पाइनॅपल अपसाइड डाऊन केक
साहित्य: २५० ग्रॅम मैदा, १ छोटा चमचा बेकिंग पावडर, १ छोटा चमचा बेकिंग सोडा, १ कप लोणी, २ मोठे चमचे पिठीसाखर, ४०० ग्रॅम कंडेन्स्ड मिल्क, १ छोटा चमचा व्हॅनिला इसेन्स, ४०० मिली. सोडा वॉटर, १ छोटा चमचा पाइनॅपल इसेन्स, १/४ छोटा चमचा पिवळा खायचा रंग, ४ ते ५ मोठे चमचे साखर व तेवढेच पाणी, सजावटीसाठी अननसाच्या चार काप, चेरी व बदामचे तुकडे.
कृती: एका पॅनमध्ये साखर आणि पाणी घालून मंद आचेवर ठेवून त्याचे कॅरेमल बनवा. त्यात अननसाचे काप बुडवून ठेवा. एका मोठ्या वाडग्यात मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा एकत्र करून घ्या. लोणी, पिठीसाखर, कंडेन्स्ड मिल्क एकत्र करून मिक्सरमधून काढून घ्या. हे मिश्रण मैद्यामध्ये घाला. आता त्यात व्हॅनिला इसेन्स, सोडा वॉटर, पाइनॅपल इसेन्स आणि खायचा पिवळा रंग घाला. हे मिश्रण एकाच दिशेने फेटून घ्या. बेकिंग ट्रेमध्ये बटर पेपर ठेवून त्याला थोडे बटर लावा. त्यावर अर्धा छोटा चमचा मैदा भुरभुरावा. त्यावर कॅरेमलाइज्ड्
अननसाचे काप ठेवा. आता त्यावर केकचे मिश्रण ओता. १८० अंश तापमानावर प्रीहिट केलेल्या ओव्हनमध्ये बेकिंग ट्रे ठेवून अर्धा तास बेक करा. केक पूर्ण गार झाल्यावर ताटामध्ये पालथा करा. अननसाचे काप केकच्या वरच्या बाजूला दिसतील. या कापांमध्ये एक-एक चेरी ठेवा. पूर्ण केकवर बदामाचे तुकडे पसरवून सजावट करा.
अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
मीना मांडके, पुणे
