Senior Life | Graceful Aging | Mental Balance | Life Lessons | Positive Aging | Elder Wellness | Mind Growth | Emotional Health

तारेवरची कसरत… | गौरी डांगे | The Balancing Act of Growing Older | Gouri Dange

तारेवरची कसरत

ज्येष्ठ नागरिक होण्याच्या उंबरठ्यावर आणि आयुष्याच्या या नव्या टप्प्यावर समोर काय वाढून ठेवले आहे, याची चाचपणी करण्याचा काळ हा विरोधाभास आणि विसंगतीचा असतो. कारण जसजसे आपले वय वाढत जाते तसतसे एकाच वेळी दोन विरुद्ध विचार / भावना / वर्तन अवलंबले जाते. आपल्यापैकी अनेकांनी हा अनुभव अनेक वेळा घेतला असणार. त्यामुळे कधी कधी आपलाही गोंधळ होतो, तर कधी स्वतःची लाज वाटते किंवा काही वेळा अवघडून जायला होते. अशा वेळी कुणी तुम्हाला ही दोलायमान अवस्था म्हणजे टेबल फॅनसारखी इकडून तिकडे मान हलवणे थांबवायला सांगितले तर अजिबात अवघडून जाऊ नका. संकोच न बाळगता तुम्ही त्यांना (आणि स्वतःलाही) सांगा, ‘अमुक अमुक वर्षांच्या माझ्या आयुष्यात मी एवढे जग पाहिले आहे, वेगवेगळे अनुभव घेतले आहेत. पण वेगाने बदलणाऱ्या या जगात अनेक गोष्टी आजही माझ्यासाठी नवीन आहेत. त्यामुळे परस्परविरोधी भावना किंवा प्रतिक्रियांसाठी मी स्वतःला तेवढा वेळ देतो आणि ते स्वीकारण्याची परवानगीही. मी नेहमीच विद्यार्थीदशेत म्हणजे शिकण्याच्या मनःस्थितीत असतो.’ इतके हे सोपे आहे! सगळे विचार, कृती काळी किंवा पांढरी अशी पूर्णपणे टोकाची असली पाहिजे असे गरजेचे नाही. त्या मधलीही छटा असू शकते, हे स्वीकारण्याचा परवाना स्वतःला द्या.

ज्येष्ठ नागरिक म्हणून तुमच्या मनातही दोन टोकाचे विचार सुरू असतात का?

१) एकाच वेळी आपण हवेहवेसे वाटणे आणि आपल्याकडे दुर्लक्ष होणे : उदा. तुमच्याकडे एखादी व्यक्ती सल्ला मागायला येते किंवा लाड करून घ्यायला येते. म्हणजे तुमच्या अनुभवाची, तुमच्याकडे असलेल्या माहितीची-ज्ञानाची, तुमच्याकडून मिळणाऱ्या प्रेमाची, वात्सल्याची दखल घेतली जाते आणि एक प्रकारे तुमची ‘सन्मान हौस’ पुरवली जाते. पण त्याच दिवशी कदाचित तुमच्या सभोवतालच्या माणसांचे तुमच्याकडे पूर्ण दुर्लक्ष होऊ शकते. तुमच्या साध्या प्रश्नाचे उत्तरही कोणी देत नाही किंवा एखादी साधी मागणीही पूर्ण केली जात नाही, जणू काही तुम्ही अस्तित्वातच नाही.

२) पूर्वग्रह विरुद्ध उत्स्फूर्तता : वयाची साठी उलटल्यानंतर पेहराव, खानपान, कृती, इच्छा-आकांक्षा याबद्दल आपले काही पूर्वग्रह असतात किंवा त्याबद्दल स्वतःच बंधने घालून घेतलेली असतात. पण अनेक प्रसंगी या सगळ्या आघाड्यांवर काय करावे आणि काय करू नये याची भीड न बाळगता कृती केल्याने आनंद मिळतो. तुमच्या अशा बिनधास्त वागण्याने जगाला हलकासा धक्का बसला, तरी ते मनावर घेऊ नका. (एक सावधगिरीचा सल्ला इथे द्यावा लागेल. कसलेच निर्बंध नसणे किंवा भीडभाड न बाळगणे हे दुसरे टोक आहे. या वयात ज्येष्ठ व्यक्तींमध्ये उत्स्फूर्ततेने वागायची वृत्ती बळावते. आपण काय बोलले पाहिजे किंवा केले पाहिजे याचे भान राहत नाही.)

पण आपण कोणत्या बाबतीत बिनधास्त राहायचे आणि कोणत्या बाबतीत बंधने घालून घ्यायची, हे सुद्धा ठरवून घ्या. यासाठी आजूबाजूच्या व्यक्तींकडून आणि हितचिंतकांकडून सल्ला घेता येईल. हा सल्ला घेताना सल्ला देणारी व्यक्ती आपल्यापेक्षा वयाने मोठी आहे की लहान, असा विचार करू नका.

३) ऐकण्याची वृत्ती विरुद्ध सोयीचे ऐकण्याची वृत्ती : जसजसे वय वाढत जाते, तसतसे तुम्ही आतून (मानसिकदृष्ट्या) शांत होत जाता. त्यामुळे तुम्ही कोणत्याही गोष्टी विचलित न होता ऐकू शकता. आपल्यासारखे इतरही ज्येष्ठ नागरिक तर ठरवून काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. म्हणजे कानावर पडलेली गोष्ट मेंदूपर्यंत पोहचू देत नाहीत. वाढत्या वयाने मिळवून दिलेले हे शहाणपण असते. पण कोणत्या गोष्टी मेंदूपर्यंत पोहचू द्यायच्या आणि कोणत्या नाही, यासाठी योग्य व्यक्तींकडून अभिप्राय मागायला विसरू नका.

४) तरुणांचा त्रास विरुद्ध त्यांचा प्रभाव पडणे आणि तेही एकाच वेळी आणि कधीतरी! : समोरच्याशी उद्धटपणाने वागणे, स्वतःमध्येच गुंतलेले असणे ही तरुणांची कृती जुन्याजाणत्या पिढीला आत्मप्रौढी किंवा अविचारी कृती वाटू शकते. पण त्याच वेळेस तरुणांची अशी निखालस बिनधास्त वृत्ती, जोखीम घेण्याची तयारी, सहजपणे व्यक्त केलेले प्रेम आणि सकारात्मक दृष्टी हा त्यावरील उतारा असू शकतो. तरुणाई आपल्यासाठी ‘दर्द’ असू शकते आणि ‘दवा’सुद्धा!

५) आतापर्यंतचे शिक्षण विरुद्ध नव्याने शिकणे : आता या वयात नवीन काय शिकायचे, असा विचार अजिबात करू नका. वय वाढत असले तरी नवनव्या गोष्टी शिकण्यातही एक प्रकारचा आनंद असतो. म्हणूनच आजची गरज असणाऱ्या तंत्रज्ञानापासून ते फायनान्सपर्यंत अशा नवनवीन गोष्टी एकीकडे शिकत असतानाच दुसरीकडे आजच्या बिनधास्त आणि बेधडक तरुणांशी कसे बोलावे हेसुद्धा समजून घ्यायला हवे. त्यासाठी आतापर्यंतच्या आपल्या धारणा, गृहीतके, भाषावापर, पूर्वग्रह आणि सिद्धांत विसरून जा. बाह्यजगाशी संवादाचे बदललेले नवीन नियम शिकतानाच जुने ते मागे सोडा.

६) मावशी-काका विरुद्ध आजी-आजोबा : आजपर्यंत तुमच्या कानांना मावशी, काकू किंवा काका ऐकण्याची सवय होती. आता पुढचा टप्पा म्हणजे आजीआजोबा अशी हाक ऐकून घेण्याचा. ही हाक कदाचित तुम्हाला वाढलेल्या वयाची आठवण करून देईल. वयाच्या या टप्प्यावर तुम्ही तुमच्यापेक्षा ज्येष्ठ म्हणजे वयाच्या ऐंशी किंवा नव्वदीत असलेल्या व्यक्तींचाही सांभाळ करत असता. म्हणजे एकाच वेळी तुम्ही कोणापेक्षा तरी ज्येष्ठ असता आणि त्याच वेळी तुमच्यापेक्षा ज्येष्ठांचा लहान मुलाप्रमाणे सांभाळही करत असता.

७) विनम्र विरुद्ध उद्धट : रोजच्या आयुष्यात तुम्हाला दोन टोकाचे अनुभव येऊ शकतात. एखाद्या बँकेत, समारंभात किंवा दुकानात किंवा ट्रॅफिकमध्येही तुमच्या वयाचा मान राखला जातो. त्याच दिवशी कदाचित पूर्णपणे विपरीत अनुभव येऊ शकतो. म्हणजे कोणीतरी चुकीच्या बाजूने (राँग साइड) वेगात अंगावर गाडी घालेल किंवा उद्धटपणे ‘ए म्हाताऱ्या’ अशी शेरेबाजी करेल.

८) मागितल्याशिवाय सल्ला देणे विरुद्ध गप्प राहणे : हे द्वंद्वही रोजच्या रोज मनात सुरू असते. काही वेळा तुम्हाला स्पष्ट दिसत असते की, एखाद्याला सूचना किंवा सावध करून तुम्ही तिचा त्रास वाचवू शकता. पण पूर्वानुभव गप्प राहायला भाग पाडतो. प्रत्येक वेळी आपले मत मांडायलाच हवे, असे काही नाही. यावर उत्तम उपाय म्हणजे, विचारल्याशिवाय कोणाला सल्ला देऊ नका. कोणीतरी विचारण्याची वाट पाहा किंवा स्वतःहून सांगायचे असल्यास अगदी मोघमपणे बोला, जेणेकरून आपण सल्ला देत आहोत असे कोणाला वाटणार नाही.

९) गोंधळलेपण विरुद्ध नेमकेपणा : आणखी एका बाबतीत संतुलन साधायला हवे. ते म्हणजे, किती धरून ठेवायचे आणि वयानुसार किती सोडून द्यायचे. काही निर्णय घेताना ‘आर या पार’ असा दृष्टिकोन न ठेवता सारासार विचार करून निर्णय घ्या. मग त्या भावना असोत वा वस्तू; या प्रत्येकासाठी एकच नियम लागू पडणार नाही. तुमच्या नात्यांकडे आणि तुमच्याकडे असलेल्या वस्तूंकडे गोंधळून न जाता वस्तुनिष्ठपणे पाहा आणि ज्यामुळे तुम्हाला खरोखरच आनंद मिळतो तेवढेच सोबत ठेवा. आतापर्यंत ज्या काही गोष्टी किंवा नाती उगीचच सांभाळून ठेवली होती,ती हसतमुखाने (आणि तितक्याच निर्विकारपणे) सोडून द्यायला मागेपुढे पाहू नका.

१०) स्मरणरंजन विरुद्ध वर्तमानः आजच्या काळाशी तुलना करत ‘आमच्या वेळी’ हे पालुपद लावणे सोपे असले तरी असे करू नका.आजच्या स्थितीबद्दल नाके मुरडत असलात तरी आपल्याला वर्तमान स्वीकारावाच लागेल. अशा परिस्थितीत दररोज किंवा आठवड्याला अशा तीन गोष्टींची नोंद घ्या, ज्या ‘आपल्या वेळे’च्या तुलनेत आज अधिक चांगल्या आहेत. यामुळे आजच्या जगात झालेली प्रगती आणि बदल पाहण्यास आपण जिवंत आहोत, याबद्दल कृतज्ञतेची भावना निर्माण होईल. स्मरणरंजन चांगले असले तरी वर्तमानाचे वास्तव मान्य करायला हवे.

११) नवलाई विरुद्ध उदासीनता: एखाद्या दिवशी आपण सर्व काही उपहासाच्या चष्म्यातून पाहतो किंवा ‘सर्व असेच सुरू राहणार’ असल्याची खंत वाटते आणि कशातही स्वारस्य वाटेनासे होते. त्याच दिवशी काही क्षणांनंतर काही गोष्टींचे आश्चर्य वाटू शकते किंवा आपल्या सभोवताली असलेल्या जगाबद्दल नव्याने आदर निर्माण होऊ लागतो. या दोन्ही भावना स्वीकारणे महत्त्वाचे असते. एकीकडे औदासीन्य तर दुसरीकडे नवलाई या दोन्ही भावना तितक्याच खऱ्या आहेत, हेही मान्य केले पाहिजे. या दोन्ही अवस्था बहरतात आणि वाढत जातात. त्यामुळे औदासीन्यापेक्षा नवलाईच्या भावनेला चालना दिली पाहिजे.

१२) अर्धा भरलेला पेला विरुद्ध अर्धा रिकामा पेला : कधी वाढलेली मेडिकलची बिले, कधी दुखणी-वेदना आपल्याला सतावत असतात.त्याच वेळी आपले समवयस्क आपल्याला सोडून जात असतात. अशा वेळी आपलाही प्रवास आता शेवटाकडे होत चालल्याची जाणीव होते.काही वेळा तर आपण या जगातून निघून गेलेलेच बरे, तसेही पुरेसे जगून झाले आहे, अशी भावना मनात घर करते. त्याच वेळी आपण जगत असलेल्या प्रत्येक क्षणाबद्दल कृतज्ञतेची भावना दाटून येते. या दोन्ही अवस्था पूर्णपणे खऱ्या असतात. त्यामुळे अमुक एक भावना येऊ नये, असे जर कुणी सांगत असेल तर त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा!

आपण जगाच्या कोणत्याही भागात राहत असलो आणि आपले आयुष्य आपण ठरवल्याप्रमाणे पुढे सरकत असले-नसले तरी आपण आपले शारीरिक आणि मानसिक संतुलन तसेच विवेकबुद्धी शाबूत ठेवायला हवी. कारण वाढत्या वयानुसार हे दोन्ही पैलू हीच तुमची सर्वात मोठी जमेची बाजू ठरणार असते.

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


गौरी डांगे

(गौरी डांगे या अनुभवी कौन्सिलर व लेखिका आहेत.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.