व्हिनेगरचा असाही वापर
व्हिनेगरबद्दल आपल्याला चायनीज पदार्थांमुळे जरी माहीत झाले असले तरी त्याची निर्मिती ही मद्यनिर्मितीइतकीच जुनी आहे. अर्थात, त्याचा वापर आणि उत्पादन पाश्चात्त्य देशांत अधिक प्रमाणात होतो. व्हिनेगर हा शब्द फ्रेंच भाषेतून आला आहे. ‘व्हिनेग्रे’ म्हणजेच आंबट वाइन असा त्याचा अर्थ.
व्हिनेगर म्हणजे अॅसिटिक अॅसिडचे पाण्यात तयार केलेले सौम्य द्रावण. हे तयार करण्यासाठी अॅसिटिक अॅसिड जीवाणूंचा आणि दुहेरी किण्वन प्रक्रियेचा (आंबवण्याच्या प्रक्रियेचा) वापर केला जातो. द्राक्ष, सफरचंद, बार्ली, ओट्स किंवा तांदळापासून व्हिनेगर बनवले जाते.यामध्ये आंबवण्याच्या प्रक्रियेचा सहभाग असल्याने व्हिनेगरला एक प्रकारचा आंबूस वास असतो. खाण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या व्हिनेगरमध्ये ४ ते ८ टक्के अॅसेटिक आम्ल असते.
इसवी सन पूर्व ३००० वर्षांपूर्वी बॅबिलोनियन लोकांनी व्हिनेगर बनवल्याचा आणि वापरल्याचा पहिला कागदोपत्री पुरावा आढळतो. ते स्वयंपाकात आणि औषधात अंजीर, खजूर यांपासून बनवलेल्या व्हिनेगरचा वापर करत, असा उल्लेख आढळला आहे. इजिप्शियन लोकांनी आणि पूर्व आशियामध्ये चिनी लोकांनी व्हिनेगरची निर्मिती केल्याचा उल्लेख आहे. चीनमधील तायुआन शहराजवळील शांक्सी प्रांतात मोठ्या प्रमाणात व्हिनेगरची निर्मिती केली जायची, असा उल्लेख अनेक पुस्तकांत आढळतो.
व्हिनेगर बनवण्यासाठी विविध फळे, धान्ये, अल्कोहोलयुक्त पेये वापरली जातात. प्राचीन काळात व्हिनेगर निर्मितीची प्रक्रिया ही दीर्घ काळ चालणारी होती. आता रासायनिक अभिक्रियेद्वारे ही प्रक्रिया जलद गतीने होत असल्याने व्हिनेगर सहज आणि कमी किमतीत उपलब्ध व्हायला लागले आहे.
व्हिनेगरचा वापर फक्त अन्नपदार्थांतच केला जातो असे नाही, तर व्हिनेगरचे इतरही अनेक उपयोग आहेत.
अन्नपदार्थांमध्ये व्हिनेगरचा वापर:
१. चायनीज पदार्थांमध्ये व्हिनेगरचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. कोणतेही सूप, नूडल्स, राइस, चाओमिन, मंच्युरियन, स्प्रिंग रोल, मोमोज, शेजवान सॉस, मोमोजच्या चटण्या यांसारख्या चायनीज पदार्थांमध्ये व्हिनेगर वापरलेले असते. साधारणतः सरासरी दोन व्यक्तींसाठी बनवण्यात येणाऱ्या पदार्थांमध्ये एक ते दीड चमचा व्हिनेगर वापरले जाते.
२. चायनीज लोणच्यांमध्ये व्हाइट व्हिनेगर घातले जाते.
३. भारतात दूध फाडण्यासाठीही व्हिनेगरच वापरले जाते. खास करून बंगाली मिठायांसाठी, पनीर बनवण्यासाठी एक लीटर दुधात एक चमचा व्हिनेगर टाकतात.
४. दूध आणि व्हाइट व्हिनेगरपासून चीज बनवले जाते. व्हाइट व्हिनेगर दुधातील प्रथिनांमध्ये बदल करते. दुधामध्ये केसीन नावाचे प्रथिने असते. व्हिनेगरमधील आम्लामुळे केसीन प्रथिने द्रावणातून बाहेर पडते. त्यामुळे पनीर आणि पाणी वेगळे होऊन सौम्य, मऊ चीज तयार होते.
५. वेगवेगळ्या कोशिंबिरी आणि सलाड चविष्ट बनवण्यासाठी त्यात व्हाइट व्हिनेगरचा वापर केला जातो.
स्वच्छतेसाठी वापर:
१. व्हिनेगरचा वापर करून काच आणि काचेच्या वस्तू स्वच्छ करता येतात. दोन भाग व्हिनेगर आणि एक भाग पाणी एकत्र केलेले द्रावण स्प्रे बॉटलमध्ये भरावे. हे मिश्रण काचेवर फवारून कोरड्या कापडाने पुसून घेतल्यावर काच स्वच्छ होते, त्यावरील डाग निघून जातात.
२. व्हिनेगर हे नैसर्गिक जंतुनाशक असल्याने अन्नपदार्थ तयार केल्यानंतर स्वयंपाक घरातील ओटा स्वच्छ आणि निर्जंतुक करण्यासाठी त्याचा वापर करता येतो. एक भाग पाण्यात दोन भाग व्हिनेगर आणि लिक्विड सोपचे काही थेंब घालून मिश्रण चांगले हलवून त्याचा वापर ओटा साफ करण्यासाठी करावा. मात्र, याचा वापर संगमरवरी किंवा ग्रेनाइटपासून बनवलेल्या ओट्यासाठी करू नये.
३. नळांवरील डाग काढण्यासाठी दोन चमचे व्हिनेगर आणि एक चमचा मीठ एकत्र करून हे द्रावण नळांवर किंवा शॉवरच्या छिद्र असलेल्या पृष्ठभागावर घासून पाण्याने धुऊन घ्या. यामुळे नळांवर बसलेले थर निघून जाऊन नळ आणि शॉवरची छिदे्र स्वच्छ आणि मोकळी होतात.
४. पाण्याच्या बादल्यांवरही पाण्याचे डाग पडून त्या काळ्या, पिवळ्या होतात. त्या साफ करण्यासाठी दोन चमचे व्हिनेगर, एक चमचा मीठ आणि अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालून त्या मिश्रणाने प्लास्टिकच्या काथ्याने बादल्या घासून पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या. बादलीवरील डाग निघून जातात.
५. पाश्चिमात्य पद्धतीच्या टॉयलेटमध्ये (कमोड) जड पाण्यामुळे पिवळा थर असलेली रेषा तयार होते. साध्या टॉयलेट क्लिनरने कमोड स्वच्छ होत नाही. असे डाग काढण्यासाठी ४ ते ५ कप व्हिनेगर टॉयलेटमध्ये टाकून ठेवावे. तीन ते चार तासांनंतर ब्रशने टॉयलेट स्वच्छ घासून घ्यावे.टॉयलेट स्वच्छ होतेच, शिवाय दुर्गंधीही नष्ट होते.
६. एक चमचा टूथपेस्ट, एक चमचा बेकिंग सोडा, दोन चमचे लिक्विड सोप, पाव कप व्हाइट व्हिनेगर आणि अर्धा कप पाणी घालून त्याचे मिश्रण करून गॅसच्या तेलकट जाळ्या, धुळीने चिकट झालेल्या एक्झॉस्ट फॅनच्या जाळ्या साफ केल्यास तेलकटपणा निघून जातो.
७. बेसिनच्या पाइपमध्ये अन्नपदार्थ अडकून त्यातून पाणी जात नसेल तर दोन चमचे बेकिंग सोडा, दोन चमचे लिक्विड सोप आणि कपभर व्हिनेगर घालून काही वेळ ठेवल्यास पाइपमधील घाण निघून जाऊन पाइप मोकळा होतो.
८. एक लहानसा नॅपकिन व्हिनेगरमध्ये पूर्णपणे बुडवून तो वॉशिंग मशिनमध्ये टाकून स्पिन करून घ्या. त्यातच बेकिंग सोडा आणि काही चमचे वॉशिंग डिटर्जंट लिक्विड टाकून पुन्हा स्पिन करून ड्रेन करा. यामुळे मशिनची सफाई होते. मात्र, याचा वारंवार वापर केल्यास मशिनचा रबरी सील आणि नळीचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे याचा वापर वर्षभरातून एकदाच करणे उचित.
९. तांबे, पितळ, काशाच्या किंवा चांदीच्या वस्तू पॉलिश करण्यासाठी व्हिनेगरचा वापर केला जातो. तसेच स्टिकरमुळे भांड्यांना लागलेला गोंद (गम) काढण्यासाठी व्हिनेगरचा वापर करता येईल.
१०. अनेकदा ओलसरपणामुळे टॉवेलला कुबट असा वास येतो. तो घालवण्यासाठी अर्धा बादली गरम पाण्यात एक कप व्हिनेगर, दोन चमचे टूथपेस्ट, दोन चमचे बेकिंग सोडा आणि अर्धा चमचा डिटर्जंट पावडर घालून हलवून घ्या. त्यात अर्धा तास टॉवेल भिजत ठेवून. यानंतर पाण्याने धुऊन घ्या. कुबट वास निघून जातो.
औषधी वापर:
१. व्हाइट व्हिनेगरचा योग्य प्रमाणात वापर आरोग्यासाठी लाभदायक ठरतो. रक्तातील साखर आणि इन्सुलिनची पातळी कमी राखण्यास,कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी व्हिनेगर लाभदायक असल्याचे संशोधनात आढळले आहे. मात्र, ते कोणासाठी योग्य आणि कोणासाठी अयोग्य ठरू शकते. त्यामुळे व्हिनेगर कशा प्रकारे आणि किती प्रमाणात घ्यायचे याबद्दल डॉक्टर अथवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा.
२. सौम्य केलेले व्हिनेगर मुंग्या-कीटकाने चावा घेतलेल्या ठिकाणी लावल्यास त्याचा दाह कमी होतो.
इतर काही उपयोग:
१. अॅसेटिक अॅसिड असलेल्या व्हिनेगरचा तणनाशक म्हणून वापर केला जातो. मात्र, यामुळे तण समूळ नष्ट होत नाही.
२. बागेतील हानिकारक कीटकांना मारण्यासाठी व्हिनेगर आणि पाण्याचे समान भागांचे द्रावण तयार करा व कीटक असलेल्या ठिकाणी फवारणी करा.
काय खबरदारी घ्याल?
व्हिनेगरचे अतिप्रमाणात सेवन केल्याने मग ते अन्नपदार्थांतून
असो किंवा इतर मार्गाने; यामुळे अॅसिडिटी, छातीत जळजळ किंवा अपचन होऊ शकते. तसेच व्हिनेगरच्या आंबटपणामुळे दातांची झीज होऊ शकते. म्हणूनच खाण्यात व्हिनेगरचा वापर मर्यादित प्रमाणात करायला हवा.
अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
रश्मी विरेन
