नारळीपौर्णिमा

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   August 6, 2017 in   Festivalsश्रावणमास

नारळीपौर्णिमा/श्रावण पौर्णिमा :


(नारळीपौर्णिमा) ह्या दिवशी पावसाळ्यामुळे उधाण आलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी विधिवत त्याची म्हणजे जलदेवता वरुणाची पूजा करून त्याला नारळ अर्पण केला जातो. प्रामुख्याने समुद्राशी संबंधित व्यवसाय करणारे कोळीबांधव आणि जलपर्यटन हा व्यवसाय करणारी मंडळी हा सण ‘उत्सव’ म्हणून साजरा करतात. कोळीवाड्यातील आपल्या निवासस्थानापासून समुद्रापर्यंत सोनेरी कागदाने सुशोभित केलेला नारळ पालखीत घालून सर्व आबालवृद्ध स्त्री-पुरुष नाचत-गात आनंदाने मिरवणूक काढतात. समुदायानेच आपापला नारळ समुद्रात अर्पण करतात. धंद्याला बरकत यावी आणि पुढचे वर्ष समुद्राने आपले रक्षण करावे म्हणून मनापासून प्रार्थना करतात. नंतरही बराच वेळ सर्व समुद्रकिनारे आणि कोळीवाडे नाचत- बागडत असतात. ह्या दिवशी नारळ घातलेला गोड पदार्थ केला जातो. पावसाळा सुरू झाल्यापासून बंद ठेवलेले आपापले व्यवसाय ह्या दिवशी पुन्हा सुरू केले जातात.

सद्यःस्थिती :

आपला देश कृषिप्रधान असला तरीही त्याला लाभलेला समुद्रकिनाराही मासेमारीच्या व्यवसायामुळे जगात प्रसिद्ध आहे. शिवाय जलमार्गाचा वापर करून प्राचीन काळापासून इतर देशाशी आपला व्यापार-उदीम चालू आहे. त्यामुळे दक्षिणेत विशेषत: महाराष्ट्रात नारळीपौर्णिमेला अतिशय महत्त्व आहे. ज्यांचा समुद्राशी निगडित असा कुठलाही व्यवसाय नाही अशी मंडळीदेखील कृतज्ञता भाव व्यक्त करण्यासाठी समुद्राला नारळ अर्पण करतात.

महाराष्ट्रात प्रत्येक घरी नारळी भात, नारळाच्या करड्या, नारळाच्या वड्या असे कुठले ना कुठले तरी गोडाचे पक्वान्न तयार होतेच. हा दिवस ‘तुमचे-आमचे’ न करता सर्वचजण साजरा करतात. जे करीत नसतील त्यांनी तो केला पाहिजे. ही परंपरा आपण जपावी अशीच आहे. पंचमहाभूतांपैकी आप म्हणजे पाणी-पर्यायाने समुद्राची पूजा म्हणजे ह्या जलतत्त्वाचीच पूजा आहे, हे आपण विसरता कामा नये. ह्या निमित्ताने सार्वजनिक रीतीने नियोजनपूर्ण असे कार्यक्रम झाले पाहिजेत. हा नुसताच एक सण, उत्सव, रूढी नाही, ती आपली सांस्कृतिक परंपरा आहे. ती पुढे अखंड चालू राहिली पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाने प्रत्यक्ष सहभाग घेण्याची आवश्यकता आहे.

श्रावण खाद्ययात्रा २०१७ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इथे क्लिक करा.

रक्षाबंधन (राखीपौर्णिमा) :

श्रावण पौर्णिमेला नारळीपौर्णिमेच्या उत्सवाएवढेच आणखी एका सणामुळे महत्त्व आहे. ते म्हणजे रक्षाबंधन, राखीपौर्णिमा । रक्षाबंधनासाठी सूर्योदयापासून सहा घटिकांहून अधिक व्यापिनी आणि भद्रारहित अशी श्रावण पौर्णिमा असावी असा शास्त्रार्थ आहे. पौर्णिमेची वृद्धी असेल म्हणजे दोन दिवस पौर्णिमा असेल तर दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्यावेळी सहा घटिकांपेक्षा कमी वेळ ही पौर्णिमा असेल आणि आदल्या दिवशी भद्रारहित असा अपराण्हकाल किंवा प्रदोषकाल असल्यास त्या आदल्या दिवशी, त्याकाळी रक्षाबंधन करावे असा शास्त्रसंकेत आहे, तो पाळून राखी बांधली जावी. ह्मा दिवशी बहीण भावाच्या हाताला राखी बांधून पवित्र बंधनाचे त्याला पुन्हा एकदा स्मरण करून देते. भाऊ बहिणीला प्रेमाची भेटवस्तू देतो. गोडाधोडाच्या जेवणाचा थाट असतो. आपल्याकडे राजस्थान, उत्तर प्रदेश ह्या ठिकाणी रक्षाबंधन ह्या सणाला विशेष महत्त्व आहे. मारवाडी मंडळींमध्ये तर भावाबरोबर वहिनीलादेखील राखी बांधण्याची प्रथा आहे. त्यांच्यामध्ये सासुरवाशिणींना ह्यावेळी माहेरी आणण्याची प्रथादेखील आहे. ह्मा राखीबंधनाच्या अनेक कथा, लोककथा आपल्याकडे पूर्वापार सांगितल्या जातात. त्यापैकी एक प्रसिद्ध कथा पुढीलप्रमाणे-

जगज्जेता शिकंदर व राखीपौर्णिमा :


सिंधुनदीचे पात्र हे समुद्राएवढे विशाल असल्यामुळे तिला कौतुकाने ‘दरिया’ म्हणत. अशा ह्या नदीच्या पात्रातून, शेकडो नावांमधून आपले सैन्य घेऊन जगज्जेता शिकंदर नदीतीरावर येऊन पोहोचला. त्याला ही वाट फितूर झालेल्या अंभीराजाने दाखविली होती. आपले बस्तान बसवून मग त्याने परिसाकडे आपण पाहुणचारासाठी येत असल्याचा संदेश धाडला. तो संदेश मिळताच पौरस चिडला. मात्र शिकंदराला उत्तर धाडले ते पौरसाची मोठी बहीण सावित्रीदेवी हिने! ‘ईश्वराने भारताच्या प्रवेशद्वाराचे रक्षण करण्याची जबाबदारी आमच्यावर सोपविली आहे. त्यामुळे हाती शस्त्रे घेऊनच आम्ही तुझे जरूर स्वागत करू‘ – असे ते बाणेदार उत्तर होते. नंतर दोन्हीकडील सैन्य लढाईसाठी सत्त्व झाले. परंतु पावसाळा सुरू झाल्याने प्रत्यक्ष लढाई लांबली. त्यावेळी शिकंदर सतलजच्या पैलतीरावर होता. अशा भर पावसाळ्यात शिकंदर आपल्यापर्यंत येऊ शकणार नाही, हा पौरसाचा अंदाज मात्र चुकला.

अनुभवी शिकंदराने सतलज पार करण्यासाठी शेकडो नावा तयार करवून घेतल्या. ह्याच काळात नारळीपौर्णिमा आली. पंजाबातील स्त्रिया सिंधुनदीलाच आपला भाऊ मानीत. त्यामुळे तिला जाऊन मिळणाऱ्या कुठल्याही नदीत पूजा करून राखी सोडत. त्या रिवाजानुसार राखी नदीपात्रात सोडण्यासाठी सावित्रीदेवी लवाजम्यासह सतलजच्या किनाऱ्यावर येऊन पोहोचल्या. दरवर्षीप्रमाणे त्यांनी प्रथम सतलजची मनोभावे पूजा केली.  ‘पुढच्या वर्षी राखी पाठविण्यासाठी आपण जिवंत राहू की नाही ते ठाऊक नाही‘ – असे सद्‌गदित होऊन म्हणत त्या खाली वाकून पात्रात राखी सोडणार इतक्यात दुरून त्यांचा तो पूजाविधी बघणारा एक सैनिक त्याच्याजवळ आला. त्याने प्रथम सावित्रीदेर्वीकडून त्या पूजेचा अर्थ समजावून घेतला, राखीचे महत्त्व जाणून घेतले. त्यानंतर त्याने सावित्रीदेवीकडून ती राखी स्वत च्या हातावर बांधून घेतली. मात्र राखी बांधण्यापूर्वी सावित्रीदेवींनी ‘जेव्हा माझ्यावर संकट येईल तेव्हा माझ्या रक्षणासाठी तुला धावून यावे लागेल‘ ही राखीमागची प्रमुख भूमिका त्याला समजावून सांगितली. त्याने तो अर्थ आपल्याला रूळला असल्याचे सांगून स्वत:च्या हातातील एक अंगठी काढून ती सावित्रीदेवीना दिली.

शिकंदराच्या सैनिकांपैकी कोणालाही ही अंगठी दाखवून आपला निरोप धाडलात की, मी तुमच्या रक्षणासाठी धावत येईन’,  असे वचन दिले. नंतर महापूर आलेल्या सतलजच्या पात्रात निर्भयपणे उडी मारून पोहत तो पैलतीराकडे गेला. थोड्याच दिवसांनी प्रत्यक्ष लढाईला सुरुवात झाली. पौरसाची हार होणार हे ध्यानी येताच निराश मन:स्थितीत सावित्रीदेवीनी त्या राखीच्या भावाला मदतीला बोलाविण्याचे ठरविले. त्यानुसार त्यांनी मदतीला येण्याची अपेक्षा करणारे पत्र त्या खुणेच्या अंगठीसह शत्रूसैन्यातील एका सैनिकाकडे दिले. त्या सैनिकाने ते पत्र आणि अंगठी सावित्रीदेवींच्या राखीभावाकडे पोहोचविले. ते पत्र आणि अंगठी मिळताच ताबडतोब युद्ध थांबविले गेले. स्वत: शिकंदर सावित्रीदेवींकडे आला त्याने स्वतःची खरी ओळख त्यांना करून दिली. पौरसालाही राखीची हकीकत सांगितली. आजपासून आपण दोघे भाऊ आहोत असा दिलासा पौरसाला दिला. सावित्रीदेवीच्या साक्षीने पौरसाला त्याचे राज्य परत दिले. परिणामी एक आक्रमण टळले.

सद्यःस्थिती:


आता मुली स्वत:च स्वत: चे रक्षण करण्याएवढ्या सक्षम झालेल्या असल्या तरीही भावा-बहिर्णीच्या पवित्र नातेसंबधाची, आपल्या संस्कृतीची एक रेशमी आठवण, एक सुंदर प्रतीक म्हणून हा सण आपण आवर्जून साजरा करावयास हवा. अनाथाश्रमातील भगिनी, मुली ह्यांच्याकडून राखी बांधून घेता येईल. बहीण नसलेली अनेक मंडळी वर्षानुवर्षे अशा महिलाश्रमात आवर्जून जाऊन राख्या बांधून घेऊन त्या भगिनीना मिठाई आणि भेटवस्तू देतात. आपल्याला बहीण असली तरीही सामाजिक बांधीलकी म्हणून ही प्रथा आपण सर्वांनीच अंगीकारणे आवश्यक आहे. भाऊ नसलेल्या बहिणी सैनिकांना, पोलिसांना राख्या बांधून त्यांना गोडाधोडाचे पदार्थ, इतर भेटवस्तू देऊ शकतात. एकत्रितपणे ही प्रथाही अधिकाधिक वाढीस लागणे गरजेचे आहे.


 – ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर | ‘धर्मबोध’ या पुस्तकामधून