Deep Pujan | Shubham Karoti Kalyanam | Deep Pooja

दीपपूजा

अमाव्रत : आषाढ महिन्याच्या अमावास्येला ‘हरिता’ किंवा ‘हरियाली अमा’ असे संबोधतात. व्रतकर्त्याने एकांत असलेल्या पाणथळ जागी जाऊन स्नान करावे. ब्राह्मणाला भोजन घालावे असे दोन प्रमुख विधी ह्या व्रतात सांगितले आहेत. ह्या व्रतकार्यामुळे ‘पितर’ प्रसन्न होतात- हेच त्याचे फल आहे. (ह्या दिवशी काही देवळांमध्ये पूजा बाधली जाते. तसेच स्त्रिया झोपाळ्यावर बसून आनंदाने गाणी म्हणतात.)

सद्यःस्थिती : आपल्या धर्मधुरिणांनी पितरांसाठी भाद्रपदाचा दुसरा पंधरवडा खास राखून ठेवलेला आहे. तरीदेखील प्रत्येक महिन्याच्या अमावास्येला त्यातही दर्श अमावास्येला असे श्राद्ध करण्याची प्रथा आहे. ज्यांना ब्राह्मणभोजन घालणे शक्य नसेल त्यांनी शिधा स्वरूपात एखाद्या गरजूला दर महिन्यात ह्या तिथीला अन्नदान म्हणून धान्य दान करावे. त्यानिमित्ताने एखाद्या घरची चूल पेटू शकली तर आपल्या पितरांना नक्कीच आनंद होईल.

दिव्याची अवस : विशेषकरून आपल्या महाराष्ट्रात आषाढ अमावास्येला ‘दिव्याची अवस’ म्हणतात. ह्या दिवशी घरातील स्त्रिया घरात असलेले सगळे दिवे घासूनपुसून लख्ख करतात. नंतर ते एकाच ठिकाणी ठेवून त्याच्याभोवती रांगोळी काढतात. रात्रौ ते सर्व दिवे तेल-वाती घालून प्रज्वलित करतात. त्यांची मनोभावे पूजा केली जाते. गोडाचा नैवेद्य दाखविला जातो. ‘सूर्यरूपा आणि अग्निरूपा दिव्या, तू स्वत: तेज आहेस, प्रकाश आहेस. तू आमच्या पूजेचा स्वीकार कर, आमच्या सर्व इच्छा पूर्ण कर’ – अशी त्याची प्रार्थना करतात. त्यानंतर उपलब्ध असलेली जी दिव्याच्या अवसेचा कहाणी सांगितली जाते तिचे सर्वांनी भक्तिपूर्वक श्रवण करावे.

दिव्याच्या अवसेची कथा

तामीळ प्रांतात पशुपती शेट्टी नावाच्या गृहस्थाला विनीत आणि गौरी नावाची दोन मुले होती. लग्नापूर्वीच त्या दोघांनी आपापल्या मुलांचे विवाह परस्परांशी करून द्यायचे असे ठरविले. पुढे विवाहानंतर यथाकाल गौरीला तीन मुली झाल्या. त्यापैकी धाकट्या मुलीचे नाव ‘सगुणा’ होते. विनीतला तीन मुलगे झाले. पुढील काळात गौरी श्रीमती उपभोगत होती. परंतु विनीतला दुर्देवामुळे अचानक दारिद्र्य आले. त्यामुळे लहानपणी भावाला दिलेले वचन न पाळता गौरीने आपल्या दोन मुलींचे विवाह दुसऱ्या श्रीमंत मुलाशी करून दिले. धाकट्या सगुणाला आईचे हे वागणे आवडले नाही. तिने आईचा विरोध मोडून विनीतच्या धाकट्या मुलाशी लग्न केले. गरिबीतही ती आनंदाने संसार करू लागली. आईवडिलांनी रागाने तिच्याशी सबंध तोडून टाकले. पुढे एकदा त्या राज्याचा राजा एके ठिकाणी स्नानासाठी गेला. स्नानाच्यावेळी त्याने आपली बहुमूल्य अंगठी काढून जवळच्या कट्ट्यावर ठेवली होती. ती अंगठी खाण्याची वस्तू समजून एका घारीने पळविली. मात्र ती खाण्याच्या लायकीची नाही हे कळताच तिने ती अंगठी नेमकी सगुणाच्या घराच्या छपरावर टाकली. ती सगुणेला मिळाली. सगुणाने चौकशी करता तिला ती अंगठी राजाची असल्याचे कळले. तिने प्रामाणिकपणे ती राजाला नेऊन दिली. राजाने खूष होऊन तिला मोठ्या रकमेचे बक्षीस दिले. शिवाय तिला आणखीन काही हवे असल्यास मागण्यास सांगितले. तेव्हा तिने ‘येत्या शुक्रवारी अमावास्येला फक्त माझ्या घरी दिवे लावलेले असतील. बाकी पूर्ण राज्यात कोणीही दिवे लावू नयेत’ अशी इच्छा प्रदर्शित केली. राजाने तशी दवंडी पिटण्याची व्यवस्था केली. त्याप्रमाणे आषाढ अमावास्येला सगुणाच्या घराव्यतिरिक्त संपूर्ण राज्य अंधारात बुडून गेले. इकडे सगुणाने घरात सर्वत्र दिवे लावले. नंतर तिने आपल्या दोन्ही दिरांना घराच्या पुढच्या आणि पाठच्या दारात उभे केले. तिने घराच्या पुढच्या दारात उभ्या केलेल्या दिराला सांगून ठेवले की, जी जी सवाष्णबाई घरात प्रवेश करू बघेल तिच्याकडून ‘मी ह्या घरातून पुन्हा बाहेर जाणार नाही- असे वचन घ्या. नंतरच तिला घरात येऊ द्या. तर मागच्या दारात उभ्या केलेल्या दिराला सांगितले की, जी बाई मागच्या दाराने बाहेर जाऊ बघेल तिच्याकडून ‘मी पुन्हा कधीही ह्या घरी येणार नाही’ असे वचन घ्या. मगच तिला बाहेर जाऊ द्या. तिन्ही सांजेच्यावेळी माता लक्ष्मीदेवी त्या राज्यात आली. तिला सर्वत्र अंधाराचे साम्राज्य दिसले. मात्र सगुणेचे घर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाले होते. तिथे जाऊन लक्ष्मीमाता सगुणाच्या घरात प्रवेश करू लागली. तेव्हा तिथे उभ्या असलेल्या दिराने सगुणाने सांगितल्याप्रमाणे आधी शपथ
घ्यायला लावून मगच तिला घरात येऊ दिले. लक्ष्मी घरात येताच आधीपासून घरात असलेली दारिद्र्याची देवी अक्काबाई तातडीने मागच्या दारातून बाहेर पडू लागली. परंतु तिथे उभ्या असलेल्या सगुणाच्या दुसऱ्या दिराने आधी तिला पुन्हा कधीही परत न येण्याची शपथ घ्यायला लावून मगच बाहेर सोडले. अशारीतीने त्या दिवसापासून सगुणाचे घर अखंड सुखसमृद्धीने भरून गेले. राज्यातील सर्वजण सगुणालाच लक्ष्मी मानू लागले.

सद्यःस्थिती :

आपल्या भारतीय संस्कृतीत दिव्याला, प्रकाशाला. तेजाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दिवा हे प्रकाशाचे, जीवनाचे आणि ज्ञानाचे प्रतीक आहे. वैदिक काळात यज्ञाला पर्यायाने अग्नीला अतिशय महत्त्व होते. आजच्या काळात यज्ञयाग त्यामानाने कमी प्रमाणात होत असले तरीही अस्तित्वात आहेत. यज्ञातील अग्नी दिव्याच्या रूपाने आजही आपले महत्त्व टिकवून आहे. आपल्याकडे प्रत्येक कार्यात, प्रत्येक सणात दिव्याला महत्त्व आहे. दिवाळी ही
तर सणांची महाराणीच आहे. अंधकार भेदून प्रकाशवाट दाखविणारा दिवा आपले धार्मिक महत्त्व कायम राखून आहे. त्यामुळेच कृतज्ञता म्हणून, मांगल्याचे प्रतीक असलेल्या दिव्याची आपण कुठल्या ना कुठल्या निमित्ताने पूजा करतो. दिव्याच्या अमावास्येला काही ठिकाणी कणकेच्या, तांदळाच्या अथवा बाजरीच्या पिठापासून दिवे करून त्यांची पूजा केली जाते. अशा ह्या दिव्याची पूजा ह्या विशेष दिवशी ज्याला वाटेल त्याने जरूर करावी. ‘किती तेल-तूप फुकट गेले?’ – याचा विचार चिंतातुर जंतू करतील आपण त्या दिव्याच्या प्रकाशाची शोभा बघावी. मात्र भरमसाट दिवे लावून प्रदर्शन करू नये. त्याऐवजी आपल्याला शक्य असतील त्या स्वरूपात सध्याच्या जगात ट्यूबलाइट्‌स, बल्ब हीसुद्धा दिव्याचीच आधुनिक रूपे आहेत, म्हणून असे
दिवे एखाद्या संस्थेला, शाळांना, आश्रमांना द्यावेत. एखादा लामणदिवा, एखादी समई खरेदी करून जवळच्या मंदिरात नेऊन लावावी. आज आपल्या देशात शेकडो देवळे अशी आहेत की, अनास्थेमुळे तिथे देवांची नित्यपूजाही होत नाही, देवासमोर एखादा दिवाही कोणी लावत नाही. अशा आडगावच्या, आडवाटेच्या देवळात समविचारी मंडळींनी आधी नीट ठरवून ह्या दिवसाचे निमित्त साधून देवाची पूजा करून तिथे दिवे लावावेत. वर्षभर रोज निदान पूजा आणि दिवाबत्ती होईल अशी व्यवस्था स्थानिकांशी चर्चा करून त्यांची मदत घेऊन त्यांना आर्थिक मदत देऊन करावी.


 – ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर | धर्मबोध पुस्तकामधून 

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.