विजयी माझा श्रीहनुमान !

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   April 18, 2019 in   मराठी लेखणी

बलभीम मारुतीचे वैशिष्ट्य काय? एक महत्त्वाची गोष्ट अशी की, मारुती कधीही पराभूत झालेला नाही. अवघड प्रसंगी त्याला आपल्या अंगच्या अद्भुत शक्तीची जाणीव होते आणि तो कोणत्याही बिकट प्रसंगातून सहजपणे मार्ग काढतो. मध्वमुनीश्र्वरांनी मारुतीरायाच्या पराक्रमाचे वर्णन करणारे एक सुंदर पद लिहिले आहे. मध्वमुनीश्र्वरांच्या इतर रचनांप्रमाणेच हे पद्सुद्धा प्रासादिक आणि मधुर असे आहे. विजयी माझा श्रीहनुमान। अंजनीनंदन शौर्यनिधान॥ उपजत ज्याने दिनमणि धरिला। आम्रफळाचा जाणुनि वान॥ मी ज्याला सार्थ अभिमानाने माझाअसे म्हणू शकतो, तो श्रीहनुमान निरंतर विजयी होणार आहे. तो जिथे जाईल तिथे यश आणि जय त्याला सामोरे येत असतात. मारुती हा जणू शौर्याचा साठा आहे. तो म्हणजे मूर्तिमंत शौर्य आहे. त्याने जन्मल्याबरोबरच नुकत्याच उगवू लागलेल्या सूर्याकडे झेप घेतली. त्याला वाटले ते एक आंब्याचे फळच आहे. अंतक कलियुगीं ताम्रमुखाचा। साजे सुग्रीवास प्रधान॥ कौपिन कटितटिं हाटकाचा। कपिकटकाचा मुख्य प्राण॥ हा सिंदूरवर्णी मारुतीराया सुग्रीवास प्रधान म्हणून शोभणारा त्याचा सेनापती आहे. घेऊनि मुद्रा तरुनि समुद्रा। गेला आला हे महिमान॥ अखया मारुनि लंकेशाला। दिधले रंकाचे उपमान॥ वन विध्वंसुनी दशवदनाचा। केला दाटुनिया अपमान॥ जाळित सुटला नगरी तेव्हा। साह्य झाला तो पवमान॥ प्रभु रामचंद्रांच्या हातातील अंगठी घेऊन तो सीतेला शोधण्यासाठी समुद्र पार करून गेला. लंकेतील अशोकवन त्याने विध्वंसून टाकले. राक्षसांनी त्याला पकडले तेव्हा तो सगळी लंकानगरी पेटवीत सुटला, त्या वेळी त्याचे वडील म्हणजे जे वायुदेव त्यांनी त्याला मदत केली. सीता शुद्धिस घेऊनि आला। गौरवी जाला श्रीभगवान॥ शोकविनाशक जानकीचा। म्हणउनि राघव दे बहुमान॥ द्रोणाचल रणीं घेऊनी आला। वांचवी राघवबंधु सुजाण॥ पतीविरहाच्या दु:खातून सीतेची त्याने सुटका केली. रामाचा भाऊ लक्ष्मण याला वाचविण्यासाठी तो द्रोणागिरी घेऊन आला. कपटी काळनेमीस निवटी। करुनि तपोवनिं ते जलपान॥ उपवासप्रिय तो शनिवारी। दोषनिवारक तें अभिधान॥ असा हा मारुति शनिवारी उपोषण केल्यामुळे प्रसन्न होतो, दोष दूर करतो. वज्रशरीरी कीर्तनी उभा। श्रीरामाचे हें वरदान॥ त्रिभुवनिं ज्याला विषम न भासे। ब्रह्म सनातन सर्व समान॥ मर्कट बळकट ब्रह्मचारी। धरि निजदासाचा अभिमान॥ मध्वमुनीश्र्वर बलभीमाचा। अनुचर येथे का अनुमान॥ जिथे जिथे प्रभू रामचंद्रांचे गुणगान चालले असेल तिथे तिथे मारुतीराय उपस्थित असतात असा पूर्वसुरींचा निर्वाळा आहे. रामगुणसंकीर्तनाला सर्वांच्या आधी मारुती येतो आणि सर्वांत शेवटी जातो असे सांगतात. मध्वमुनीश्र्वर हे बलभीमाचे दास आहेत आणि त्यांच्या या दास्यभक्तीबद्दल कोणीही शंका घेण्याचे कारण नाही.

संदर्भ टीप –

विजयी माझा श्रीहनुमान। – संतकवी मध्वमुनीश्र्वर मध्वमुनीश्र्वरांची कविता – संपादक व प्रकाशक प्रल्हाद व्यंकटेश गुब्बी. भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे, १९३३. पद १३७, पृ.४३ व ४४.