Mind Power | Inner Strength | Mental Energy | Positive Thinking | Ancient Wisdom | Self Awareness | Spiritual Growth

तुमच्या मनातील अद्भुत शक्ती | दत्तप्रसाद दाभोळकर | Power of Thought: How the Mind Creates Miracles or Monsters | Dattaprasad Dabholkar

तुमच्या मनातील अद्भुत शक्ती

तुम्हाला ही लोककथा माहीत असेल, एक माणूस जंगलातून चालला होता. भयंकर दमला होता. तहानेने व्याकूळ झाला होता. तो एका झाडाखाली बसला. त्याच्या मनात आले, ‘यावेळी आपल्याला कोणी तांब्याभर थंड पाणी आणि सुग्रास अन्नाने भरलेले ताट दिले, तर किती बरे होईल!’ आणि क्षणार्धात या गोष्टी त्याच्या समोर आल्या. तृप्त होऊन त्याने थोडी डुलकी घेतली. जाग आल्यावर त्यालाच कळेना हे काय आहे? ‘बापरे, हे एखाद्या राक्षसाचे झाड असणार. तो आता येणार आणि मला खाणार.’ क्षणात खरेच राक्षस आला आणि त्याला खाऊन गेला. तो ज्या झाडाखाली बसला होता, तो कल्पवृक्ष होता आणि खरे सांगायचे तर या गोष्टीतला कल्पवृक्ष म्हणजे तुमचे मन !

या मनाची करामत आपल्याला सांगताना बहिणाबाईंनी सांगितले आहे,

मन जहरी जहरी, त्याचे वेगळे तंतर

अरे विचू साप बरे, त्याले उतारे मंतर

खरेतर याच्या फार पूर्वी ‘गीते’मध्ये आपल्याला हेच सांगितले आहे,

आत्मा बंधू सखा मित्र

आत्माच रिपू आपुला

म्हणजे आपण स्वतःच स्वतःचे जिवाभावाचे मित्र असतो आणि आपले फार मोठे शत्रूही असतो! याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे आपण आपली खरी ओळख विसरून गेलेलो असतो. तुम्हाला पंचतंत्रातील ती गोष्ट माहीत आहे का? सिंहाचा एक बछडा कोल्ह्यांच्या कळपात वाढत असतो. समोरून हत्ती येतोय असे पाहून सारा कळप पळायला लागला. तो सिंहाचा बछडाही पळायला लागतो. समोरून जाणारा एक सिंह त्याला म्हणतो, ‘बाळा थांब, समोरच्या विहिरीत डोकावून बघ तू कोण आहेस, ते समजून घे. येथेच ताठ मान करून उभा राहा. हत्तीच तुला पाहून पळून जाईल.’

ही गोष्ट खरी आहे, पण अपुरी आहे. त्या सिंहाच्या बछड्याला फक्त आपले बाह्यरूप दिसले. त्याच्या मनातील ताकद त्याला समजली नाही. आपल्या मनातील ताकद किती विलक्षण किंवा अद्भुत आहे, ते विनोबा भावे यांनी सांगितले आहे. हिरोशिमा,  नागासाकी एका क्षणात उद्ध्वस्त करत अणुध्वंस झाला, त्या वेळी ते म्हणाले, ‘एका निर्जीव, दुर्लक्षित, असाहाय्य अणूत केवढी प्रचंड ताकद आहे ते आपण पाहतोय.एका क्षणात हा अणू, सर्वरक्षक आणि सर्वभक्षक होऊ  शकतो. तो सबंध महानगर एका क्षणात बेचिराख करू शकतो आणि ठरवले तर तोच अणू एखाद्या महानगराला वर्षभर वीज पुरवू शकतो. एका निर्जीव, निरुपयोगी, दुर्लक्षित अणूत जर एवढी प्रचंड सर्वरक्षक आणि सर्वभक्षक ऊर्जा असते, तर एका जिवंत विचारात, तुमच्या मनात, केवढी अमर्याद अद्भुत शक्ती असेल ? मात्र निर्जीव अणुतील शक्ती त्याला समजते ज्या
वेळी त्याच्यावरती ‘किरणोत्सर्ग’ पडतो! तुमच्या माझ्या मनावर पडू शकणारा हा किरणोत्सर्ग कोणता? तो बाहेरून येतो, की आतूनच येतो?

एक वेगळी गोष्ट लक्षात घ्या. आपल्या भारतीय वंशाची एक महिला सुनीता विल्यम्स. तिचे वडील भारतातच राहिले असते तर ‘रांधा, वाढा, भांडी घासा’ हा तिचा दिनक्रम होणार होता. अर्थातच हे पूर्णपणे खरे नव्हे. आजही भारतात राहून सावित्रीबाईंचा वारसा जपत गगनाला गवसणी घालणाऱ्या अनेक कर्तृत्ववान स्त्रिया आहेत. पण सुनीताची गोष्टच वेगळी. ती चक्क गगनाला गवसणी घालावी म्हणून अमेरिकेतील अंतराळ विभागात कामाला लागली. अंतराळ मोहिमेसाठी एक आठवडा आपल्या सहकाऱ्याबरोबर अंतराळात गेली. खरेतर यातही तसे काही खास नाही. आजकाल अनेक अंतराळवीर अशा मोहिमांसाठी अंतराळात जात असतात. खरी भयंकर गोष्ट पुढची आहे. फक्त सात दिवसांसाठी अंतराळात गेलेली ही अंतराळवीर नऊ  महिने तिथेच अडकून पडली. कुटुंबीय, मित्र, एवढेच काय नेहमीची हवा, अन्न, गुरुत्वाकर्षण काही बरोबर नाही. त्याहीपेक्षा भयंकर म्हणजे आपण परत कधी जाणार की जाणारच नाही याचा काहीही अंदाज नाही. खरेतर न जाण्याचीच शक्यता अधिक! अशा परिस्थितीत तिने दिवाळी, नाताळ, नवे वर्ष या वेळी तेथून पृथ्वीवरील माणसांना शुभेच्छा दिल्या, त्या वाचताना आपण हबकून जातो. ती अगदी मजेत आहे आणि आपल्या घरच्यांना आणि मित्रांना ‘टुकटुक करून तुमची कशी जिरली, मी कशी भाग्यवान आहे असे सांगत आहे असे वाटते !’

या मुलीच्या मनात ही अद्भुत शक्ती कशी आली असेल? कोठून आली असेल? अमेरिकेतल्या अंतराळ विभागाने त्याचे उत्तर दिले आहे, ‘आमच्या अंतराळ विभागातील कोणताही अंतराळवीर अगदी सहजपणे असाच वागला असता! आमच्या अंतराळ विभागाच्या प्रशिक्षणातून असे तप्त संस्कार असलेले अंतराळवीर आम्ही तयार करतो. कोणत्याही क्षणी अचानकपणे येणाऱ्या कितीही मोठ्या संकटाला, ‘अरे ही तर मस्त नवी संधी आहे, म्हणून ते हसत हसत सामोरे जातात.’

तुमच्या मनात एक प्रश्न आला असणार, ‘हे शिक्षण मला कोण देणार?’ आणि त्याचे उत्तर तुमच्या संस्कृतीने तुम्हाला देऊन ठेवले आहे, ‘तुज आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी’ हा मंत्र समजलेले आपले तुकाराम महाराज, दुष्काळात त्यांचा मुलगा आणि बायको तडफडून मरण पावलेत, दिवाळे निघालेले, लिहिलेले अभंग मत्सरी माणसांनी पाण्यात बुडवले. अशा वेळी तुकाराम आपल्याला एक नवा मंत्र देतात, ‘तरी बरे’, म्हणजे याहूनही किती वाईट झाले असते याचा विचार करा. समजा या दुष्काळात मी अपंग झालो असतो, आंधळा  झालो असतो तर, हा विचार मनात आणा आणि हा मंत्र समजून व्यवहारात आणणारे तुकाराम नंतर ‘मन करा रे प्रसन्न, सर्व सुखाचे कारण’ म्हणून आपल्याला सांगतात.

आता तुमच्या मनात प्रश्न येणार, ‘तरी बरे’ पासून ‘मन करा रे प्रसन्न’ इथपर्यंतचा प्रवास तुकारामांनी कसा केला असेल? याचे उत्तर स्वामी विवेकानंदांनी स्वतः यातनांमध्ये होरपळत असताना दिले आहे. विवेकानंदांचा मृत्यू १९०२ मध्ये झाला. त्या वेळी ते फक्त ३९ वर्षांचे होते. युरोपचा दौरा आटपून विवेकानंद १८९७ मध्ये भारतात आले तेव्हा सनातनी मंडळींनी त्यांना मरणप्राय यातना दिल्या. याच सुमारास विवेकानंदांनी बेलूर मठाची स्थापना केली. त्या वेळी एकाही संस्थानिकाने वा जमीनदाराने त्यांना फुटक्या कवडीची मदत दिली नाही. उलट हा मठ नव्हे, हे आहे ‘विवेकानंदांचे विश्रामगृह’ म्हणून त्यावर भला मोठा कर बसवला! भारतातील आपला मठ चालवण्यासाठी अमेरिकेत भाषणे देऊन पैसे मिळवीन, या विश्वासाने इसवी सन १९०० मध्ये विवेकानंद अमेरिकेला गेले आणि त्यांच्या आयुष्यातील यातनापर्व सुरू झाले. त्यांनी इंग्लंड, अमेरिकेत उभे केलेले आणि वाढवलेले ‘वेदांत आश्रम’ पूर्णपणे कोसळले. अमेरिकेत त्यांच्या भाषणाला श्रोते येत असले तरी त्यातून सभागृहाचे भाडेसुद्धा निघत नव्हते! त्यांनी १७ जून, १९०० रोजी आपली शिष्या मेरी हेल हिला पत्र पाठवून कळवले की, ‘भाषण हे फक्त आता माझ्या उपजीविकेचे साधन उरले आहे. भारतात परत जाण्याएवढे तिकीटाचे पैसे गोळा होणेही शक्य नाही.’ आपले शिष्य आणि शिष्या यांना पत्र पाठवून ते विनंती करत होते, ‘मला किमान लंडनला जाण्यापुरते पैसे भिक्षा म्हणून द्या. मग तेथे भाषणे देत पुढील प्रवासखर्चाचे पैसे मिळतील.’ मात्र कुणाही शिष्यांनी त्यांना भिक्षा घातली नाही! एका परिसंवादाचे बोट धरून विवेकानंद जुलै १९०० मध्ये पॅरिसला गेले. ओळख नसलेल्या एका माणसाचा अनाहूत पाहुणा म्हणून चाळीतील पाचव्या मजल्यावर एका खोलीत तीन महिने राहिले. त्यानंतर मॅडम काल्व्हे यांच्याबरोबर रेल्वेने इजिप्तला पोहचले. तेथे त्यांनी दिलेल्या तिकिटावर बोटीने डिसेंबर १९०० अखेर मुंबईला पोहचले. पुढील दीड वर्षात विवेकानंदांनी बेलूर मठ डौलात उभा केला!

सांगत होतो, ती गोष्ट वेगळी. ८ जानेवारी १९००ला विवेकानंदांनी जे पहिले भाषण दिले त्याचे शीर्षक आहे ‘पॉवर्स ऑफ  माइंड’ म्हणजे ‘मनाची शक्ती’. ते भाषण फार महत्त्वाचे आहे. विवेकानंद श्रोत्यांना नव्हे, तर स्वतःलाच मनाच्या शक्तीची आठवण करून देत आहेत असे वाटते. त्या भाषणात आणि त्यानंतरच्या काही भाषणात त्यांनी जे सांगितले ते म्हणूनच महत्त्वाचे आहे. त्यांनी या भाषणामधून सांगितले की, ‘कोणताही धर्मग्रंथ डोळसपणे वाचा. त्यातील चमत्कार आणि मिथककथा बाजूला ठेवा आणि त्यातील गाभा समजून घ्या. तो तुम्हाला तुमच्या मनातील अपरंपार शक्ती कशी उपयोगात आणता येईल, हे सांगतो. योग आणि समाधी यातील वरवरच्या गोष्टीत गुंतून न पडता त्यातील मनाचे विज्ञान समजून घ्या. तुमच्या श्वासाचे नियंत्रण, तुमच्या मनाचे नियंत्रण, तुमच्या मनाची एकाग्रता या गोष्टी काही काळाने तुम्हाला सहजपणे प्राप्त होतील आणि हे जर आपण केले तर ‘माझे आहे माझ्यापाशी, परी मी फिरतो देशोदेशी’ हे आपल्या लक्षात येईल.

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


दत्तप्रसाद दाभोळकर

(लेखक दिल्लीमधील श्रीराम इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्चचे माजी संचालक आहेत.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.