सावता माळी आणि बालरुपी पांडुरंग

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   July 22, 2017 in   मराठी लेखणी

माळियाचे वंशी, सांवता जन्मला । पावन तो केला । वंश त्याचा ॥

त्याजसवें हरी, खुरपूं लागे अंगी । धांवूनी त्याच्यामागें । काम करी ॥

पीतांबर कास, खोवोनी माघारी । सर्व काम करी । निज अंगे ॥

एका जनार्दनीं, सांवता तो धन्य । तयाचें महिमान । न कळे कांही ॥

सावता माळी हे ज्ञानदेव, नामदेव यांचे समकालीन. पंढरपूरजवळ अरणभेंडी या गावी ते राहात असत. सावता माळी ह्यांचा

कांदा मुळा भाजी । अवघी विठाबाई माझी ॥

लसूण मिरची कोथिंबीरी । अवघा झाला माझा हरी ॥

ऊंस गाजर रताळू । अवघा झालासे गोपाळू ॥

मोट नाडा विहीर दोरी । अवघी व्यापिली पंढरी ॥

सांवता म्हणे केला मळा । विठ्ठल पायीं गोविला गळा ॥

हा अभंग प्रसिद्ध आहे. आपण जे काही करतो ती विठ्ठलाचीच पूजा आहे, असा सांवता माळी यांचा दृढ विश्र्वास होता. आपल्या संतमंडळीत सर्व जातीचे, सर्व व्यवसायाचे आणि सर्व वर्णांचे प्रतिनिधी आहेत. इतकेच नव्हे, तर इतर धर्मांचेही संत आपल्याकडे झाले आहेत. परधर्मात जन्माला आले असले तरी ते पांडुरंगाचे अनन्य भक्त झाले आणि आपल्याकडच्या इतर संतांप्रमाणेच त्यांनी पांडुरंगाची प्राप्ती तर करून घेतलीच, पण संतमंडळीत गौरवाचे आणि सन्मानाचे स्थानही मिळविले.

सावता माळी आणि बालरुपी पांडुरंग

एकदा ज्ञानदेव, नामदेव आणि पांडुरंग असे कूर्मदास नावाच्या एका संताच्या भेटीला चालले होते. वाटेत सावता माळी यांचे गाव अरणभेंडी लागले. तेव्हा पांडुरंगाने ‘तुम्ही येथेच थांबा, मी सांवत्यास भेटून येतो’ असे सांगितले. पांडुरंगाला गंमत करण्याची लहर आली. तो धावत धावत सावता माळयाकडे गेला आणि म्हणाला, ‘माझ्या मागे दोन चोर लागले आहेत, मला कुठेतरी लपव.’ सावत्याने बालरूप घेतलेल्या पांडुरंगाला आपल्या पोटावर बांधले आणि वरून उपरणे किंवा कांबळे बांधले. ज्ञानदेव आणि नामदेव पांडुरंगाची वाट पाहून थकले आणि पांडुरंगाला शोधत सावता माळयाच्या मळयापर्यंत आले. त्यांनी पांडुरंग कुठे आहे, याची चौकशी केली. ज्ञानदेव आणि नामदेव दोघेही ज्ञानी होते. त्यांना सावत्याच्या पोटापाशी पांडुरंग आहे हे समजले आणि मग सावता माळी यांना बरोबर घेऊनच हे तिघेही कूर्मदासाला भेटायला गेले. ह्या कथेत एक असा अतिरंजित भाग आहे की, सावता माळी यांनी आपले पोट चिरून आत पांडुरंगाला ठेवले. ही कथा सत्य-असत्याच्या कसोटीवर तपासून पाहणे शक्य नसले तरी पोट चिरून आत पांडुरंगाला ठेवण्याइतपत ताणण्याची काही गरज आहे, असे वाटत नाही. सावता माळी आणि पांडुरंग यांचे अगदी जवळचे संबंध होते, एवढे जाणता आले तरी पुष्कळ झाले.

सावता माळी हे आपल्या दैनंदिन कामकाजात विठ्ठलाचेच रूप पाहात असत. त्यांच्या सासुरवाडीचे लोक एकदा त्यांच्याकडे आले. सावता माळी भजनात रंगून गेले होते. त्यांनी सासुरवाडीच्या लोकांकडे लक्ष दिले नाही. पत्नी संतापली, त्यावेळी त्यांनी आपल्या पत्नीला जो उपदेश केला तो पुढीलप्रमाणे –

प्रपंचीं असूनि परमार्थ साधावा । वाचे आठवावा पांडुरंग ॥

उंच नीच कांही न पाहे सर्वथा । पुराणींच्या कथा पुराणींच ॥

घटका आणि पळ साधीं उतावीळ । वाउगा तो काळ जाऊं नेदी ॥

सावता म्हणे कांते जपें नामावळी । हृदयकमळी पांडुरंग ॥

आपल्या कामात परमेश्र्वर पाहणारे, काम हाच परमेश्र्वर अशी दृढ श्रद्धा बाळगणारे आणि स्वतःच्या पत्नीसही अधिकारवाणीने परमार्थाचा उपदेश करणारे सावता माळी त्यांच्या काळात महाराष्ट्राच्या भक्तीच्या मळयाची मनोभावे जपणूक करीत होते, हे आपले भाग्यच नाही काय ?


 – ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर (देवाचिये व्दारी पुस्तकामधून )

संदर्भ टीप –

  • माळियाचे वंशी – एकनाथ – ससंगा, आवटे, व्दि. आ. खंड २, पृ. ४०५, अभंग ३६७६.
  • प्रपंचीं असूनि परमार्थ साधावा । – संत सांवता माळी यांचा हा अभंग ढेरे संपा. ससंगामध्ये दिलेला नाही.