Your Cart

Horoscope (Marathi) – October 2018

राशीभविष्य - ऑक्टोबर २०१८

मेष

ह्या महिन्यात, व्यक्तिगत पातळीवरील घडामोडीतील काही अनुकूलतेमुळे तुम्ही सुखावून जाणार आहात. मात्र कुटुंबातील व्यक्तीच्या अचानक उद्भवलेल्या आजारपणामुळे दैनंदिन वेळापत्रक बिघडण्याची शक्यता आहे.


वृषभ

महिन्याच्या पूर्वार्धात काही अप्रिय घटनांना सामोरे जावे लागेल, असे वाटते. परंतु उत्तरार्ध उत्साहवर्धक आहे. तुमचा शब्द अंतिम ठरेल. त्याच्या योग्य वापराने दूरगामी फायदे उठवू शकाल.


मिथुन

नोकरदार व्यक्तींना  आपले कार्यकौशल्य वरिष्ठांना दाखविण्याची संधी मिळणार आहे. घरातील तंटे उंबरठ्याबाहेर जाऊ देऊ नका. नंतर वितुष्ट येण्यापेक्षा मित्रपरिवारात आर्थिक व्यवहार शक्यतो न केलेला बरा. कामानिमित्त प्रवास होईल.


कर्क

तुमच्या अंगी असलेल्या कर्तृत्वगुणांना वाव मिळण्याचा काळ आहे. आर्थिक नियोजनास प्राधान्य द्या. तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवले तर बरेच गैरसमज आणि नुकसान टाळू शकाल. प्रवासात थोडा त्रास संभवतो.


सिंह

आपल्या ओळखीचा कोणी गैरफायदा तर घेत नाही ना, हे पाहा. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. उत्तरार्ध अधिक उत्साहपूर्ण जाईल. अपेक्षित कार्य पार पडेल. विद्यार्थ्यांना स्पर्धापरीक्षेत यश लाभेल.


कन्या

तुम्ही थोडे लवचिक धोरण अवलंबिले तर यश पदरी पाडून घेण्यात अडचणी येणार नाहीत.  प्रयत्नांना यश मिळेल. जवळच्याच व्यक्तींकडून काही अप्रिय घटना घडल्याने मनःस्थिती थोडी बिघडण्याची शक्यता आहे.


तूळ

संमिश्र स्वरूपाचा महिना राहणार आहे. कार्यविभागात बदल तसेच काही नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. गोड बोलून कार्यभाग साधावा लागेल. विरोधक छोट्या-छोट्या गोष्टींवरून त्रास देतील. संयम बाळगा.


वृश्चिक

अनुकूलतेचे वातावरण ह्या महिन्यात तुम्हाला लाभत आहे. मनासारख्या घटना घडतील. सहकाऱ्यांना विश्वासात घेऊनच मार्गक्रमण करा. कौटुंबिक खर्च वाढणार आहेत.


धनु

मार्गातील अडथळे दूर होऊन हाती घेतलेली कामे सहजगत्या पार पडतील. आपले बोलणे कठोर होत नाही ना, याची खबरदारी बाळगा. मेजवानीचे प्रसंग संभवतात. समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या ओळखी होतील.


मकर

‘ठेविले अनंते तैसेची रहावे….’ असाच ह्या महिन्याच्या ग्रहमानाचा तुम्हाला संदेश आहे.  प्रसंगी परिस्थितीनुरूप निर्णय घ्यावे लागतील. कार्यपूर्ततेत काही विघ्ने आली तरी विचलित होऊ नका. मनावर आणि जिभेवर ताबा ठेवा.


कुंभ

बदलत्या परिस्थितीचा नेमका फायदा उठविण्यासाठी काही महत्त्वाचे बदल तुमच्या कार्यप्रणालीत करावे लागतील. वरिष्ठांच्या संमतीने निर्णय घ्या. मनावरील संयम व शब्दांचा योग्य उपयोग आवश्यक आहे.


मीन

कुठल्याही वादात थोड्या सबुरीने घेतले तर मार्ग हा सापडतोच. गुरुचे ह्या महिन्यात मिळणारे पाठबळ ही जमेची बाजू होय. तुमच्या विचारांना योग्य दिशा मिळेल. आर्थिक लाभाचे स्रोत दृष्टिपथात येतील.