Upvas | Fasting | Vrat Food | Indian Fasting | Fasting Recipes

उपवासाच्या कंदमुळांचे तंदुरी चाट | जयश्री धर्माधिकारी, मुंबई | Fasting Tuber Roots Tandoori Chat | Jayshree Dharmadhikari, Mumbai

उपवासाच्या कंदमुळांचे तंदुरी चाट

साहित्य: प्रत्येकी १०० ग्रॅम अरवी, बटाटे, कोनफळ, रताळे, सुरण, २ वाट्या दही, १ मोठा चमचा जिरेपूड, अर्धी वाटी कोथिंबीर, आल्याचा छोटा तुकडा, ४ हिरव्या मिरच्या, २ छोटे चमचे लाल तिखट, १ छोटा चमचा आमचूर पावडर, ४ मोठे चमचे तूप, २ मोठे चमचे राजगिऱ्याचे पीठ, चवीनुसार मीठ, थोडी साखर, एक कोळसा, सर्व्हिंगसाठी ओले खोबरे, कोथिंबीर.

हिरव्या चटणीचे साहित्य व कृती: १ वाटी कोथिंबीर, ४ हिरव्या मिरच्या, ८-१० काजूगर, २ चमचे किसलेला कैरीचा कीस, चवीपुरते मीठ, साखर आणि थोडे पाणी घालून मिक्सरमधून चटणी वाटून घ्या.

चिंचगुळाच्या चटणीचे साहित्य व कृती: एक मोठ्या लिंबाएवढी चिंच आणि त्याच्या दुप्पट गूळ अर्धा तास भिजत घाला. त्यात थोडे जिरे आणि चवीनुसार मीठ घाला. हे मिश्रण मिक्सरमधून वाटून घ्या. चटणी गाळणीने गाळून घ्या. त्यात थोडे पाणी घालून त्याला उकळी आणा.चटणी उकळवताना त्यात अर्धा छोटा चमचा लाल तिखट घाला. ही चटणी घट्टसर होईपर्यंत शिजवावी.

लाल चटणीचे साहित्य व कृतीः लाल सुक्या मिरच्या अर्धा तास पाण्यात भिजत घालून त्या बारीक करून त्यात थोडे जिरे आणि मीठ घालून मिक्सरमधून बारीक वाटून घ्या.

कृती: अरवी, बटाटे, सुरण आणि कोनफळ सर्व स्वच्छ धुऊन साल काढून घ्या. त्याचे चौकोनी जाडसर तुकडे करून कुकरच्या भांड्यात ठेवून एक शिट्टी काढा. यामुळे सर्व कंदमुळे अर्धवट शिजली जातात. कंद शिजवताना फक्त सुरण वेगळा शिजवा, त्याला थोडी खाज असू शकते. मॅरिनेट करण्यापूर्वी सुरणाला थोडा चिंचेचा कोळ लावून ठेवावा.  मॅरिनेशनसाठी घट्ट दही घ्या. कोथिंबीर, आले, हिरव्या मिरच्या मिक्सरमधून पाणी न घालता जाडसर वाटून घ्या. हे मिश्रण दह्यात मिसळा. त्यातच जिरेपूड, लाल तिखट, आमचूर पावडर, चवीनुसार मीठ, थोडी साखर घालून एकजीव करावे. त्यात राजगिऱ्याचे पीठ घालून दही चांगले फेटून घ्या. या दह्याच्या मिश्रणात उकडलेली कंदमुळे अर्धा तास मॅरिनेट करून घ्या. दोन कोळसे पेटवून ते एका वाटीत घ्या. त्याच्यावर दोन चमचे तूप सोडून ही वाटी मॅरिनेट करायला ठेवलेल्या कंदमुळांमध्ये ठेवून त्यावर झाकण ठेवा, जेणेकरून धूर छान पसरेल. दोन मिनिटांनी झाकण उघडून वाटी काढून घ्या. तवा गॅसवर ठेवून त्याला साजूक तूप लावून घ्या. त्यावर मॅरिनेट केलेली सर्व कंदमुळे व्यवस्थित चारी बाजूंनी खरपूस ग्रिल करून घ्या. एका प्लेटमध्ये ग्रिल केलेले कंदमुळांचे तुकडे ठेवा. त्यावर तिन्ही चटण्या,  कोथिंबीर आणि ओले खोबरे घालून सर्व्ह करा.

अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


जयश्री धर्माधिकारी, मुंबई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.