बनाना नेट डोसा विथ बनाना स्टेम चटणी
डोशाचे साहित्य: २ कप केळ्याचे पीठ, १/४ वाटी साबुदाणा पीठ, चवीनुसार मीठ व पाणी.
भाजीचे साहित्य: ४ उकडलेली कच्ची केळी, प्रत्येकी १ कांदा व टोमॅटो, १/४ कप मटार, २ मोठे चमचे आले-मिरची पेस्ट, फोडणीसाठी तेल, मोहरी, कढीपत्ता, उडीदडाळ, हिंग, हळद, चवीनुसार मीठ, कोथिंबीर.
चटणीचे साहित्य: १ कप केळीच्या गाभ्याचे छोटे काप, प्रत्येकी २ चमचे चणाडाळ व उडीदडाळ, १/४ कप ओले खोबरे, ८-१० कढीपत्त्याची पाने, प्रत्येकी १ छोटा कांदा व टोमॅटो, ४-५ लसूण पाकळ्या, ३-४ सुक्या लाल मिरच्या, फोडणीसाठी तेल, हिंग, हळद व मीठ.
भाजीची कृती: केळी उकडून सोलून कुस्करून घ्या. कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, हळद, उडीदडाळ, कढीपत्ता घाला. उडीदडाळ लालसर झाल्यावर बारीक चिरलेला कांदा घाला. आता त्यात टोमॅटो, आले-मिरची पेस्ट, मटार, कुस्करून घेतलेली केळी आणि चवीनुसार मीठ घालून एकजीव करून घ्या. कढईवर झाकण ठेवून भाजीला एक वाफ काढा, वरून कोथिंबीर घाला. डोशाची भाजी तयार आहे.
चटणीची कृती: चटणीसाठी कढईत तेल गरम करून त्यात उडीद व चणाडाळ घालून लालसर होईपर्यंत परतून घ्या. त्यात लाल सुक्या मिरच्या, कढीपत्ता, कांदा, टोमॅटो, ओले खोबरे व केळीच्या गाभ्याचे काप टाकून परतून घ्या. त्यानंतर लसूण, हळद आणि मीठ घालून परतून घ्या. मिश्रण थंड झाल्यावर चटणी वाटून हिंग-कढीपत्त्याची फोडणी द्या.
डोशाची कृती: केळ्याचे पीठ व साबुदाणा पीठ एकत्र करून त्यात चवीनुसार मीठ घाला. पिठात पाणी घालून डोशाचे मिश्रण तयार करा. हे मिश्रण प्लास्टिक पिशवीत भरा. (मेंदीच्या कोनप्रमाणे) पिशवीच्या टोकाला छिद्र करून नॉनस्टिक तव्यावर हे मिश्रण नेटप्रमाणे पसरवा. डोसा एका बाजूने झाल्यावर उलटा व त्यामध्ये केळीची भाजी भरून गुंडाळी करा. हा गरमागरम डोसा केळीच्या पानावर चटणीसोबत सर्व्ह करा.
अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
प्रणाली पोतदार, पनवेल
