संकष्ट चतुर्थी | sankashti chaturthi | sankashti chaturthi vrat katha | sankashti chaturthi fast benefits

अंगारक संकष्ट चतुर्थी

संकष्ट चतुर्थी


आज अंगारक संकष्टी. कुठल्याही कृष्णपक्षातील चतुर्थी तिथीला ज्या प्रदेशात चंद्रोदय होत असेल, ती तिथी ही संकष्ट चतुर्थी आणि माध्यान्हकाळी जिथे शुक्ल चतुर्थी मिळत असेल, ती विनायक चतुर्थी, असा याबाबतचा ढोबळ नियम.

५०-६० वर्षापूर्वी हा चतुर्थीचा शास्त्रार्थ ठरवितांना बरीच भवति न भवति होत असे. चतुर्थी तृतीया तिथीने युक्त असली की तिला मातृविद्धा आणि पंचमी तिथीने युक्त असली की तिला नागविद्धा असे म्हणतात. तृतीया ही मातृतिथी आणि पंचमी ही नागतिथी असल्याने या चतुर्थीबाबत असा भेद केला जातो.

पूर्वी गणपतीची उपासना करणाऱ्यांमध्येही खूपच पंथ आणि उपपंथ होते. वेगवेगळे लोक आपापल्या पंथाचा इतका ज्वाज्वल्य अभिमान बाळगत की, गणपतीचे काही उपासक विष्णूला प्रिय असलेली तुळस ही इतकी त्याज्य मानीत की तुळशीचा नुसता स्पर्श झाला तरी ते पुन्हा आंघोळ करीत. आता सगळीकडेच जमाना बदलला. लोक कळत-नकळत बरेचसे उदार मनाचे आणि विशालहृदयी असे झाले. अर्थात हे कालानुसारच घडले.असे असले तरी अजूनही ज्या देवदवतांची व्रते मनापासून केली जातात, त्यात आपले गणपतीबाप्पा हे ‘ओम् नमोजी आद्या’ असे ज्ञानोबांनी म्हटल्याप्रमाणेच अग्रस्थानाचे मानकरी आहेत.

विनायकीचा उपवास करणारे भक्त संख्येने कमी असले तरी संकष्टीचा उपवास करणारे खूपच मोठया प्रमाणात आढळतात. संकष्ट चतुर्थी मंगळवारी आली की तिला ‘अंगारकी’ म्हणण्याची प्रथा आहे. विनायक चतुर्थी मंगळवारी आली की तिला ‘अंगारक योग’ असलेली चतुर्थी मानतात. अंगारक म्हणजे मंगळ. या दिवशी येणारी संकष्ट चतुर्थी ही विशेष पुण्यप्रद मानली जाते. याविषयीची कथा सर्वज्ञात आहे. अंगारकीचा उपवास केल्यानंतर बारा संकष्टया केल्याचे पुण्य मिळते, अशी काही भाविकांची समजूत आहे, तर अंगारक चतुर्थी ही वीस संकष्ट चतुर्थ्या केल्याचे पुण्य देते, असेही काहींचे मानणे आहे. म्हणूनच हा उपवास करणाऱ्यांची संख्या प्रचंड असते. महाराष्ट्रातल्या गावोगावच्या उपाहारगृहात या दिवशी खास उपवासाचे पदार्थ मिळत असतात.

आता जर कोणी असे म्हटले की, तुम्ही या सदराचे वाचक हे गणपतीचा उपवास करतात, तर तुमच्यापैकी बरेच लोक, ‘छे, छे, काहीतरीच काय बोलता ? आम्ही कुठले उपवास करायला ?’ असे म्हणतील, पण खरेच तुम्ही केवळ या अंगारकी संकष्टीचाच नव्हे तर प्रत्येक महिन्यातील संकष्टीचा आणि प्रत्येक विनायकीचा उपवास जाणता न जाणता, नव्हे न जाणताच करीत असताच.

असे आश्चर्याने पाहू नका! उपवास या शब्दाला श्रद्धेच्या आणि धर्मशास्त्राच्या वेगवेगळ्या यमनियमांमुळे भिन्न भिन्न स्वरुपाचे अर्थ लाभले असले तरी उपवास या शब्दाचा शब्दशः अर्थ जवळ जाणे असा आहे. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे असणे. गणपतीच्या जवळ असणे हा अर्थ जर ध्यानात घेतला तर गेली साडेचार वर्षे या सदरात गणेशोत्सवाबरोबरच प्रत्येक विनायकी आणि संकष्टीला गणपतीची शब्दांनी पूजा बांधली जाते आणि ते शब्द वाचले जातात. ते निदान वाचतांना तरी वाचक मनाने गणपतीच्या जवळ असतातच, कोणी अधिक जवळ असेल, कोणी कमी जवळ असेल, पण जे वाचले जाते, ते अजिबातच मनावर घेतले जात नाही, असे कसे होईल ? तेव्हा ‘उप-वास’ म्हणजे जवळ जाणे हा अर्थ जर ध्यानात घेतला तर वाचक गणपतीच्या जवळ जातात, गणपतीविषयी माहिती जाणून घेतात म्हणजे एकप्रकारे ‘उप-वास’ करतात, असेही म्हणता येईल.

गणपती हा केवळ कुठल्याही विशिष्ट धर्माचा, जातीचा, पंथाचा देव नाही. तो समरांगणात अग्रस्थानी लढणारा, आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा, गोड-धोड आवडीने खाणारा, शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा समाजाच्या सर्व थरांना, सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे. खरोखरच विचार करुन सांगा ज्ञान, आनंद, युद्धनेतृत्व, गायन, नर्तन, शिक्षण, चांगला आहार या गोष्टी कोणाला आवडत नाहीत ? तेव्हा अशा सर्व गोष्टींचे प्रतीक असलेल्या गणपतीविषयी दोन-चार मिनिटे का होईना, आपण जे वाचन करतो, तो म्हटले तर ‘उप-वास’च.


 – ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर | देवाचिये व्दारी पुस्तकामधून

3 comments

  1. प्रा वाघमारे

    या वर्षाच्या मकर संक्रांतीच्या विस्तार पूर्वक माहिती हवी आहे

    1. नमस्कार लवकरच तुम्हाला वेबसाईटवर किंवा आमच्या फेसबुक पेजवर वाचता येईल.

    2. नमस्कार तुम्हाला लवकरच तुम्हाला ही माहिती कालनिर्णयच्या वेबसाईटवर अथवा फेसबुक पेजवर वाचावयास मिळेल.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.