September 11, 2024
डॉ. संजय देशमुख | कालनिर्णय | जुलै २०१७ | मुंबई विद्यापीठ |

शिक्षणाच्या नव्या दिशा

अनेक प्रगत देशातल्या विविध शिक्षणव्यवस्था आणि त्यांच्या सर्वोत्तमतेचा मला काहीसा अनुभव आहे. मात्र माझे निकटचे नाते भारतीय शिक्षणव्यवस्थेशी आहे. मी केवळ मुंबई विद्यापीठाचा विद्यार्थी नाही; तर या मातृसंस्थेत शिक्षक होण्याचे आणि आता या विद्यापीठाचा कुलगुरू होण्याचे भाग्यही मला लाभले आहे. शिकण्याची प्रक्रिया ही शेवटच्या श्र्वासापर्यंत सतत सुरूच असते. आजचे जग हे कालच्यासारखे कधीच नसते, हे सत्य एकदा लक्षात घेतले की, तुम्हाला बदलाशिवाय पर्याय राहात नाही. जगभरातल्या अनेक मान्यवरांना त्यांच्या नशिबाने साथ दिली म्हणून एखाद्या पदावर पोहोचता आले आहे किंवा यश मिळाले आहे, असे तुम्हाला वाटेल ! असे म्हणताना त्यांच्या कष्टांना कमी लेखून चालणार नाही. त्यांच्या यशात त्यांच्या शिक्षकांची, पालकांची साथही तितकीच महत्त्वाची ठरली आहे.

वाचकहो, बालवाडी, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, महाविद्यालय आणि अगदी विद्यापीठ – या सर्व पातळयांवरील शिक्षणाचा हेतू असतो तो म्हणजे एक उत्तम पाया निर्माण करणे आणि माणसाच्या आयुष्याचा योग्य दिशेने प्रारंभ करून देणे. इथे मला स्वामी विवेकानंदांचे एक वचन उद्धृत करावेसे वाटते, ‘जे शिक्षण सर्वसामान्य माणसाला जीवनातील संघर्षासाठी तयार करत नाही; जे शिक्षण माणसाला शीलवान करत नाही; त्याला दानशूर करत नाही आणि त्याला सिंहाचे धैर्य देत नाही ते शिक्षण काय कामाचे ?’ शिक्षणाचे फळ म्हणजे उत्तम चारित्र्य आणि योग्य वर्तणूक ! माझ्या मते विद्यापीठे म्हणजे केवळ ज्ञान देणारी आणि विद्यार्थ्यांना नोकरीसाठी तयार करणारी केंद्रे नव्हेत; तर विद्यापीठे ही प्रज्ञेची देवालये आहेत म्हणून मला असा विश्र्वास वाटतो की, केवळ विद्यापीठाच्या माध्यमातूनच ज्ञानदान करून आपल्याला शिक्षणक्षेत्र, उद्योग आणि समाज यांच्यातील देवघेव अधिक अर्थपूर्ण आणि व्यापक करता येईल. त्यातून ज्ञानाधारित अर्थव्यवस्था आणि सक्षम डिजीटल सोसायटी यांची निर्मितीही शक्य होणार आहे.

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नवीन व्यवसायाला पोषक अशा वातावरणाचे वरदान आपल्या भारताला लाभले आहे. त्यांत दर्जेदार विद्यापीठे, संशोधन संस्था, प्रशिक्षित आणि गुणवान असे मनुष्यबळ, तंत्रज्ञान संस्था, जोखीम भांडवल पुरविणाऱ्या कंपन्या तसेच व्यावसायिकांचे जाळे निर्माण करणाऱ्या संघटना यांचा समावेश आहे. राज्य आणि केंद्र सरकारने अनेक उपक्रम सुरू केले आहेत. त्यामध्ये “Make in India”, “Make in Maharashtra”, “Digital India”, “Start-up India” आणि “Skill India” यांचा समावेश होतो. मुंबई विद्यापीठाने या दिशेने ठोस पावले टाकत अनेक नवीन उपक्रम हाती घेतले आहेत. यामध्ये वर्तनविषयक प्रयोगशील समाजशास्त्रीय अभ्यास केंद्र, निद्राभ्यास केंद्र, ग्रामीण उपजीविका संधींसाठी बांबू संशोधन केंद्र, भाषिक व लोककला स्त्रोत आणि लेखागार स्त्रोत यांचे दस्तावेजीकरण आणि विश्लेषण, सर्वसमावेशक नेतृत्व विकासासाठी प्रशिक्षण कार्यक्रम या उपक्रमांचा समावेश आहे. याव्दारे विद्यापीठाची सर्वसमावेशक नागरी धोरण जोपासणारे राष्ट्रपीठ अशी ओळख घडू लागली आहे.

जिथे पारंपरिक शिक्षण जागतिक आव्हानांचा सामना करू शकेल का अशी समाजाची धारणा होते, अशा वेळी मुंबई विद्यापीठासारख्या भारतातील पहिल्या तसेच पारंपरिकतेची कास न सोडता आधुनिकतेचा वसा घेऊन काम करणाऱ्या विद्यापीठांसमोर खरे आव्हान कोणते असेल तर ते समाजाचा आपल्यावरील विश्र्वास अजून दृढ करणे ! आणि तो मुंबई विद्यापीठाने आपल्या सर्व अभ्सासक्रमांना नव्या रूपाने तरूण पिढीपुढे मांडून साध्य केला आहे. देशाच्या ‘स्किल इंडिया’ उपक्रमाचा आदर्श डोळयासमोर ठेवत विद्यापीठाने अनेक नव्या उपक्रमांची आखणी तर केली आहेच; परंतु समक्ष शिक्षण आणि दूरशिक्षण या माध्यमांवरच अवलंबून न राहता केवळ आर्थिक विवंचनेमुळे पदव्युत्तर शिक्षण घेऊ न शकणाऱ्या आपल्या ९० टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना डोळयासमोर ठेवून त्यांच्यापर्यंत ज्ञानगंगा पोहोचावी, या भावनेने मुंबई विद्यापीठाने ऑनलाईन अभ्यासक्रमही तयार केले आहेत. या अनुषंगाने मुंबई विद्यापीठाने परदेशी विद्यापीठाबरोबर पारंपरिक समक्ष शिक्षण व्दिपदवी अभ्यासक्रम तयार केले आहेत. त्याचबरोबर पदवी आणि पदव्युत्तर पातळीवर चालणारे मुंबई विद्यापीठाचे सर्वच्या सर्व अभ्यासक्रम एकाच वर्षी बदलून त्यात प्रकल्प-अभ्यास पद्धतीचा अंतर्भाव करणारे मुंबई विद्यापीठ हे जगातले पहिले विद्यापीठ ठरले आहे. याचबरोबर पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा गाभा न बदलता चारऐवजी तीनच सत्रांमध्ये विकसित केला असून या शैक्षणिक वर्षात राबविण्याची योजना विद्यापीठाने आखली आहे. असे झाले तर मुंबई विद्यापीठ हे खऱ्या अर्थाने जागतिकीकरणाच्या प्रक्रियेतील जगातील सर्व विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांशी साधर्म्य साधणारे पहिले भारतीय विद्यापीठ ठरेल असे मी नम्रपणे सांगू इच्छितो.

ज्ञाननिर्मिती, ज्ञानविकास आणि ज्ञानप्रसार हा नव्या सहस्त्रकाचा मंत्र असेल. यामुळेच ऑनलाईन शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होईल. नेतृत्व विकासाचे अभ्यासक्रम विद्यापीठाने विकसित करावेत. त्यासाठी आपल्याला पर्याप्तता, समन्यायता आणि श्रेष्ठत्व या त्रिसूत्रींचा तसेच स्वायत्तता, लवचिकता आणि सक्षमता याचा आधार घ्यावा लागेल. भारत हा नव-उद्यमींचा देश आहे ही भारताची नवी ओळख साकार होऊ लागली आहे आणि ती ठसठशीतपणे उभी राहायला शिक्षणसंस्थांचा हातभार लागला पाहिजे. मुंबई विद्यापीठ जगाला ज्ञानाधारित नेतृत्व देईल, असा मला विश्र्वास वाटतो.


 – डॉ. संजय देशमुख (कुलगुरु, मुंबई विद्यापीठ) । कालनिर्णय । जुलै २०१७ 

कालनिर्णयचे फेसबुक पेज Like करा.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.