Your Cart

‘तटस्थ’ तें ध्यान, विटेवरी !

तुकोबांनी विटेवरचे विठ्ठलाचे ते रूप सुंदर भासले, मनाला भावले आणि तुकोबा म्हणून गेले, सुंदर तें ध्यान उभे विटेवरी । पण मुळात तुकोबांना विठ्ठलाचे हे ध्यान सुंदर वाटण्याचे एक कारण म्हणजे ते ध्यान स्थिर आहे, शांत आहे. ते विटेवर स्थिरपणे उभे आहे. ते हालत-डुलत नाही. ते निश्र्चल आहे. विटेवरच्या दोन पायांपैकी एक पाय मध्येच वर घेत नाही. कंटाळा आला म्हणून इकडे तिकडे वळून बघत नाही. उभे राहून राहून पायांना मुंग्या आल्या, म्हणून मध्येच विटेवरून खाली उतरत नाही. भक्तांची वाट पाहून पाहून आणि आलेल्या भक्तांना दर्शन देऊन देऊन दमल्यामुळे जरा विश्रांती हवी म्हणून खाली बसत नाही आणि हे असे किती वेळ निश्र्चल उभे राहाणे ? तर अठ्ठावीस युगे !

म्हणूनच जेवढया कौतुकाने तुकोबा त्याचे सुंदर तें ध्यान । असे वर्णन करतात, तेवढयाच कौतुकाने ‘तटस्थ’ तें ध्यान विटेवरी । असेही सांगतात. त्यांच्या डोळयांना आता विठ्ठलाच्या या तटस्थ ध्यानाची इतकी सवय झाली आहे की, देवाचे इतर रूप आता ते ओळखतच नाहीत. तुकोबा तन-मनाने विठोबाशी आता इतके एकरूप झाले आहेत, विठ्ठलभक्तीत एवढे रंगून गेले आहेत की, इतर कामे करण्याचे त्यांना सुचतच नाही. तुकोबा सांगतात,

आणिक दुसरें, मज नाहीं आतां । नेमिलें या चित्ता । पासूनियां ॥

पांडुरंग ध्यानीं, पांडुरंग मनीं । जागृतीं स्वप्नीं । पांडुरंग ॥ पडिलें वळण, इंद्रियां सकळां । भाव तो निराळा । नाहीं कोणा ॥

तुका म्हणे नेत्रीं, केली ओळखण । तटस्थ तें ध्यान । विटेवरी ॥

पांडुरंगाच्या स्वरूपी माझ्या चित्ताची स्थापना केल्यापासून दुसरी कुठलीच गोष्ट मला माझी वाटत नाही. मोलाची, महत्त्वाची वाटत नाही. जागृतावस्थेत ध्यान करू लागलो की मला पांडुरंगच दिसतो, झोपलो की स्वप्नातही मला पांडुरंगच दिसतो. माझ्या सगळयाच इंद्रियांना आता त्याच्याकडे धाव घेण्याची सवय लागली आहे. माझ्या डोळयांनीच तर मला त्या विटेवरच्या शांतचित्त पांडुरंगाची ओळख करून दिली. हे ध्यान किती शांत आहे ?

इतर देव काही ना काही कारणाने रागावतात, कोपतात, पण हा पांडुरंग ? भक्तमंडळी सलगीने ह्याला हवे ते बोलतात, हयाचे उणे-दुणे काढतात, प्रसंगी ह्याच्याशी भांडतात, ह्याच्यावर रूसतात, ह्याला वाटेल तसा वेठीला धरतात, पण हा कधी त्यांच्यावर रागावत नाही. वडीलकीच्या नात्याने कधी त्यांना उपदेशाचे कडू घोट पाजत नाही. कोपणे, थयथयाट करणे तर दूरच. एका अर्थी हा एवढयाशा विटेवर उभा राहून शरीराचा तोल सावरतो आणि त्याच वेळी मनाचाही. रागावणाऱ्याला काय एवढेसे निमित्त पुरते. पण हा भले मोठे कारण सापडले तरी रागावत नाही. जणू शांतीचा पुतळाच ! स्वतःच्या आचरणातून जणू हा शांतीपरते नाहीं सुख । येर अवघेंचि दुःख ॥ म्हणउनि शांति धरा । उतराल पैलतीरा ॥ असा संदेशच जगाला देत असतो. हा असा साधा वाटत असला तरी प्रत्यक्षात तो म्हणजे एक फार मोठे प्रस्थ आहे बरे ! लक्षूनियां योगी, पाहाती आभास । तें दिसे आम्हांस । दृष्टीपुढे ॥ योगी अफाट साधना करून जे आभास तत्त्व पाहतात, ते स्वरूप आम्हाला सहजपणे दृष्टिगोचर झाले आहे. कसा दिसतो हा आमचा लाडका ? कर दोनी कटीं राहिलासे उभा सांवळी हे प्रभा अंगकांती ह्याची करामत काय म्हणून विचारता ? तो एकाच वेळी साऱ्यांचे अंतःकरण व्यापून पुन्हा निर्विकारपणे वेगळा राहिला आहे.

व्यापूनि वेगळं राहिलेंसे दुरी सकळां अंतरीं निर्विकार विशेष म्हणजे ह्याला रूप, रंग, नाम, कूळ, जात, धर्म, हात, पाय, डोके असे काहीच नाही. अशा या अरूपाचे ध्यान स्वतः भगवान शिवशंकर करीत आहेत. रूप नाही रेखा, नामही जयासी, आपुल्या मनासीं शिव ध्याये अंत नाहीं पार, वर्णा नाहीं थार कुळ याति शिर हस्त पाद अचेत चेतलें, भक्तिचिया सुखें आपुल्या कौतुकें तुका म्हणे केवळ भक्तीच्या अवर्णनीय सुखासाठी ते चिन्मय असूनही सगुण साकार झाले. असे हे अतिदुर्लभ घबाड जर आपल्याला अनायासे लाभले आहे तर मग आपण त्याचा फायदा का नाही करून घ्यायचा ? तर मग मंडळी चला, बांधू विठ्ठल सांगडी । पोहुनि जाऊं पैल थडी ॥ त्यात आज आषाढी एकादशी. मग काय विचारता ? पूर आला आनंदाचा । लाटा उसळती प्रेमाच्या ॥ अशी पंढरपुरी आनंदयात्राच भरली आहे. आपणही या यात्रेत सामील होऊन निवांतपणे विटेवरच्या त्या तटस्थ ध्यानाला भेटूया, पाहुया.

देवशयनी आषाढी एकादशी व सद्य: स्थिती:

विठ्ठल हे महाराष्ट्राचे लोकदैवत आहे. आपल्या भक्तांसाठी ते पंढरपुरी एका विटेवर अठ्ठावीस युगांपासून उभे आहे. तर मग आपणही आपल्याकडून त्याच्याप्रती वाटणारा आदर व्यक्त करावयास हवा. आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो आणि हे चार महिने विठुराय म्हणजेच प्रत्यक्ष विष्णू शेषाच्या शय्येवर निद्रा घेतात ते बरोबर चार महिन्यांनी कार्तिक शुद्ध एकादशीला उठतात. आषाढी एकादशीला ‘देवशयनी एकादशी’ आणि कार्तिक एकादशीला ‘प्रबोधिनी’ किंवा ‘देवऊठी एकादशी’ असे म्हणतात. पंढरपूरचा विठुराया हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा मूलाधार आहे. ‘ज्ञानबा तुकाराम’ असा गजर करीत लाखो वारकरी या दिवशी विठुरायापुढे लोटांगण घालण्यासाठी पंढरपुरात दाखल होतात. ह्या विठोबाच्या छत्रछायेखाली मराठी भाषा बहरली. ह्या विठुरायाच्या कृपाशीर्वादाने महाराष्ट्राचा भगवा अटकेपार पोहोचला आणि विठुरायाच्या नावाने अबीरबुक्का लावणाऱ्या वारकऱ्यांनी आणि भाविकांनी संस्कृतीची, नीतिमत्तेची मनोभावे जोपासना आणि उपासना केली.  ‘पुंडलिक वरदा’ असे म्हटल्यावर ज्याच्या तोंडून ‘हरि विठ्ठल’ असा उद्गार सहजगत्या निघतो तो मराठी माणूस! ‘गणपती बाप्पा’ म्हटल्यावर ‘मोरया’ ज्याच्या मुखातून बाहेर पडते तो मराठी माणूस! तुकोबांनी तर विठ्ठल आणि गणपती हे एकच आहेत, असे म्हटले आहे. ही दोन्ही दैवते महाराष्ट्राच्या संस्कृतीची प्रतीके आहेत. मराठी माणूस कुठेही गेला तरी आषाढी एकादशीचा उपवास मनोभावे करतो.

आजकाल ह्या निमित्ताने अभंगांचे, भक्तीगीतांचे अनेक सुश्राव्य कार्यक्रम जागोजागी होतात. अशा कार्यक्रमांना जरूर जावे. घरी तुळशीचे रोप असो-नसो ह्या निमित्ताने आणखी एक नवे रोप लावावे. एखाद-दुसरे सोसायटीच्या आवारातही लावावे. ‘तुळस ही हवा शुद्ध करते’ हा वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवून अशी तुळशीची रोपे लावली तर धर्म आणि कर्तव्य अशा दोन्ही गोष्टी सहजच होऊन जातील, त्याचे समाधान लाभेल. ह्या दिवशी साधा, सात्विक, सहज पचेल असा आहार घ्यावा.


 – ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर । धर्मबोध व देवाचिये व्दारी पुस्तकामधून 

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.