नवरात्र : जगदंबा

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   September 21, 2017 in   Festivals

द्वितीय दिनीं तें द्वैंत सांडूनि एकच भवानीं । एकतानता एकच ध्याता एका एक मनीं ।।

एका मनाने एकच होऊनि अंबेच्या चरणीं । नमन करुया द्वैतनाशिनी एकांबाजननी ।।

नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी सर्व प्रकारचे द्वैत, दुजाभाव यांचा त्याग करून आपण सगळे एकच आहोत अशा एकविचाराने, एकत्वाने सर्व जगात समरसतेने सामावलेल्या देवीचे एकचित्ताने ध्यान करूया.

द्वैताचा नाश करणाऱ्या जगदंबेचा भक्तिभावाने जयजयकार करूया. देवीला जगदंबा, जगाचे आई असे म्हटले जाते. स्त्री-पुरुष हे दोन्ही भिन्न असले तरी शिवशंकराच्या ठिकाणी आपण प्रकृती आणि पुरुषाचे ऐक्य पाहतो. त्याला आपण ‘अर्धनारीनटेश्वर’ म्हणजे देहाच्या अर्ध्या भागात पुरुष आणि अर्ध्या भागात स्त्री अशा स्वरूपात पाहतो. स्त्री आणि पुरुष यांमधील द्वैत लोप पावले आणि ते एकरूपाने जगात विराजमान झाले की सर्व चराचराला मोहून टाकणारे एक अद्‌भुत अलौकिक रूप नजरेसमोर येते. शंकराचे एक नाव सांब आहे. आपण त्याला सांबसदाशिव असे म्हणतो. सांब म्हणजे काय? अंब म्हणजे माता म्हणजेच पार्वती. जो पार्वतीसह निरंतर वावरतो तो सांब. सह अंब म्हणजे सांब. देवी प्रकृतिस्वरूप असून ती परम पुरुष शिवशंकराच्या ठायी एकरूप झाल्याने प्रकृती आणि पुरुष यांचे द्वैत संपून वेगळ्याआगळ्या अद्वैताचा साक्षात्कार जगाला झाला. हे द्वैत संपून अद्वैताचा हुंकार चराचरांतून निर्माण करणारी जगदंबा सर्वांना कल्याणकारी ठरो, अशी प्रार्थना आपण या द्वैतनाशिनी एकांबाजननीच्या चरणी करावयाची आहे.

हे की ते, ते की हे अशा प्रकारच्या संशयाचे द्वैत मनातून नाहीसे होऊन एकमेवाद्वितीय असलेल्या परम सत्याकडे आपली श्रद्धा अढळ राहावी. त्या परम सत्याच्या दिशेने आपली वाटचाल अखंड चालू राहावी, म्हणून देवीचे अद्वैतस्वरूप आपण समजून घेतले पाहिजे. सर्व चराचराच्या ठिकाणी देवी अंशरूपाने विराजलेली आहे.

या देवी सर्वभूतेषु चेतनेत्यभिधीयते ।

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ।।

सर्व प्राणिमात्रांचे चैतन्य म्हणून जी देवी ओळखली जाते, तिला पुनःपुन्हा नमस्कार असो. ती देवी सर्व भूतमात्रांच्या ठायी, सर्व प्राणिमात्रांच्या ठायी, जगात जे काही चल-अचल आहे त्याच्या ठिकाणी एकत्वाने एकरूप होऊन विराजलेली आहे. ती कुठे नाही? ती जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी सर्वत्र आहे जग ही एक माया असेल तर त्या जगदंबा महामायेची ही करणी आहे आणि जगाला जेव्हा आपण माया म्हणतो तेव्हा ती देवी हेसुद्धा जगभर जे जे विखुरलेले आहे, सर्व जगभर जे जे दृश्यमान होणारे आहे ते ते त्या एकांबेचे, जगदंबेचेच स्वरूप आहे हे समजून घेतलेच पाहिजे.


 – ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर