मोरया गोसावी

Published by Kalnirnay on   December 26, 2018 in   FestivalsGaneshotsav

मोरया गोसावी

गणेशभक्तामाजी श्रेष्ठ अत्यंत । प्रसन्न पूर्ण झाले त्यांवरि एकदंत ।।

मार्गशीर्ष वद्य षष्ठी लागोनी समाधि घेतली चिंचवड स्थानी ।।

चिंचवड या गावाला तीर्थक्षेत्राचे माहात्म्य मिळवून देणाऱ्या मोरया गोसावी यांची आज पुण्यतिथी आहे. मोरया गोसावी हे जक्तज्जल आणि एकनिष्ठ गणेशभक्त म्हणून प्रसिद्ध होते त्यांचे वडील वामन भट्ट यांनीसुद्धा प्रखर गणेशभक्ती केली आणि त्यानंतर त्यांना जो पुत्र झाला त्याचे ‘ मोरया ‘ असे गणपतीचे नाव ठेवले. वडिलांना वयाच्या ४५ वर्षांपर्यंत संतती नव्हती. मोरयाच्या म्हणजेच गणपतीच्या उपासनेमुळे झालेला पुत्र म्हणून त्याचे नाव ‘ मोरया ‘ ठेवले.

बाळ मोरया व गोसावी

मोरया गोसावी यांच्या चरित्रात बरेच चमत्कार घडलेले दिसतात. ते पाच वर्षांचे असताना तापाच्या साथीत सापडले आणि त्यांची अशी बिकट अवस्था झाली की ते जणू गेलेच असे घरच्या सर्वांना वाटले आई-वडील तर रडूच लागले. त्या वेळी एक गोसावी तिथे आले. आणि त्या गोसाव्यांनी हे काय? असा प्रश्न विचारला.

गोसाव्यांनी हा प्रश्न विचारताच, बाळ मोरया झोपेतून उठावे तसे जागे झाले. त्या लहान मुलाने आपला हात वर करून गोसाव्याला जवळ बोलावले आणि त्या अज्ञात गोसाव्यांनी या बाळ मोरयाच्या कानांत गुरुमंत्र सांगितला. आपल्याजवळची कफनी त्याच्या अंगात घातली आणि इतक्या लहानपणीच मोरया हे गोसावी झाले. पुढे त्यांनी गोसाव्याची दीक्षाही घेतली आणि त्यांच्या पुढील काही पिढ्या गोसावी असेच आडनाव लावू लागले. पुढे मोरया गोसावींनी ‘नयनभारती’ या नावाच्या योगीराजाकडून अनुग्रह घेतला आणि हे गुरूशिष्य थेऊर येथे राहू लागले.

गुरू नयनभारती हे श्रेष्ठ योगी होते. हठयोगी होते. तसेच ज्ञान-योगाचे महत्त्व आणि सामर्थ्यही हे जाणत होते. त्यांनी मोरया गोसाव्यांना हठयोगातील विविध क्रिया, आसने, ध्यानधारणा, समाधी इत्यादी सर्व गोष्टी शिकविल्या. मोरया गोसावी हठयोगात प्रवीण झाले. पुढे नयनभारतींनी मोरयांना ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला.

मोरया गोसावी हठयोगात पारंगत झाले होते, पण तरीही भक्तिमार्गाचे महत्त्व पूर्णपणे जाणून होते. ते नित्य श्रीगजाननाची उपासना करीत असत. मोरगावच्या गणपतीचे उपासक असलेले मोरया गोसावी नियमितपणे विनायक चतुर्थीला मोरगावला जात. गणपतीची अपार कृपा लाभल्याने मोरया गोसावीवर काही दिव्य शक्ती प्रसन्न झाल्या होत्या. त्यांच्या वाचेला सिद्धी प्राप्त झाली होती. त्या विषयीची एक आख्यायिका अशी – ताभवडे नावाच्या गावात एकदा मोरया गोसावी यांचा मुक्काम होता. ते हातात टाळ घेऊन देवाचे भजन करीत होते. भजनात आणखीही भाविक भक्त रमून गेले होते. एवढ्यात मोरया गोसावींच्या हातातील एक टाळ निसटला आणि दूरवर एका मुलीच्या पायाशी जाऊन पडला. ती मुलगी जन्मांध होती. ती त्या गावच्या पवार या घराण्यातील होती. ती आंधळी असल्याचे मोरया गोसावीना माहीत नव्हते. मुलीच्या पायाजवळ पडलेला टाळ तिने उचलून द्यावा म्हणून मोरया गोसावी तिला म्हणाले, ‘ बाळे, तो टाळ आम्हांला आणून दे. ‘ मोरया गोसावी यांना भजन चालू असतांना मध्ये उठावयाचे नव्हते. ती आंधळी मुलगी ‘ टाळ सापडत नाही ‘ असे म्हणाली.

त्यावर मोरया गोसावी म्हणाले, ‘ नीट पाहा म्हणजे दिसेल. ‘ तेवढे म्हणाले मात्र आणि त्या मुलीला खरोखरच दिसू लागले. मोरया गोसावींच्या शब्दाने तिला दृष्टी प्राप्त झाली. मोरया गोसावीनी केवळ त्या आंधळ्या मुलीला दृष्टी दिली असे नव्हे तर संसाराच्या अंधारात चाचपडणाऱ्या अनेक पिठ्यांना ज्ञानभक्तीची दृष्टी दिली. महाराष्ट्राची गणेशभक्ती अधिक डोळस करण्याचे कार्य तर मोरया गोसावीनी आणि त्यांच्या वंशजांनी केलेच, पण शिवछत्रपतीपासून पेशव्यांपर्यंत अनेक राजपुरुषांनाही गणेशभक्तीचे महत्त्व पटवून दिले.
मोरया गोसावी यांचा वंश अजूनही चिंचवड येथे नांदत आहे आणि मोरया गोसावी यांच्याप्रमाणेच गणेशभक्तीच्या परंपरेची पताका श्रद्धेने मिरवत आहे.