नवरात्र प्रारंभ

आज आश्विन शुद्ध प्रतिपदा. देवी नवरात्रीचा प्रारंभ आजच्या तिथीपासून होतो. घटस्थापना केली जाते. घटाच्या बाजूलाच पसरलेल्या थोड्याशा मातीवर धान्य रुजविले जाते. देवीच्या मूर्तीसमोर अथवा सप्तशतीच्या पोथीसमोर अखंड दिवा तेवत ठेवला जातो. वेगवेगळे लोक आपापल्या प्रथा-परंपरांनुसार नवरात्र उत्सव साजरा करतात.

नवरात्र हा सत्त्व-रज-तम अशा त्रिगुणविशेषात अवतरलेल्या महाकाली, महालक्ष्मी, आणि महासरस्वती अशा तीन देवतांच्या पराक्रमाचा गुणगौरव करणारा व्रतोत्सव आहे.

महासरस्वती ही सात्त्विक तेजाची देवता, महालक्ष्मी ही राजस तत्त्वाची निदर्शक, आणि महाकाली हे आदिमायेचे तामसी रूप अशी ही गुणविभागणी आहे. त्रिगुणाच्या रूपात अवतरलेली देवी सर्व भूतमात्रांच्या ठायी सामावलेली आहे. तिने आपल्या भक्तांना एक आश्वासन देऊन ठेवले आहे ज्या ज्या वेळी पृथ्वीवर अनाचार माजेल, सज्जनांना सुखाने जगणे अशक्य होईल त्या त्या वेळी मी अवतार घेऊन दुर्जनांचा संहार आणि सज्जनांचा उद्धार करीन, असे तिचे अभिवचन देवी भागवतात नमूद आहे.

आपणही ‘कालनिर्णय’ नवरात्र उत्सव साजरा करणार आहोत. मनाच्या घटात श्रद्धेचे अमृतजल भरुन त्याची स्थापना भक्तिभावाच्या चौरंगावर करणार आहोत. सात्त्विकतेचे दीप देवीसमोर अखंड तेवत ठेवणार आहोत. नव्या सद्‌विचारांचे बी पूर्वकर्माच्या मातीत अंकुरावे, अशी कामना करणार आहोत. स्तवन-सुमनांच्या माळा या घटावर चढत्या श्रेणीने वाहणार आहोत. देवीचे स्मरण, चिंतन करणार आहोत. शब्दांची आरास मांडणार आहोत. आपणही नवरात्र उत्सव साजरा करणार आहोत.

आपल्याकडे नवरात्र उत्सव साजरा करण्याची परंपरा फार प्राचीन काळापासून आहे. देवीच्या भक्तिपरंपरेचा उगम अतिप्राचीन कालाएवढा मागे जाऊ शकतो. वैदिक काळातही देवीची उपासना रूढ होती. देवीची उपासना करणाऱ्यांनी विविध प्रकारे देवीची स्तोत्रे गायिली आहेत. दुर्गासप्तशती ऊर्फ देवी-माहात्म्य, श्रीदेवी भागवत इत्यादी अनेक ग्रंथांतून देवीचे पराक्रम, देवीच्या रूपाने स्त्रीशक्तीने या जगाला दुःख, दुर्दशेतून सोडविण्यासाठी केलेले प्रचंड पराक्रम, शब्दबद्ध केले आहेत. देवीच्या आरत्या, देवीची गीते, देवीवरील पदे अगणित संख्येत उपलब्ध आहेत. आपण या सदरामधून जो नवरात्र उत्सव साजरा करणार

आहोत. त्यासाठी अशाच एका सुंदर काव्याची म्हटल्यास आरतीची आपण निवड केली आहे. या आरतीत नवरात्रीचे दसऱ्यापर्यंतचे दिवस कशा प्रकारे साजरे केले जातात त्याचे वर्णन आहे.

शरदऋतूची शीत सुगंधी दरवळली गगनी । श्रीमंतीने नटुनि थाटली सुंदर ही अवनी ।

मुनिजन म्हणती त्या जननीची अगाध ही करणी । नमन करुया शरण जाऊनी करुणाकर जननी ।।

शरदऋतूतील शांत आणि शीतल अशी रात्र रातराणीच्या सुगंधाने न्हाऊन निघाली आहे. शरदाच्या चांदण्याच्या वैभवाचा अलंकार ल्यायलेली पृथ्वी नटूनथटून अधिकच सुंदर दिसत आहे. सगळे ऋषीमुनी देवीच्या या अद्‌भुत, अगाध आणि अगम्य करणीने प्रसन्न झाले आहेत. अशा सर्वांवर करुणा करणाऱ्या देवीला आपण मनोभावे शरण जाऊया.

नवरात्रीच्या प्रथम शुभदिनी संस्थापन करणी । घटस्थापना करुनी अंबे उदो म्हणा वदनीं ।

मूल-मंत्र जप पाठ करुनियां प्रेमळ भवानी । नमन करुया शरण जाऊनी जगदंबा जननी ।।

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण देवीची स्थापना करूया. अंबामातेचा जयजयकार करूया. ‘ जगदंब उदयोऽस्तु ‘ असे मुक्तकंठाने म्हणूया आणि देवीच्या नावाच्या मंत्राचा जप करून सर्व विश्र्वाची आई असलेल्या त्या परम करुण मायभवानीला भक्तिभावे वंदन करूया, तिच्या चरणी नतमस्तक होऊया.


 – ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर 

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.