मेष
ग्रहमान तसे संमिश्र आहे. महिन्याच्या पूर्वार्धात महत्त्वाची कामे हातावेगळी करा. आत्मविश्वासाने केलेल्या कामात यश पदरी पडेल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. घरच्यांबरोबरचे मतभेद टोकाला जाणार नाहीत, याची काळजी घ्या.
वृषभ
पैशाच्या बाबतीत तुम्ही अगदी काटेकोर असता. हाती असलेल्या पैशाचा योग्य विनियोग करा. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल. पित्त-श्वासाच्या त्रासावर वेळीच इलाज करा.
मिथुन
‘कौटुंबिक तंटे कुटुंबातच मिटवा,’ असे हा महिना तुम्हाला सांगत आहे. तुमच्या काही उणिवांचा नेमका फायदा कसा उठवता येईल यावर विरोधकांची नजर असल्याने सध्या अतिदक्ष राहणे आवश्यक आहे. सहकाऱ्यांवर विसंबून राहू नका.
कर्क
गुरुची अनुकूलता ही सध्या असलेली जमेची बाजू. विचारपूर्वक पावले उचललीत तर शत्रूचा पाडाव करणे सहज शक्य होईल. कार्यक्षेत्रातील चढ-उतारांना सामोरे जावे लागेल. घरातील आजारपणामुळे आपल्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता जाणवते.
सिंह
‘कामातील एकाग्रता वाढवलीत तर सरशी तुमचीच’ असा हा महिना आहे. पूर्वार्ध अधिक यशदायी आहे. शासकीय कामे यशस्वी होतील. उत्तरार्धात अनपेक्षित समस्यां-मुळे कार्यसफलतेवर थोडा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे.
कन्या
मैत्रीत शक्यतो व्यवहार करू नका. पूर्वार्धात काही मित्रमैत्रिणींच्या वागणुकीमुळे मनस्ताप संभवतो. प्रासंगिक प्रवास तेवढा सुखावह नसेल. उत्तरार्धात फलप्राप्तीच्या गोष्टी कानी पडतील. कौटुंबिक वातावरण उत्साहवर्धक असेल.
तूळ
सध्याचे असलेले ग्रहमान तुमच्या बुद्धिकौशल्याची कसोटी पाहणारे आहे. हाती पैसा येईल. यशही मनाजोगते मिळेल, परंतु काही अनपेक्षित समस्यांमुळे कार्यवेग मंदावेल. मित्रपरिवारातील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा.
वृश्चिक
यश आणि पैसा मिळाला की माणसाला सगळ्या गोष्टी सोप्या वाटतात. सध्याचा काळ तसा आहे, परंतु थोडे सावधतेने वागा. कलाकारांना नवे व्यासपीठ उपलब्ध होईल. स्थावर मालमत्तेबाबतचे प्रश्न उद्भवतील.
धनु
‘सध्या असलेल्या व्यापात अधिक भर नको’ असे हा महिना तुम्हाला सांगत आहे. उगाचच कामे, जबाबदाऱ्या वाढवू नका. आपला आवाका जाणून शब्द द्या. ‘आयजीच्या जीवावर बायजी उदार’ नको. उत्तरार्ध लाभदायी आहे. कामाचा वेग वाढवा.
मकर
सध्या आहाराविहारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. संपर्कातील व्यक्तींशी अनपेक्षितरीत्या मतभेद होतील, प्रसंग युक्तीने हाताळा. आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा. महिलांना कौटुंबिक सलोख्यासाठी तडजोड करावी लागेल.
कुंभ
‘काही कमवायला काहीतरी गमवावे लागते’ हे जाणून वागा. नोकरी-व्यवसायातील अनुकूल परिस्थिती आत्मविश्वास वाढविणारी ठरेल. अधिकाराच्या मर्यादा ओलांडू नका. शब्दांच्या योग्य व अचूक वापराने गैरसमज टळतील.
मीन
कौटुंबिक पाठिंबा आणि अचूक ठरणारे आडाखे यामुळे पूर्वार्धात मनास उभारी मिळेल. आर्थिक प्राप्ती चांगली असेल. वैचारिक बैठक बळकट होईल. उत्तरार्धात मात्र छोट्या-छोट्या कामांना अधिक शक्ती, वेळ लागण्याची शक्यता संभवते.