नरक चतुर्दशी

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   October 17, 2017 in   Festivals

नरक चतुर्दशी दिवशी काय करावे?

  • भल्या पहाटे सूर्योद्यापूर्वी सर्वांनी तिळाचे तेल, सुगंधी उटणे लावून (अभ्यंग) स्नान करावे.
  • नवीन वस्त्रालंकार धारण करावेत.
  • स्नानोत्तर देवपूजा करुन मग सर्व कुटुंबीयांनी एकत्रितपणे खास दिवाळीसाठी बनविलेल्या लाडू, करंज्या आदी पदार्थांचा आस्वाद घ्यावा. 
  • नरकचतुर्दशीपासून चार दिवस (भाऊबीजेपर्यंत) रोज अभ्यंगस्नान करावे.
  • घराच्या दारात रांगोळी काढून पणत्या लावाव्यात.
  • खिडकीत कंदील लावावा. शक्य असल्यास पितृतर्पणही करावे.

 

सद्यस्थितीः


ह्या चतुर्दशीला ‘रुपचतुर्दशी’ असे आणखी एक नाव आहे. सुखसौभाग्यवृद्धीसाठी हे अभ्यंगस्नान, दीपप्रज्वलन आदी विधी आपल्याकडे पूर्वापार श्रद्धापूर्वक केले जातात. उन्मत्त झालेल्या नरकासुराचा वध भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराला ही तिथी ‘नरकचतुर्दशी’ म्हणून ओळखली जाईल, असे सांगितले.

ह्या दिवशी संध्याकाळी समईच्या चार वाती प्रज्वलित करुन पूर्वाभिमुख होऊन ती तेवती समयी दानात देण्याची प्रथा काही मंडळी आजही पाळतात. सर्व पाप, पीडानाशार्थ ती दिली जाते. तर काहींच्या मते ही चार वातींची समई नरकासुराच्या स्मरणार्थ लावली जाते. मात्र हा विधी फार थोर मंडळी करताना दिसतात. त्याऐवजी आता आपण अशी चार वातींची समई आपल्या घरात वातावरणात एक वेगळा बदल आणण्यासाठी दिवाळीचे निमित्त ही ‘पर्वणी’ समजून लावावीच. पण त्याचवेळी आपल्याकडे काम करणाऱ्या बाईंना, माहितीतील इतर गरीब मंडळींना हल्ली ज्या मेणाच्या तयार पणत्या मिळतात त्या शक्य होतील तेवढया चार, आठ, दहा ह्या प्रमाणात दिल्या तर आपल्याप्रमाणेच त्यांचे घरही प्रकाशाने उजळून निघेल.

एखाद्या वृद्धश्रमाला, अनाथाश्रमाला दिवाळीत अथवा चार दिवस आधीच अशा पणत्या, कंदील, रांगोळी, रांगोळीचे रंग, उटण्यांची पाकिटे, सुगंधी तेल, थोडेफार फराळाचे जिन्नस नेऊन दिले तर अनेकांच्या जीवनातील नैराश्याचा अंधकार चार दिवस तरी दूर करण्यास हातभार लागू शकेल. अनेक सेवाभावी संस्था ह्या निमित्ताने मदतीचे आवाहन करतात. आपण त्या आवाहनाला प्रतिसाद देणे हे आपले कर्तव्य आहे. प्रेम दिल्याने वाढते ह्याचा सुखद अनुभव घेण्याची ही एक सुवर्णसंधीच आपल्याला ह्या निमित्ताने प्राप्त होते.

कोकणात ‘कारेट’ नावाचे कडू फळ स्नानानंतर अंगठयाने फोडण्याची रीत सर्व मंडळी आवर्जून पाळतात. नरकासुराच्या वधाचे ते प्रतीक आहे असे मानतात. तसेच दुपारी ब्राम्हणभोजन घालण्याऐवजी शेजाऱ्यांना फराळाला बोलाविणे, जवळच्या स्नेह्यांकडे असा फराळ घेऊन जाणे हे आजच्या काळात अधिक सुलभ होते. कारण ब्राह्मणभोजनासाठी एवढे ब्राह्मण मिळणे शक्य नसते. तसेच आता पूर्वापार परंपरा पाळताना सारासार विचार करण्याची वृत्ती वाढली असल्याने भुकेलेल्यांना गोडधोड खाऊ घालणे खरोखरच योग्य आहे.


 – ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर (धर्मबोध पुस्तकामधून)