माझ्या यशाचे रहस्य

Published by सुनील गावस्कर on   July 10, 2017 in   मराठी लेखणी

एकाग्रता म्हणजे संपूर्ण चित्त एकाच विषयावर केंद्रित करून, त्यात प्रावीण्य आणि यश मिळविणे होय. हा विषय कधी प्रत्यक्ष नजरेला दिसणारा असेल तर कधी कल्पनेतला! एखाद्या कल्पनेतला वास्तवात आणून तिला मूर्त स्वरूप देण्यासाठी शरीरातील स्नायूनस्नायू आणि मनातील विचारनविचार त्या गोष्टीवर केंद्रित होणे आवश्यक आहे. माझ्या मते एकाग्रतेची ही ढोबळ व्याख्या आहे.
ऋषी आणि महर्षींना ध्यानधारणा करताना विचारांची संगती साधण्यासाठी एकाग्रचित्त करण्याची मोठी क्षमता असे. परंतु दैनंदिन जीवन जगणाऱ्या सामान्य माणसांना तेवढी नसली, तरी एकाग्रतेची थोडी-बहुत क्षमता, प्रयत्न केल्यास लाभू शकते. एकाग्रता प्राप्त करण्याचे निश्चित असे मार्ग उपलब्ध नाहीत. जे काही व्यायाम आणि मार्ग सांगितले आहेत ते क्वचितच उपयोगी पडतात. स्वतःला ऋषी म्हणवून घेण्यासाठी काही लोक या मार्गाचा अवलंब करताना दिसतात. खरे तर प्रत्येकाने आपल्या व्यवसायापुरते चित्त एकाग्र केले तर बरेच काही साध्य होऊ शकते. जसे डॉक्टरने रोग्याच्या रोगनिदानावर, वकिलाने त्याच्या खटल्यावर किंवा खेळाडूने त्याच्या खेळावर एकाग्रचित्त केले, तरी खूप काही साधता येईल. माझ्या मते एकाग्रतेची देणगी ही दैवदत्त असते आणि मनुष्य त्यात परिश्रमांनी भर घालू शकतो, तिची तीव्रता वाढवू शकतो. छोट्या कालावधीसाठी एकाग्रता साधणे कठीण असते. कारण कमी काळात चित्ताची एकाग्रता बिघडविणारी अनेक प्रलोभने यशाच्या मार्गात उभी राहतात.

एकाग्रतेचा राजा – जेफ्री बॉयकॉट

क्रिकेटच्या खेळातील एकाग्रतेचा राजा म्हणून जेफ्री बॉयकॉटचे नाव घेता येईल. फलंदाजी करताना त्याची एकाग्रता मुळीच ढळत नसे. समोरच्या संघाने शेरे मारून डिवचावे किंवा गर्दीने हुल्लड करावी, बॉयकॉटवर त्याचा अजिबात परिणाम होत नसे. फलंदाजीची त्याला इतकी आवड होती की, बाद झाल्यावर क्रिझ सोडणे त्याच्या जीवावर येत असे. नंतर कोणी विरुद्ध संघाने केलेल्या शेरेबाजीविषयी विचारले असता ‘ कोणते शेरे?’ असे तो गंभीरपणे विचारीत असे. याचा अर्थ इतकाच की, त्याची एकाग्रता पराकोटीची होती आणि त्या एकाग्र चित्तानेच त्याला धावांचा पाऊस पाडणारा यशस्वी फलंदाज बनविले.

एकाग्र रोहन कन्हाय आणि गॅरी सोबर्स

रोहन कन्हाय आणि गॅरी सोबर्स (सर गारफिल्ड सोबर्स) या दोन प्रसिद्ध खेळाडूंत तुलना केली असता, जुन्या-जाणत्यांच्या मते कन्हाय हा सोबर्सपेक्षा फलंदाजीत अनेक बाबतीत सरस होता. परंतु सोबर्सने एकाग्र चित्तामुळे कन्हायपेक्षा बऱ्याच अधिक धावा काढल्या. विरोधी संघाचा एखादा जळजळीत शेरा कन्हायचे चित्त विचलित करून टाकीत असे आणि तो बाद होत असे. सोबर्स मात्र अत्यंत थंड प्रवृत्तीने कोणत्याही शेऱ्यावर मुळीच प्रतिक्रिया देत नसे. मग तो मैदानात असो वा मैदानाबाहेर! सोबर्स हा अष्टपैलू खेळाडू होता. त्याची गोलंदाजी समोरच्या संघाला अत्यंत धोकादायक ठरत असे. परंतु सोबर्स हा नेहमी अत्यंत शांतचित्त आणि मोकळा असा भासत असे. कदाचित शांतचित्त आणि मोकळेपणा या गुणांमुळेच त्याला एकाग्रतेची शक्ती प्राप्त झाली असावी आणि म्हणूनच तो जगातील एक सर्वोत्कृष्ट खेळाडू झाला असावा.

वाचा: मी सचिन….!

वेगवेगळ्या लोकांना चित्त एकाग्र करण्याचे वेगवेगळे मार्ग, त्यांच्या आवडी-निवडी आणि वकुबानुसार चोखाळता येतात आणि एकाग्रता प्राप्त करण्याचे मार्ग हे ज्याने त्याने ठरवावयाचे असतात. एकाग्र चित्ताने आपल्या कार्यक्षेत्रात कार्यरत राहणाऱ्या कर्मयोग्यांना यशश्री माळ घालते आणि त्यांच्या क्षेत्रातील विजयपदावर नेऊन विराजमान करते, एवढे मात्र मी निश्चितपणे म्हणू शकेन. तेव्हा माझ्या दृष्टीने तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हावयाचे असेल तर मुळात चित्त एकाग्र करावयास शिकले पाहिजे आणि ज्या कार्यक्षेत्रात यशस्वी व्हावयाचे आहे त्या कार्यक्षेत्रात एकाग्र चित्तानेसतत काम करत राहिले पाहिजे. ज्यांना यशस्वी होऊन कोणत्याही क्षेत्रात स्वतःचे असे स्थान निर्माण करावयाचे असेल त्याने एकलव्य आणि अर्जुन या दोघांपासून स्फूर्ती घेणे आवश्यक आहे, असे मला वाटते.


 – सुनील गावस्कर । कालनिर्णय । जून १९९४ 

कालनिर्णयचे फेसबुक पेज Like करा.