September 16, 2024

त्र्यंबक बापूजी ठोंबरे – बालकवी | फुलराणी

बालकवींची ‘ फुलराणी ‘ ही नितांतसुंदर कविता मराठी भाषेतील काव्यसौंदर्याचे एक मनोहर शब्दशिल्प आहे. या कवितेतील कल्पकता, तिचे भाषावैभव, भावलाघव हे सगळे इतके मोहक आहे की, बालकवी म्हटल्यावर फुलराणीचीच आठवण व्हावी.

हिरव्या हिरव्या गवताच्या मखमालीच्या गार गालिच्यावर फुलराणी खेळत होती. आईबरोबर झोपाळ्यावर बसून गाणी गावीत आणि आनंदात रमावे, हेच त्या अल्लड, अवखळ आणि अजाण मुलीचे जीवन होते. या तिच्या जीवनक्रमात एकदा खट्याळ वाऱ्याची एक झुळूक आली. फुलराणीच्या अजाण, अबोध मनात त्या वाऱ्याने एक विचाराची लहर सोडून दिली. संध्यासमयीचा रविकिरण फुलराणीला आवडला का? असे त्या वाऱ्याने मिश्कीलपणे हसत विचारल्यावर फुलराणीच्या मनात जणू प्रेमाचा कोमल अंकुर उमलला आणि ती लाजून चूर झाली.

त्या संध्याकाळनंतरच्या रात्रीत सगळे जग झोपी गेले, पण बेचैन झालेली फुलराणी मात्र जागीच राहिली. रात्री रानातल्या वनदेवता प्रकट झाल्या, हासू-नाचू-बागडू लागल्या. सगळे रान वनदेवतांच्या आगमनामुळे प्रफुल्लित झाले. फुलराणी मात्र आपल्याच प्रेमस्वप्नात दंग होती. आकाशात कुणी कुणाशी प्रेमाचे चाळे करीत होते. आभाळातल्या प्रेमदेवता अवखळ वाऱ्याच्या संगतीत फिरत-फिरत अवनीवर आल्या आणि त्या देवतांनी म्हटले, हीच आमची फुलराणी!

रात्र संपली, पहाट झाली. अनादि काळापासून अनंतापर्यंत चाललेली आकाशातील ग्रहताऱ्यांची शर्यत सूर्याच्या आगमनाची चाहूल लागताच दृष्टीआड झाली. पृथ्वी जणू धुक्याचे धूसर वस्त्र लेऊन प्रातःकालीन आनंदात रमली होती. फुलराणी मात्र आपल्याच विश्वात विहरत होती. तेवढ्यात उभ्या आकाशाचा जणू विवाहमंडप झाला. नित्य नवा भासणारा सूर्यप्रकाशाचा रुपेरी झोत दाही दिशांमधून आकार घेऊ लागला. प्रातःगान करणारे पक्षी रंगीबेरंगी पिसाऱ्यांचे अंगरखे घालून आकाशाच्या विस्तीर्ण विवाहमंडपात झेपावू लागले. लाल फेटे बांधलेले अरुणशिखी कोंबडे पहाट झाल्याचे तारस्वरात आरवून जगाला सांगू लागले.

गाणारा चंडोल सौभाग्यकांक्षिणी फुलराणीच्या लग्नाची वार्ता दाहीदिशांना पोहोचवू लागला. सगळे पक्षी, सगळे जग गाऊ लागले, नाचू लागले. झऱ्याचे वाहणे वाद्यांचा ताल सांभाळ- लागले. वंशवनात फिरणारा वारा सनईच्या सुरांनी आसमंत प्रसन्न करू लागला आणि सकाळ झाली. काल संध्याकाळी दिसलेला रविकिरण पुन्हा दिसला. निसर्गराजाने उभारलेला दवाचा अंतरपट दूर झाला आणि रविकिरणाचे फुलराणीशी लग्न झाले. फुलराणीच्या आशा-आकांक्षा सफल झाल्या. सगळी सृष्टी या प्रेमविवाहाने प्रमुदित झाली, प्रसन्न झाली!

रोज सूर्य उगवतांना आपण सारेच पाहतो. बालकवींच्या प्रतिभेला मात्र या नित्य परिचयाच्या घटनेतून चिरस्मरणीय असे काव्य सुचले. तुम्हाला माहीत आहे, आपला दिवस सूर्योदयाबरोबरच सुरू होतो. आपली भारतीय कालगणना सूर्योदयाला जी तिथी असेल ती त्या दिवसाची तिथी असे मानते. सूर्याच्या उदयाच्या वेळी जो वार असेल त्या वाराच्या नावाने आपण तो दिवस ओळखतो. तुम्ही म्हणाल, ह्यात विशेष ते काय? विशेष आहे, महाराजा!

खिस्ती कालगणनेचा दिवस मध्यरात्रीपासून सुरू होतो. मुसलमानी कालगणना सूर्य मावळल्यावर दिवस सुरू झाला, असे मानते आणि आपण अखिल विश्वाचा सर्वाधार असलेल्या सूर्यदेवतेच्या उदयाच्या प्रसन्न समयी नव्या दिवसाचा, नवीन तिथीचा, नवीन वाराचा प्रारंभ झाला, असे गेली सहस्रावधी वर्षे मानीत आलो आहोत.

आहे ना ध्यानात घेण्यासारखी गोष्ट?

फुलराणी

हिरवे हिरवेगार गालिचे – हरित तृणाच्या मखमालीचे;

त्या सुंदर मखमालीवरती – फुलराणी ही खेळत होती.

गोड निळ्या वातावरणात – अव्याज-मने होती डोलत;

प्रणयचंचला त्या भ्रूलीला – अवगत नव्हत्या कुमारिकेला,

आईच्या मांडीवर बसुनी – झोके घ्यावे, गावी गाणी;

याहुनि ठावे काय तियेला – साध्या भोळ्या फुलराणीला ?

पुरा विनोदी संध्यावात – डोलडोलवी हिरवे शेत;

तोच एकदा हासत आला – चुंबून म्हणे फुलराणीला-

“छानी माझी सोनुकली ती – कुणाकडे ग पाहत होती ?

कोण बरे त्या संध्येतून – हळुच पाहते डोकावून ?

तो रविकर का गोजिरवाणा – आवडला अमुच्या राणींना ?”

लाजलाजली या वचनांनी – साधी भोळी ती फुलराणी !

आन्दोली संध्येच्या बसुनी – झोके झोके घेते रजनी;

त्या रजनीचे नेत्र विलोल – नभी चमकती ते ग्रहगोल !

जादूटोणा त्यांनी केला – चैन पडेना फुलराणीला;

निजली शेते, निजले रान, – निजले प्राणी थोर लहान.

अजून जागी फुलराणि ही – आज कशी ताळ्यावर नाही ?

लागेना डोळ्याशी डोळा – काय जाहले फुलराणीला ?

या कुंजातुन त्या कुंजातुन – इवल्याश्या या दिवट्या लावून,

मध्यरात्रिच्या निवान्त समयी – खेळ खेळते वनदेवी ही.

त्या देवीला ओव्या सुंदर – निर्झर गातो; त्या तालावर –

झुलुनि राहिले सगळे रान – स्वप्नसंगमी दंग होउन!

प्रणयचिंतनी विलीनवृत्ति – कुमारिका ही डोलत होती;

डुलता डुलता गुंग होउनी – स्वप्ने पाही मग फुलराणी –

“कुणी कुणाला आकाशात – प्रणयगायने होते गात;

हळुच मागुनी आले कोण – कुणी कुणा दे चुंबनदान !”

प्रणयखेळ हे पाहुनि चित्ति – विरहार्ता फुलराणी होती;

तो व्योमीच्या प्रेमदेवता – वार्यावरती फिरता फिरता –

हळूच आल्या उतरुन खाली – फुलराणीसह करण्या केली.

परस्परांना खुणवुनि नयनी – त्या वदल्या ही अमुची राणी !

स्वर्गभूमीचा जुळ्वित हात – नाचनाचतो प्रभातवात;

खेळुनि दमल्या त्या ग्रहमाला – हळुहळु लागति लपावयाला

आकाशीची गंभीर शान्ती – मंदमंद ये अवनीवरती;

विरू लागले संशयजाल, – संपत ये विरहाचा काल.

शुभ्र धुक्याचे वस्त्र लेवुनि – हर्षनिर्भरा नटली अवनी;

स्वप्नसंगमी रंगत होती – तरीहि अजुनी फुलराणी ती!

तेजोमय नव मंडप केला, – लख्ख पांढरा दहा दिशाला,

जिकडे तिकडे उधळित मोती – दिव्य वर्हाडी गगनी येती;

लाल सुवर्णी झगे घालुनी – हासत हासत आले कोणी;

कुणी बांधिला गुलाबि फेटा – झकमणारा सुंदर मोठा!

आकाशी चंडोल चालला – हा वाङनिश्चय करावयाला;

हे थाटाचे लग्न कुणाचे – साध्या भोळ्या फुलराणीचे !

गाउ लागले मंगलपाठ – सृष्टीचे गाणारे भाट,

वाजवि सनई मारुतराणा – कोकिळ घे तानावर ताना!

नाचु लागले भारद्वाज, – वाजविती निर्झर पखवाज,

नवरदेव सोनेरी रविकर – नवरी ही फुलराणी सुंदर !

लग्न लागते! सावध सारे! सावध पक्षी ! सावध वारे !

दवमय हा अंतपट फिटला – भेटे रविकर फुलराणीला !

वधूवरांना दिव्य रवांनी, – कुणी गाइली मंगल गाणी;

त्यात कुणीसे गुंफित होते – परस्परांचे प्रेम ! अहा ते !

आणिक तेथिल वनदेवीही – दिव्य आपुल्या उच्छवासाही

लिहीत होत्या वातावरणी – फुलराणीची गोड कहाणी !

गुंतत गुंतत कवि त्या ठायी – स्फुर्तीसह विहराया जाई;

त्याने तर अभिषेकच केला – नवगीतांनी फुलराणीला !


 – ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर | देवाचिये व्दारी

2 comments

  1. बालभारतीच्या कवितेची गाणी - भाग ६वा : इयत्ता ६वी - Balbharati Poem Songs - 6 - माझी लेखमाला

    […] ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर यांनी … […]

  2. सुदर्शन पाटील

    खुप सुंदर कविता

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.