नवरात्र : विश्वजननी

आज नवरात्रीचा तिसरा दिवस. त्रिगुणात्मक देवीच्या पराक्रमाच्या कथेचे वर्णन करणाऱ्या या तिसऱ्या दिवशी त्रिविध ताप हरण करणाऱ्या देवीच्या चरणी आपण नतमस्तक होऊया.

तृतीय दिनीं त्र्यक्षरा त्रिनयना त्रिगुण तापशमनी । तृतीय नेत्र उघडिला घालूनि दिव्यांजन नयनीं ।

प्रकाशमय तो प्रकाश झाला दिव्य दिसे गगनीं । नमन करुया प्रकाशरुपा प्रकाशदा जननी ।।

देवी ही त्रिनेत्रा आहे. शिवशंकर आणि गणपतीप्रमाणे तिलाही तीन डोळे आहेत. दोन डोळे हे सर्वसामान्यांप्रमाणे आहेतच, पण एक दिव्य दृष्टी असलेला त्रिनेत्र तिच्यापाशी आहे. जे नेहमीच्या दृष्टीला दिसत नाही, असे या दिव्य दृष्टीने देवी पाहते आणि तिच्या या दिव्य दृष्टीतून एक प्रकारचा प्रकाशही दाही दिशांना पसरत असतो. अशा रितीने देवी केवळ अंधाराचा नाश करणारीच नाही तर ती प्रकाशमयी आहे, प्रकाशाची जननी आहे. सर्व प्रकारच्या अंधारांना दूर करणारी, काळोखाचा नाश करणारी ही देवी आहे. मग तो अंधार अज्ञानाचा असो, अविचाराचा असो, अनाचाराचा असो, अंधश्रद्धेचा असो किंवा आणखी कशाचा असो. देवी ही तमोनाशिनी आहे. जे जीव संकटाच्या अंधारात चाचपडत राहतात किंवा अज्ञानाच्या गुहेत वाट न सापडल्यामुळे कुठेतरी नुसतेच भटकत राहतात. त्यांना योग्य मार्ग दाखविणारी अशी ही देवी आहे. जेव्हा जेव्हा संकटाच्या अंधाराने हे जग ग्रासून जाईल, जेव्हा जेव्हा दृष्टी असूनही माणसाला नीट मार्ग दिसणार नाही, जेव्हा जेव्हा सगळेच आयुष्य काळोखात बुडाल्यासारखे होईल. तेव्हा तेव्हा आपण अवतार घेऊ आणि सर्व प्रकारच्या अडीअडचणी दूर करू तसेच दुष्टदुर्जनांचे पारिपत्य करून एक आनंदाचा नवा प्रकाश, एकसुखाचा नवा उजेड सर्वांना उपलब्ध करून देऊ, असे देवीचे आश्वासन आहे.

देवीचे चमत्कार सांगणाऱ्या तशा प्रकारच्या विविध कथा आपणाकडे अनेक पुराणांत ग्रंथित केल्या आहेत. क्षणभर असे गृहीत धरले की, या सर्व कथा कल्पित आहेत, त्यांमध्ये खरे असे काही नाही. तरीही एक गोष्ट मान्य करावीच लागेल. जशी प्रत्यक्ष प्राणिमात्रांची कोणीतरी जन्मदात्री असते, प्रत्येक मनुष्याची कोणीतरी जननी असते, तशीच या विश्वाची कोणी जननी असलीच पाहिजे आणि ही जननी भूतकाळात होती, वर्तमानकाळात आहे आणि भविष्यकाळातही राहणारी आहे. ही जननी त्रिकालांच्या गर्भांचे आपल्या कुशीत संगोपन करीत असते. पुरुष नवनिर्मिती करू शकत नाही. नवनिर्मितीचे भाग्य केवळ प्रकृतीच्याच ललाटी आहे.

नवनिर्मितीचे भाग्य हाच प्रकृतीच्या ललाटी विलसणारा सौभाग्यतिलक आहे. पुरुषाच्या ललाटी राजतिलक शोभायमान होईल, मंगलतिलक त्याला सन्मानित करील, पण सौभाग्यतिलकाचे ऐश्वर्य मात्र वाट्याला येते ते गृहदेवतेपासून निसर्गदेवतेपर्यंत सर्वत्र विलसणाऱ्या देवीच्या परम अद्‌भूत, परम कृपाळू आणि अतिकनवाळू अशा मातृरुपालाच!

हे माते, हे जगदंबे, हे विश्वजननी, मानवजातीला अधिक कल्याणाकडे घेऊन जाण्यासाठी तुझ्या तिसऱ्या नेत्राचा दिव्य प्रकाश आमच्या मार्गावर निरंतर पसरू दे!


 – ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर 

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.