नवरात्र आठवी माळ : दुर्गांबा जयिनी

श्रीदेवीचे चरित्र किती विविधांगांनी नटले आहे याचा विचार केला की, मन थक्क होते. अहो, साधी गोष्ट बघा ना, सत्व, रज आणि तम या तिन्ही गुणांना देवीच्या महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या त्रिविध रूपात महत्त्वाचे स्थान आहे. सत्व, रज, तम हे तिन्ही गुणविशेष जगरहाटीत आपल्याला निरंतर दिसतात आणि जगरहाटीसाठी ते आवश्यकही आहेत. महाकालीने उग्ररूप धारण करून महिषासुराचा वध केला नसता तर जगाला अनंत प्रकारच्या त्रासांना तोंड द्यावे लागले असते. महालक्ष्मीने सागरातून बाहेर आल्यानंतर सर्व चराचराला ऐश्वर्यसंपदेचे दान मुक्तहस्ताने केले नसते तर सर्वाना सुखसंपदा कुठून मिळणार होती. ‘ महासरस्वतीने साहित्य, संगीत अशा कलांना आश्रय दिला नसता, अशा कलांची देवता म्हणून ती सुप्रतिष्ठित झाली नसती तर मानवप्राण्याची संस्कृतिपथावरची वाटचाल प्रगतीच्या दिशेने कशी बरे चालू राहिली असती.

‘देवीची ही विविध रूपे म्हणूनच जगाच्या कल्याणासाठी आहेत. त्रिविध रूपात नटलेली देवी ही जगाचे कल्याण करणारी आहे, जगाचे रक्षण करणारी आहे, जगाचे संगोपन करणारी आहे. म्हणूनच तिला सार्थपणे आपण जगदंबा, जगतजननी असे म्हणतो. आज नवरात्रीच्या आठव्या दिवशी आपण कालीरूपाचे स्मरण-स्तवन करणार आहोत.

अष्टमदिनीं अष्टांग भेदूनी वधिला दैत्यमणी । महिषमर्दिनी दुर्गभेदिनी दुर्गाचा जयिनी ।

सतत वर्षवी अमर वारुणी भक्तां प्रिय करुनी । नमन करुया विश्वरुपिणी विश्वेश्वर जननी ।।

देवीने महिषासुर नावाच्या दैत्याला ठार मारून ही सर्व मेदिनी म्हणजे पृथ्वी दुख:मुक्त केली. तिने महिषासुराचा वध करून केवळ काही विशिष्ट मनुष्यसमूहाला किंवा विशिष्ट भूप्रदेशाला भयमुक्त केले असे नाही तर तिने अखिल विश्वालाच व्याप-तापापासून सोडविले, दुर्जनांच्या तडाख्यातून मुक्त केले. महिषासुरासारख्या बलाढ्य, सामर्थ्यशाली राक्षसाचा वध झाल्यामुळे इतर राक्षससुद्धा वठणीवर आले असतील आणि देवी जिथे महिषासुरासारख्या महाकाय, महाप्रचंड आणि महाशक्तिशाली राक्षसाचा निःपात करते तिथे इतर दैत्यांची कथा ती काय? असे अखिल त्रैलोक्याला वाटले असेल यात मुळीच शंका नाही.

देवी ही निरंतर जय पावणारी आहे, तिने लढलेल्या विविध युद्धांत काही काळ तिचा पराभव झाल्यासारखे वाटले तरी आणखी कुमक घेऊन, आपल्या बळात आणखी वाढ करून ती पुन्हा नव्या उमेदीने, नव्या सामर्थ्याने आपल्या शत्रूंवर तुटून पडते आणि त्यांचा निःपात करते ती निरंतर विजय पावणारी असल्यामुळेच तिला ‘जयिनी’ या शब्दाने गौरविले आहे. ती आपल्या कृपेच्या अमृताचा भक्तांवर जणू सतत अभिषेक करीत असते आणि त्यामुळे भक्त हे तिच्या चरणी निरंतर लीन झालेले दिसतात. ही देवी संकटांपासून आपले रक्षण करणारी आहे. अडीअडचणीच्या प्रसंगी आपल्या साहाय्यास धावून येणारी आहे याची साक्ष पटल्यामुळे सगळे भक्त देवीच्या उपासनेत निमग्न झालेले आहेत.

आपल्याकडे सणवार हे निसर्गक्रमाशी निगडित असे आहेत. भारतीय संस्कृतीप्रमाणे नव्या वर्षाची कालगणना चैत्र शुद्ध प्रतिपदेला सुरू होते. चैत्रात झाडाझुडपांना नवीन पालवी फुटते. त्या पालवीला मुळी चैत्रपालवी असे नावच आहे. वर्षाचा प्रारंभ सृष्टीच्या नवनिर्मितीच्या अवस्थेत व्हावा म्हणून चराचराला प्रसन्नता बहाल करणाऱ्या वसंतऋतूचा प्रारंभकाळ हाच नव्या वर्षाचा प्रारंभकाळ मानला गेला. त्याचप्रमाणे नुकताच पावसाळा संपत आल्यामुळे नवरात्रीच्या प्रारंभी सर्व वृष्टी जलवृष्टीने तजेलदार झालेली असते. नवरात्रीच्या नऊ दिवसांत झाडाझुडपांची वाढ झपाट्याने होत असते नवरात्रीत जे धान्य पेरले जाते तेही सृष्टीशी असलेला आपला दृढ संबंध दर्शविणारे आहे. पर्यावरणाचा विचार आपल्या पूर्वजांनी किती दूरदृष्टीने केला होता ते पाहिल्यानंतर आपण भारतीय संस्कृतीचे वारसदार आहोत, याबद्दलचा अभिमान कोणाला वाटणार नाही?


 – ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.