आदिविनायक

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर on   May 8, 2019 in   मराठी लेखणी

आपल्याकडे गणपती हे दैवत इतके लोकप्रिय आहे की, त्याच्या प्रत्येक क्षेत्राबद्दल, स्थानाबद्दल काही ना काही कथा, कोणता ना कोणता तरी विशिष्ट आचार, प्रथा रूढ झालेली दिसते. आता हेच पाहाना. दक्षिणेत रामेश्र्वरपुरम् या शहराच्या ईशान्येला साधारण २० मैलांवर गणपतीचे एक देऊळ आहे. त्याचे तिथले नाव आहे वेय्यिगुलनाथ. श्रीरामाने सेतू बांधण्यापूर्वी ज्याची पूजा केली तोच हा विनायक. रामेश्र्वराची यात्रा करण्यापूर्वी आधी या विनायकाचे दर्शन घेण्याचा रिवाज आहे. तर रामेश्र्वरापासून केवळ दीड मैलावर एक विनायकाचे मंदिर आहे. मूळ मूर्तीचे नाव मात्र साक्षीविनायक आहे. श्रीगणेशाचे आद्य स्थान आणि अष्टविनायकांमधील प्रमुख असलेल्या मयुरेश्र्वर मंदिराच्या आवारातही एक साक्षीविनायक आहे. गणेशभक्तांची मोरगावची यात्रा देवाकडे रुजू झाल्याची नोंद हा साक्षीविनायक आहे. गणेशभक्तांची मोरगावची यात्रा देवाकडे रुजू झाल्याची नोंद हा साक्षीविनायक ठेवतो, अशी परंपरागत श्रद्धा आहे. रामेश्र्वराहून परतताना तिथल्या साक्षीविनायकाचे दर्शन घेण्याची प्रथा दक्षिणेकडेही आहे. दक्षिणेत विविध वैशिष्ट्ये असलेले असे अनेक विनायक आहेत. कन्याकुमारीच्या देवळाच्या दुसऱ्या प्राकारात अशाच एका विनायकाचे मंदिर आहे. याला इंद्रकांत विनायक म्हणतात. त्याचे कारण असे सांगतात की, इंद्राने याची स्थापना केली.

याशिवाय समुद्रकिनाऱ्यावर जेथे स्नान केले जाते, त्या घाटावरही एक अगदी लहान गणेश मंदिर आहे. त्याचे दर्शन घेऊन मगच कन्याकुमारीचे दर्शन घेण्याची प्रथा येथे रूढ आहे. कुंभकोणम् येथील सुधा-श्र्वेत गणेश आपण नुकताच जाणून घेतला. या कुंभकोणममध्येच कुंभेश्र्वर या नावाने ओळखले जाणारे एक शिवमंदिर आहे. या देवळाच्या तिसऱ्या प्राकारात विनायकाची मूर्ती आहे. इथल्या मंडळींच्या म्हणण्याप्रमाणे शंकराच्या आधीपासून हा विनायक इथे आहे. म्हणून त्याचे नाव आहे आदिविनायक. मद्रासमध्ये रामानाद जिल्ह्यातील तोंडी या गावात रस्त्याला लागूनच विनायकाचे देऊळ आहे. त्या विनायकाला तोंडी विनायक म्हणून ओळखले जाते. या विनायकाची मूर्ती तांबड्या दगडाची आहे. देऊळ अगदी साधे असले तरी त्याला फार महत्त्व आहे. कारण असे सांगतात की, वनवासांत असताना रामरायांनी याची उपासना केली होती. वास्तविक लंकेवर स्वारी करण्यासाठी जो सेतू बांधायचा होता, तो इथूनच बांधावयाची योजना होती. पण आराखडा पूर्ण होताच लक्षात आले की, तो सेतू थेट लंकेत न जाता लंकेच्या किल्ल्याच्या मागच्या बाजूला जाऊन पोहोचतो. असे पाठीमागून वार करणे हे सत्यप्रिय आणि शूरश्रेष्ठ प्रभू रामचंद्रांना आवडणे शक्य नव्हते. साहजिकच त्यांनी सेतूची ही जागा रद्द ठरविली. विशेष म्हणजे येथे अगदी नजीक समुद्र असूनही गोडे पाणी मिळते. म्हैसूर राज्यात इडगुंजी येथे एक पंचखाद्यप्रिय महागणपती आहे. इडा म्हणजे डावीकडील आणि कुंज म्हणजे उद्यान. हे स्थान इरावती नदीच्या डाव्या किनाऱ्यावर आहे. एकदा देवर्षी नारद पार्वतीकडे गेले असता, त्यांना बालगणपती खाऊसाठी रडत असलेला दिसला. तेव्हा नारदांनी त्याला माझ्याबरोबर चल मी तुला रोज गोड खाऊ देईन म्हणून सांगितले आणि इथे आणले. पुढे इथे एकदा सगळे देव जमले. त्या वेळी ब्रह्मदेवाच्या आईने एक देऊळ बांधले. नंतर विश्र्वकर्म्याने तेथे गणपतीची मूर्ती स्थापन केली. तोच हा इडगुंजी महागणपती. हा गणपती बालब्रह्मचारी आहे. माघ महिन्यात शुद्ध सप्तमीला येथे रथोत्सवही होतो.

आजच्या विनायकीला आपण दक्षिणेकडील आपल्याला काहीशा अपरिचित असलेल्या विविध गणेश-स्थानांचा परिचय करून घेतला. या साऱ्यांना आपण भक्तिभावाने नमस्कार करूया.

 

( देवाचिये द्वारी भाग : ५ )