जून जाऊन राख्या बांधून घेऊन त्या भगिनीना मिठाई आणि भेटवस्तू देतात. आपल्याला बहीण असली तरीही सामाजिक बांधीलकी म्हणून ही प्रथा आपण सर्वांनीच अंगीकारणे आवश्यक आहे. भाऊ नसलेल्या बहिणी सैनिकांना, पोलिसांना राख्या बांधून त्यांना गोडाधोडाचे पदार्थ, इतर भेटवस्तू देऊ शकतात. एकत्रितपणे ही प्रथाही अधिकाधिक वाढीस लागणे गरजेचे आहे.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.