Benefits of Napping | Walking After Meals | Health | Digestion | Wellness

वामकुक्षी ते शतपावली | डॉ. प्रणिता अशोक | Midday Nap to Short Walk | Dr Pranita Ashok

वामकुक्षी ते शतपावली

वामकुक्षी

काहींना दुपारी वामकुक्षी घेण्याची सवय असते. वामकुक्षी म्हणजे दुपारच्या जेवणानंतर डाव्या बाजूस, डाव्या कुशीवर विश्राम करणे! त्याचे फायदेदेखील आहेत:

१. वामकुक्षी घेणे हे पोटासाठी, पचनासाठी चांगले असते. डाव्या कुशीवर झोपल्याने जठरातील अन्न काही काळ जठरात राहते. ते तसे राहणे पथ्यकर असते. जठराच्या आकुंचन-प्रसरण पावण्याने अन्न घुसळून निघते व व्यवस्थित पचते.

२. दुपारी झोप घेतल्यास चिडचिडेपणा, मानसिक ताण कमी होतो. तसेच कामातील सतर्कता वाढते.

३. दुपारी थोडा वेळ झोप घेतल्यास स्मरणशक्ती चांगली राहते व मूड सुधारण्यास मदत मिळते.

४. अशा प्रकारची झोप घेतल्याने नैसर्गिक पद्धतीने मेंदू शांत होतो, थकवा दूर होतो. त्या वेळी चहा-कॉफीची गरज पडत नाही व त्याचे अतिसेवनही टाळले जाते.

हे लक्षात ठेवा

१. वामकुक्षी ही दुपारच्या जेवणानंतर १५ ते २० मिनिटे घ्यायची असते, रात्रीच्या जेवणानंतर नाही. त्यावेळी शतपावली (सावकाश चालणे) करावी.

२. ही झोप साधारण दुपारी १ ते ३ या वेळेत असावी व अर्ध्या तासापेक्षा जास्त नसावी.

चीनमध्ये झालेल्या एका सर्वेक्षणात काही ज्येष्ठ नागरिकांच्या शारीरिक आरोग्याच्या आणि आकलनशक्ती-विषयक चाचण्या करण्यात आल्या होत्या. यात दुपारी झोप घेतलेल्या व्यक्तीची आकलनशक्ती, एकाग्रता जास्त असल्याचे दिसून आले होते.

एक लक्षात घ्या की लहान पॉवर नॅप (साधारण ३० मिनिटे) सतर्कता वाढवू शकण्यास मदत करते. परंतु त्यापेक्षा अधिक काळ झोपल्यास लठ्ठपणा आणि हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोगास कारणीभूत ठरू शकते. म्हणून खाल्लेल्या अन्नाचे नीट पचन होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.पचनशक्ती चांगली असेल, चयापचय क्रिया योग्य पद्धतीने होत असेल, तर अनेक आजार दूर राहतात तसेच वजनावर नियंत्रण ठेवणेही सोपे जाते.

शतपावली

रात्रीच्या जेवणानंतर (शक्य असल्यास दुपारीसुद्धा) शतपावली करणे शरीरासाठी महत्त्वाचे असते. आपले वाडवडीलही रात्रीच्या जेवणानंतर एकाच जागी न बसता थोडा वेळ चालण्याचा सल्ला देत असत. रात्रीचे जेवण झाल्यावर लगेच झोपण्याची सवय अनेक आजारांना आमंत्रण देऊ शकते. म्हणूनच रात्रीच्या जेवणानंतर नियमितपणे थोडा वेळ चालायला हवे. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात:

१. पचनक्रिया सुधारते, तसेच बद्धकोष्ठता, गॅस, पोट फुगणे किंवा पोटाशी संबंधित इतर समस्या टाळता येतात.

२. रोगप्रतिकारक शक्ती वाढते, ज्यामुळे अनेक प्रकारचे संक्रमण आणि आजार टाळणे शक्य होते.

३. ज्या लोकांना मधुमेहाची समस्या आहे, त्यांनी रात्रीच्या जेवणानंतर थोडा वेळ चालणे हितकारक आहे. यामुळे शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

४. वजन कमी करण्यासाठी चयापचय दर (मेटाबॉलिजम रेट) महत्त्वाचा असतो. तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर रात्रीच्या जेवणानंतर थोडा वेळ शतपावली करावी. यामुळे मेटाबॉलिजम तर वाढतेच शिवाय मोठ्या प्रमाणात कॅलरीजही बर्न होतात.

५. रात्रीच्या जेवणानंतर शतपावली केल्याने चांगली झोप लागते. यामुळे रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे तुम्ही तणावमुक्त राहता आणि चांगली झोप घेता येते. शांत झोप झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी ताजेतवाने आणि उत्साही वाटते.

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


डॉ. प्रणिता अशोक

(लेखिका अनुभवी आहारतज्ज्ञ आहेत.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.