दहिकाला

Published by Kalnirnay on   August 14, 2017 in   Festivalsश्रावणमास

मथुरा, वृंदावन, गोकुळात ज्याप्रमाणे गोकुळाष्टमी आणि नंदोत्सव साजरा होतो, तसाच कृष्णजन्माच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रात ‘दहिकाला’ साजरा करतात. विशेषत. कोकणात हा उत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. गोपसवंगड्यांसह गायींना घेऊन बालकृष्ण रानावनात जात असे. त्यावेळी त्या सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करून त्या कालविल्या जात. (त्याला ‘काला’ म्हणतात.) कृष्णाला दही-! अतिप्रिय म्हणून ह्मा उत्सवात एका मडक्यात दही, दूध, लोणी भरले जाते. ती हंडी पूर्वी दहा-बारा फुटांवर उंच बांधली जाई. मग गावातील लहान मुले, तरुण मंडळी एकत्र येऊन नाचत-गात ‘गोविंदा आला रे आला’ असे म्हणत अशा हंडी बांधलेल्या जागी पोहोचतात. नंतर मानवी मनोरे रचून त्यातील लहान मुलाला त्या हंडीपर्यंत पोहोचण्यास मदत करतात. तो मुलगा म्हणजे श्रीकृष्ण! तो ती दहीहंडी फोडतो.

त्यावेळी त्या हंडीतील दही, दूध सर्वांच्या अंगावर सांडते. तेच प्रसाद म्हणून खाल्ले जाते. मात्र ते चाटून-पुसून खाल्ल्यानंतर हात धुतले जात नाहीत. तर कृष्णाने आणि त्याच्या सवंगड्यांनी ज्याप्रमाणे हात न धुता ते केवळ आपल्या वस्त्रांना पुसले होते, त्याची आठवण म्हणून हात आपापल्या वस्त्रांना पुसले जातात. गावातील अशा सर्व हंड्या उत्साहाने फोडल्या जातात. काही ठिकाणी ह्या गोविंदामधील गोपाळांना दह्या-दुधात कालविलेले पोहे खाऊ घातले जातात.

सद्य स्थिती :


आज ‘दहीहंडी’ ह्या उत्सवाकडे बघण्याचा दृष्टिकोन पार बदललेला दिसतो.  सध्या जेवढे बक्षीस मोठे तेवढी हंडीची उंचीही जीवघेणी वाटावी अशी असते. दहीहंडीच्या मागच्या कृष्णप्रेमाच्या आठवणी दुय्यम ठरताना दिसतात.

मुलांप्रमाणे मुलींचे गटही ह्मा स्पर्धेत सहभागी होताना दिसणे ही नक्कीच आनंदाची गोष्ट आहे. (गोव्यात पूर्वापार जो ‘गवळणकाला’ केला जातो, त्यामध्ये एका मुलीलाच कृष्ण बनविले जाते.) शाळा-शाळांमधूनही अशा छोट्या-छोट्या दहीहड्यांचे (प्रत्येक वयोगटासाठी वेगवेगळ्या) कार्यक्रम आयोजित करणे गरजेचे आहे. नेहमीपेक्षा वेगळा अनुभव आणि बाळकृष्णाबद्दलची योग्य माहिती बालपणीच दिली जाणे योग्य ठरेल. एरव्ही दहीहंडी- कृष्णाष्टमी हा आपल्या संस्कृतीचा सुखद ठेवा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणार कसा?