मारोतरावचा ७/१२
मारोतराव सिद्रप्पा लिंबाळे… मामलेदार कचेरीजवळच्या झाडाखाली रेणूका टी स्टॉलपाशी उभा होता. चहा ग्लासात भरून देत चहावाल्याने विचारलं, काय काम काढलं?
मारोतराव चहाचा घोट घेत म्हणाला, ‘‘७/१२!’’चहावाला ‘बरं’ अर्थाने मान हलवत, थोडं बाजूला जात तोंड मोकळं करून पुन्हा आपल्या यांत्रिक हालचालीत सामील होत म्हणाला, ‘‘भाऊसाहेब उगवतातच बारा वाजता! आत्ताशी साडेदहा होतायत.’’ अशी वास्तवाची जाणीव मारोतरावला देऊन तो पुन्हा लयबद्ध हालचालीत विलीन झाला.
मारोतराव सिद्रप्पा लिंबाळेचा ७/१२ हा सरकारी दप्तरासाठी एक वेगळाच प्रशासनिक प्रश्न बनून राहिला होता. मामलेदार कचेरीतील भाऊसाहेबांपासून ते कलेक्टर कचेरीत दस्तुरखुद्द कलेक्टर साहेब, त्यांचे उतरंडीतले सर्व कर्मचारी यांनी आपआपल्या परीने उपाय सांगितले. कलेक्टर साहेबांनी तर ती फाइल ‘प्लीज गाईड’ असा शेरा मारून महसूल विभागाच्या मुख्य सचिवांनाच पाठवली. त्यांनी ती महसूल मंत्र्यांना दाखवली, तर मंत्र्यांनी ती सामान्य प्रशासन सचिवाकडून अहवाल मागवा म्हणून तिकडे सरकवली.
फायलीच्या प्रवासाबरहुकूम मारोतराव दोनदा मंत्रालय वारीही करून आले, पण निर्णय काही झाला नाही.
शेतकऱ्याचा ७/१२ ऑनलाइन द्यायच्या काळात मारोतरावचा ७/१२ हा प्रशासनासाठी नवाच ताप झाला होता. तर हा ताप नेमका काय होता?
मारोतराव सिद्रप्पा लिंबाळे सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी जवळच्या एका ५०/६० उंबऱ्याच्या गावचा अल्पभूधारक शेतकरी. ही अल्पभू त्याच्या बापजाद्यापासूनची. मारूतीचा बाप सिद्रप्पाची बहीण कुंदाची सोयरीक जुळली बेळगाव जवळच्या गावी. तिकडं तिचं सगळं बरं होतं, पण सात वर्षांत पाळणा हलला नाही तसा सिद्रप्पाने आपला तिसरा पोरगा मारोतराव बहिणीला दत्तक दिला नि मारोतराव तिकडचाच झाला!
सिद्रप्पाला मारोतराव धरून चार पोरं नी तीन पोरी, त्यामुळे मधला मारोतराव बहिणीला दिल्याने घरात काही वजाबाकी जाणवली नाही. पण बहीण आज निपुत्रिक आहे, पुढं मागं पोट राहिलं तर मारोतराव त्याच्या आत्या कम नव्या आईकडे म्हणजेच तिच्या सासरी बेदखल होऊ नये म्हणून सिद्रप्पाने बहिणीच्या यजमानांना मारोतराव बहिणीच्या सासरच्या ७/१२ वर राहील, याचा कागद करायला लावला.
बहीण काही पोटुशी राहिली नाही. मारोतरावच त्या घरचा दिवा झाला. पुढे एका अपघातात कुंदाचे यजमान गेले नी ७/१२ वर मारोतरावचे नाव लागले.बहिणीचं सासर खाऊनपिऊन अल्पभूधारकाच्या वरच्या रकान्यात मोडणारं. इकडे सिद्रप्पापण थकला होताच. बहिणीच्या यजमानाला कागद करायला लावणारा सिद्रप्पा घरचे कागद आज करू उद्या करू, या बेफिकिरीत राहिला नी तसाच गेला. तो गेला, पण बहिणीला दत्तक गेलेला मारोतराव कागदोपत्री आजही सिद्रप्पाच्या रेशनकार्डावर होता. रेशनकार्डावरून तो थेट सिद्रप्पाच्या ७/१२ वर आपसूक वारस म्हणून आला!
आता मारोतराव महाराष्ट्र नी कर्नाटक अशा दोन्ही दप्तरात ७/१२ वर मौजूद दिसत होता आणि राज्य व केंद्र सरकारच्या शेतकरी सन्मान योजनेचा लाभार्थी ठरला मारोतराव.
मारोतराव सिद्रप्पा लिंबाळे हा दोन राज्यातून लाभार्थी कसा होऊ शकतो म्हणून मारोतरावच्या नावाने विरोधी पक्षांनी बोंब ठोकली. हा सरकारी भ्रष्टाचार आहे, अशा प्रकारे सत्ताधारी दोन-दोन राज्यांत लाभार्थी निर्माण करून दोन्हीकडे निवडणुका जिंकू पाहताहेत. तेव्हा मारोतरावचा एक ७/१२ रद्द झालाच पाहिजे, अशी भूमिका विरोधी पक्ष नेत्यांनी घेतली.
यावर महाराष्ट्र सरकारचं म्हणणं, मारोतरावचा बाप सिद्रप्पा हा महाराष्ट्राचा रहिवासी. मारोतराव हा त्याचाच मुलगा. त्यामुळे त्याचा वारसा हक्क इथलाच राहतो. त्यामुळे इथून नाव कमी होऊ शकत नाही. सर्व कुटुंबालाही आपल्या कुटुंबात एक लाभार्थी असणं सोयीचं होतं. मारोतरावचा महाराष्ट्रातील ७/१२च अधिकृत मानावा म्हणून सिद्रप्पा कुटुंब कोर्टात गेलंय.
तर कर्नाटक सरकारचं म्हणणं, मारोतरावचा जन्म महाराष्ट्राचा असला तरी त्याला कर्नाटकात दत्तक दिलाय. त्याच्या आत्याच्या नवऱ्याने त्याला वारस मानून आपल्या ७/१२ वर त्याचे नाव लागेल असा कागद केलाय. सबब, कर्नाटक सरकार त्याचे नाव कमी करणार नाही. कुंदा व तिचे सासरही लाभार्थी सहजासहजी सोडायला तयार होत नव्हतेच. तेही कोर्टात गेलेत.
आता हा प्रश्न दोन राज्यांतल्या सीमाप्रश्नासारखा मोठा होऊन बसलाय. दोन्ही राज्ये कोर्टात व केंद्राकडे दाद मागताहेत. केंद्र सरकार एक आयोग नेमतं.त्या आयोगाचा अहवाल येतो, त्यात लाभार्थी योजना एकाच राज्याची घेता येईल आणि मारोतराव सज्ञान असल्याने त्याने राज्य निवडावे असे अहवाल म्हणतो.
हा अहवाल दोन्ही राज्ये फेटाळतात. यातून एका राज्यावर व पर्यायाने एका कुटुंबावर अन्याय होणार. सबब, हा अहवाल मंजूर नाही. यावर विरोधी पक्ष म्हणतात, दोन्ही राज्यांतून हा लाभार्थी वगळा. आता गोंधळ वाढतो. कारण दोन्ही राज्यांत वेगवेगळ्या पक्षांची सरकारे. ती म्हणतात, आम्ही का लाभार्थी वगळू?
या गोंधळात डबल लाभार्थी मारोतरावला सख्खं कुटुंब ना काही विचारत, ना सख्खी आत्या, ना दोन्ही सरकारे, ना दोन्हीकडची प्रशासने, ना देशातलं कोर्ट! मारोतराव प्रत्यक्ष नि कागदावर हेलपाटे मारतोय. एवढे हेलपाटे तर लक्ष्मणाला वाचवणारी जडीबुटी शोधायलापण नाही लागले, असा आतला आवाज आतल्या आत म्हणाला!
सत्ताधारी दोन्हीकडचे, दोन्हीकडच्या विरोधकांना म्हणाले, तुमचा प्रॉब्लेम काय आहे? माणूस एक पण त्याचे ७/१२ दोन!
ते दोन उतारे दोन राज्यातले. खाल्लं दोन टाइम तर काय बिघडतं?
त्यावर विरोधी पक्ष म्हणाले, प्रश्न खाण्याचा नाही. प्रश्न फक्त मानवतेचा नाही, तर प्रश्न गंभीर प्रशासनिक चुकीचा आणि सरकारी योजनेच्या दुरुपयोगाचा आहे. प्रश्न नैतिक आहे आणि त्यामुळेच तो देशाच्या नैतिकतेचाही आहे.
मारोतरावच्या ७/१२ चे प्रकरण चिघळत जायची शक्यता आहे. मारोतरावला कळत नाही कालपर्यंत देश म्हणून मला नकाशा दाखवत, त्यात दोन्ही राज्ये होती. दोन राज्यांत रहात मी इकडे-तिकडे जात-येत होतो, मला कुणी अडविले नाही. दोन्हीकडे मी वारस म्हणूनच वावरलो, खाल्लो, प्यायलो. सरकारी रक्कम दोन्हीकडे खर्च केली, पण या ७/१२ च्या कागदात मी असा अडकवला गेलोय, की खरंच वाटत नाही की पुराणातला माझा पूर्वज हनुमान उडी मारून सूर्य गिळणारा होता! आणि त्याचा आजचा वारस मी दोन आकडे नि मधल्या तिरक्या रेघेत असा अडकलोय की हलणं मुश्कील. द्रोणागिरी उचलणाऱ्या पूर्वजाच्या वारसाला आता दोन सरकारी दस्त हलविणे जमेना.
आता मी ‘जय श्रीराम’ म्हणू की ‘हे राम!’ हेच समजेनासं झालंय.
मारोतराव सिद्रप्पा लिंबाळे सरकारी दप्तर नि पौराणिक पोथीत आपली लंकादहन करून अजरामर झालेली शेपटी सापटीत बोट सापडावं तशी अडकवून बसलाय.
तेवढ्यात दूरवरून त्याला कर्कश्श हनुमान चालिसा ऐकू येते आणि मारोतराव सिद्रप्पा लिंबाळे महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवर आपल्या आतली पूर्वजाची शेपटी बाहेर काढून अर्धी इकडे नि अर्धी तिकडे टाकून बसतो नि मनात म्हणतो, बघू येतो का कुणा भीमाचा वारस!
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
संजय पवार
(लेखक नाटककार, स्तंभलेखक, संवाद-पटकथा लेखक, चित्रकार आणि जाहिरातकार आहेत.)