लापशी मसाला केक
साहित्य: १ कप लापशी किंवा दलिया, २/३ कप किसलेला गूळ, १/२ कप सुक्या खोबऱ्याचा बारीक किस, १/२ कप दही, २/३ कप दूध, १/२ कप साजूक तूप, १/२ छोटा चमचा बेकिंग सोडा, १/२ छोटा चमचा बेकिंग पावडर, चिमूटभर मीठ, १ चक्रीफूल, ३ लवंग, १ १/२ इंच दालचिनी किंवा १/४ छोटा चमचा दालचिनी पूड, १/४ छोटा चमचा जायफळ पूड, १/४ छोटा चमचा सुंठपूड, १/४ छोटा चमचा बडीशेप, १/४ छोटा चमचा खसखस, १/४ छोटा चमचा वेलची पूड आणि सजावटीसाठी १ मोठा चमचा बदाम-पिस्त्याचे काप.
कृती: दुधात सर्व मसाले (चक्रीफूल, दालचिनी, लवंग, जायफळपूड, सुंठपूड, बडीशेप, खसखस, वेलचीपूड) घालून मध्यम आचेवर दूध अर्धा कप होईपर्यंत उकळवा. दूध उकळत असताना सारखे हलवत राहा. आता हे दूध थंड होऊ द्या. एक कप लापशी मिक्सरमध्ये बारीक रवाळ वाटून घ्या. दह्यामध्ये गूळ आणि साजूक तूप घालून चांगले फेटून घ्या. त्यात लापशी आणि मीठ घालून फेटा. या मिश्रणात थंड झालेले दूध घालून पुन्हा फेटून घ्या. या मिश्रणात खोबऱ्याचा कीस, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि अर्धा छोटा चमचा दूध घालून फेटून घ्या. केक टीनला तूप लावून त्यावर मैदा किंवा गव्हाचे पीठ भुरभुरा. केक टीनमध्ये मिश्रण ओतून हळूहळू आपटून एकसमान करून घ्या. सजावटीसाठी केकवर बदाम-पिस्त्याचे काप पसरवा. प्रीहिटेड ओव्हनमध्ये १८० अंश तापमानावर ४० ते ४५ मिनिटे केक बेक करून घ्या.हा केक कढईतही बेक करता येतो. हा केक असाच खाल्ला तरी चालेल किंवा त्यावर आयसिंग करा.
आयसिंगची कृती: आयसिंग करायचे असल्यास केक मधोमध आडवा कापून त्याचे दोन भाग करा. अर्धा वाटी दुधात एक चमचा साखर विरघळून घ्या. केकच्या खालच्या भागावर साखर-दूध पसरवा. त्यावर १/२ कप कन्डेन्स्ड मिल्क आणि १/२ कप ओल्या खोबऱ्याचा कीस पसरवून घ्या. त्यावर पहिला थर ठेवा. केकच्या वर आणि कडेला क्रीम लावल्याप्रमाणे कन्डेन्स्ड मिल्क लावून त्यावर खोबऱ्याचा कीस लावा. केकला सर्व बाजूंनी बदाम-पिस्त्याचे काप लावून सजवून घ्या. हा केक तासभर फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेवा.
अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
श्वेता कुडोळी, पुणे
