fbpx
Smartphone | Tablets | Artificial Intelligence | Android | IPhone

स्मार्ट कोण – आपण की फोन

स्मार्ट फोन्स हे सध्याच्या युगातले एक अविभाज्य अंग बनले आहे. केवळ शरीराला जोडलेला नाही म्हणून, अन्यथा त्याला अवयव हाच योग्य शब्द असू शकतो. दर काही मिनिटांनी आरशात स्वतःला न्याहाळावे तसे दर काही वेळाने स्मार्ट फोन चेक करणे हे जणू काही अपरिहार्य आहे. पण मुळात हातात असणारे हे यंत्र चालते तरी कसे? एवढ्या सगळ्या सुविधा आणि मल्टिमीडिया आपल्यात सामावून घेणारे हे मशीन काम कसे करते?

रोबोटिक्स

आज देशातील ६८ टक्के लोकांकडे स्मार्टफोन आहे. शहरात ही संख्या ७२ टक्कयापेक्षा जास्त आहे. आपल्या दैनंदिन जीवनातील कामे या फोनच्या साह्याने अगदी सुसह्य अशी झाली आहेत. एका क्लिकवर अनेक गोष्टी करणे शक्य झाले आहे. तंत्रज्ञान आणि नवीन शोधांच्या माध्यमातून यांत्रिक उपकरणांना प्रतिमानव बनविण्याच्या प्रयत्नात शास्त्रज्ञ कायमच असतात. रोबोटिक्स हे त्याच्याशी संबंधित असणारे क्षेत्र. यंत्रमानवांची निर्मिती करायची आणि त्यांना आज्ञा द्यायच्या. अर्थात तंत्रज्ञान कितीही प्रगत झालेले असले तरी अजूनही यंत्रमानव पूर्णतः स्वत:चे निर्णय स्वतः करू शकत नाही. थोडक्यात स्वतः विचार करू शकत नाही. मानवामध्ये असणारी ज्ञानेंद्रिये आणि संवेदनांसंबंधी असणारी इंद्रिये अंशतः यंत्रमानवांसाठीही तयार करण्यात आलेली आहेत. म्हणूनच हे प्रतिमानव बऱ्यापैकी स्मार्ट आहेत. आणि त्यामुळेच आपल्या हातात खिशात असणारे छोटेखानी यंत्रमानव किंवा स्मार्टफोन्स, नेक्स्ट जनरेशनचे फोन्स ठरतात.

या फोनची आपण इतकी काळजी घेतो की तो पावसात भिजू नये म्हणून त्याला विशेष कव्हर लावतो. इतकेच नव्हे तर त्याचा विमाही उतरवतो. हे सर्व आपण का करतो? तर हा फोन म्हणजे आपले चरित्रच असते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. यामध्ये आपले कॉन्टॅक्टस, ई-मेल्स, लघु संदेश आदी गोष्टी असतातच. त्याचबरोबर छायाचित्रे, काही महत्त्वाची कागदपत्रे याही गोष्टी असतात. आपण हे सर्व यामध्ये का ठेवतो तर ते सुलभ व विश्वासार्ह आहे म्हणून. याच फोनमधील इंटरनेटमधून आपण जगातील कानाकोपऱ्यातील माणसाशी संपर्क साधू शकतो. तसेच कानाकोपऱ्यातील माहितीही मिळवू शकतो. घरबसल्या शॉपिंग म्हणा किंवा चित्रपट पाहणे म्हणा अशा एक ना अनेक गोष्टी करू शकतो. हे सर्व शक्य झाले आहे ते या फोनच्या स्मार्ट निर्मितीमुळे. अर्थात ही निर्मिती केली कोणी तर ती मानवानेच.

मोबाईल – वय ४५ वर्षे

हे कालनिर्णय तुमच्या हातात येईल तेव्हा मोबाईल पंचेचाळीस वर्षांचा झाला असेल. दुसऱ्या विश्वयुद्धात टेलिफोन अस्तित्वात आला. त्यावेळी रेडिओ टेलिफोनचा वापर करण्यात आला होता. ३ एप्रिल १९७३ मध्ये ग्राफिक्स इनने ग्राफिक्स आऊटला पहिला मोबाईल फोनकॉल केला. मोटोरोला कंपनीचे इंजिनीअर मार्टिन कुपर यांनी तो कॉल केला होता. तो प्रोटोटाईप पद्धतीचा मोबाईल फोन होता.

यानंतर यावर अधिक संशोधन होत माणसाच्या हातात मोबाईल आला. भारतात मोबाईल येण्यासाठी विसाव्या शतकातील अखेरच्या दशकाची वाट पाहावी लागली. मोठ्या कंपास पेटीसारखा असलेला हा फोन कालांतराने छोटा होत गेला, पण त्याची बुद्धी मात्र वाढत गेली. तो अधिक स्मार्ट होऊ लागला. पुढे स्मार्टफोनला स्पर्शाची भाषा समजू लागली. स्मार्टफोन हे त्यातल्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरमुळेच स्मार्ट आहेत. स्मार्टफोन्समधले हार्डवेअर्स सांगायचे झाले तर कॉम्प्युटर्सप्रमाणेच स्मार्टफोन्स हे त्यातल्या प्रोसेसरमुळे कार्यरत असतात. याशिवाय कॉम्प्युटर्स चीप्सही स्मार्टफोन्सची कार्यक्षमता वाढवतात.

फोन स्मार्ट करणारा भारतीय – प्रणव मिस्त्री

मोबाईल कॅमेऱ्यांना डिजिटल कॅमेऱ्यांप्रमाणे हाय-रिझोल्युशन्स सेन्सर्स असतात. इतर चीप्स ज्या असतात त्या इंटरनेट ब्राउजिंग, म्युझिक, मल्टिमीडिया फाइल्स शेअरिंगसारख्या क्लिष्ट कामकाजासाठी वापरल्या जातात. स्मार्टफोन्समधल्या चीप्स ह्या फार महत्त्वाच्या असतात. संपूर्ण कामकाज हे या चीप्सफवरच अवलंबून असते. चीप्सची संख्या जितकी जास्त तितका तो फोन महाग. म्हणूनच अनेक कंपन्या ह्या मल्टीफंक्शनल चीप्सचा वापर करतात, जेणेकरून फोनची किंमत कमी ठेवता येते. स्मार्टफोनमधले सॉफ्टवेअर हे मोठे गमतीदार प्रकरण असते. गवताच्या गंजी कशा रचलेल्या असतात तशाच पद्धतीने सॉफ्टवेअर्सच्या गंजी फोनमध्ये रचलेल्या असतात.

हा फोन स्मार्ट करण्यासाठी एका भारतीयाचाही मोलाचा वाटा असून त्याचे नाव आहे प्रणव मिस्त्री. स्माटफोनसाठी आवश्यक असले ली सहावी संवेदना शोधण्याचे काम याने केले आणि मोबाईलचे चित्रच पालटले. गुजरातमधील एका छोट्या खेड्यात मोठा झालेला हा प्रणव तंत्रज्ञानाच्या प्रेमाने त्यात डुंबला आणि तंत्रज्ञानाचे गुरुकुल अशी ओळख असलेल्या एमआयटी या संस्थेत प्रवेश मिळवून तेथे त्याने जगभरातील तंत्रपंडितांना थक्क करणारा सहाव्या संवेदनेचा प्रयोग करून दाखवला. आजही त्याची सहावी संवेदना स्मार्टफोनच्या निर्मितीत मोलाची भूमिका बजावत आहे आणि भविष्यातही बजावत राहणार आहे. अगदी पोकेमॉन गो या खेळापासून सर्वच ठिकाणी ही संवेदना उपयोगी ठरत आहे.

स्मार्ट फोन पुरेसा नाही तर स्मार्ट घड्याळाचीही निर्मिती झाली. या सर्वामुळे आपण अगदी सुसह्य असे तंत्रजीवन जगत आहोत. अनेकदा आपल्या मनासारखी एखादी गोष्ट एका क्लिकवर घडली की आपण अगदी आनंदाने शब्द उच्चारतो, ‘काय भारी तंत्रज्ञान आहे!’ पण या तंत्रज्ञानाची निर्मिती हा मानवच करत असतो, हेही तितकेच खरे आहे. यामुळे फोन कितीही स्मार्ट झाला तरी तो विकसित करणारा आणि त्याचा स्मार्ट वापर करणारा हा माणूसच आहे.

Human intelligence VS Artificial intelligence

जगभरात मानवी बुद्धिमत्तेला कृत्रिम बुद्धिमत्तेने आव्हान देण्याचे काम सुरू आहे. हे काम झाले तरी ते मानवाच्या बुद्धिमत्तेतूनच होणार आहे. यामुळे यंत्र कितीही स्मार्ट झाले तरी ते माणसाच्या बुद्धिमत्तेला रोखू शकत नाही. एकमात्र नक्कीच होऊ शकते ते म्हणजे नवीन पिढी जुन्या गोष्टींची कात टाकत पुढे जाऊ शकते. सध्याच्या संगणकीय युगात तरुण पिढीला लिखाणाची सवय राहिली नसल्यामुळे त्याचा परिणाम पुढच्या पिढीवर दिसू लागला आहे. जगभरातील काही प्रगत देशांमध्ये नवीन पिढीत लिखाणासाठी आवश्यक असलेल्या पेशींची वाढच मर्यादित राहिल्याचे संशोधनात आढळून आले आहे. पण यामुळे त्यांचे काही अडेल असे नाही. कारण ती पिढी थेट संगणकाशी स्वत:चे नाते जोडू लागली आहे. म्हणजे तंत्रज्ञानाने या पिढीचे व्यक्त होण्याचे माध्यम बदलले, त्यांची विचार करण्याची पद्धत बदलली. मात्र हे तंत्रज्ञान त्यांच्यापेक्षा जास्त विचार करू शकले नाही. तंत्रज्ञानाला विचार करण्यासाठी माणसाची मदत घ्यावीच लागते.

म्हणून खिशातील फोन स्मार्ट झाला तरी तो मानवी बुद्धिमत्तेला आव्हान देऊ शकणार नाही हेच खरे!


 – नीरज पंडित

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.