केसरिया दलिया धिरडे
साहित्य: १ वाटी दलिया, १/४ वाटी तांदूळ पीठ, १ वाटी दही, १ छोटा चमचा हळद, १/२ चमचा आले-लसूण पेस्ट, ६ मिरच्या, ३ ते ४ लसूण पाकळ्या, प्रत्येकी १ छोटा चमचा तीळ व जिरे, साधे मीठ, काळे मीठ, १ पाकिट मॅगी मसाला, आवश्यकतेनुसार तेल, १ वाटी लोणी, १ मोठी वाटी लाल भोपळ्याचा कीस, १ वाटी कांद्याची पात, १/२ वाटी लाल भोपळ्याची किसलेली साले.
कृती: दलिया थोड्या तेलावर परतून घ्या. तो थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. त्यात तांदळाचे पीठ व दही घालून एकजीव करा. मिश्रणात थोडे पाणी घालून सैलसर भिजवा. हे मिश्रण साधारण अर्धा तास बाजूला झाकून ठेवा. लाल भोपळा आणि त्यावरील साल किसून घ्या. कांद्याची पात बारीक चिरून घ्या. गॅसवर कढई गरम करून त्यात थोडे तेल टाकून तीन चिरलेल्या मिरच्या, लसूण, लाल भोपळ्याची किसलेली साले घालून थोडा वेळ परतून घ्या. हे मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरमधून वाटून त्याची चटणी करून घ्या. दलिया छान फुगून आले की त्यात थोडे पाणी घालून मिश्रण पातळसर करून घ्या. त्यात वाटलेली चटणी, बारीक चिरलेली मिरची, आले-लसूण पेस्ट, जिरे, तीळ, हळद, साधे मीठ, काळे मीठ, किसलेला भोपळा, कांद्याची पात, मॅगी मसाला हे सर्व जिन्नस घालून एकजीव करून घ्या. मिश्रण जास्त घट्ट किंवा फार पातळ नको. गॅसवर नॉनस्टिक पॅन गरम करून त्यावर थोडे तेल लावून पाणी शिंपडून पुसून घ्या. पुन्हा थोडे तेल लावून त्यावर चमच्याने दलियाचे मिश्रण घालून पसरवून घ्या. फार पातळ करू नये. धिरड्यावर झाकण ठेवून बाजूने तेल सोडून चांगले खरपूस भाजून घ्या. धिरड्यावर लोण्याचा गोळा ठेवून खाण्यासाठी सर्व्ह करा. आवडत असल्यास चटणीबरोबरही खाऊ शकता.
अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
स्नेहल कुलकर्णी, बदलापूर
