organ donation | organ donor

मरावे परी देहरूपी उरावे | रेश्मा आंबेकर | The Gift of Life: Why Organ Donation Matters | Reshma Ambekar

मरावे परी देहरूपी उरावे

भोपाळच्या अंकिता श्रीवास्तवने २०२३ मध्ये झालेल्या ‘वर्ल्ड ट्रान्स्प्लांट गेम’मध्ये लांब उडी आणि थ्रो बॉल स्पर्धेत विक्रमी कामगिरी करत तीन पदके जिंकली. यापूर्वीही २०१९ मध्ये तिने दोन सुवर्णपदके आणि एक रौप्य पदक जिंकून जागतिक विक्रम रचला होता. तर जोधपूरच्या राहुल कुमार प्रजापतीने याच स्पर्धेत थाळीफेकमध्ये कांस्य पदक जिंकले. हे खेळाडू त्यांच्या कामगिरीबरोबरच लक्षात राहतात, ते त्यांच्या दांडग्या इच्छाशक्तीमुळे. कारण अंकिता श्रीवास्तवने आपल्या आईला स्वतःचे ७४ टक्के यकृत दान केले आहे. तर राहुलवर हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली आहे, म्हणजेच अवयव दाता आणि अवयव स्वीकारणारा अशा दोघांनीही प्रबळ इच्छाशक्ती आणि शारीरिक स्वास्थाच्या जोरावर कमावलेले हे यश निश्चितच कौतुकास्पद आहे. राहुलच्या जिवंत उदाहरणांमुळे तरी अवयव दानाला प्रोत्साहन मिळेल, अशी आशा आपण ठेवू शकतो.

. अवयवदान म्हणजे काय ?

अवयवदान म्हणजे एखाद्या व्यक्तीने जिवंतपणी (१८ वर्षांवरील व्यक्ती स्वतःच्या इच्छेने) तर मृत्यूपश्चात (मेंदू मृत झाल्यास) त्याच्या नातेवाइकांनी मृत व्यक्तीचे अवयव दान करून जगण्यासाठी अवयवांची गरज असलेल्या दुसऱ्या व्यक्तीला जीवन देणे! मृत्यूपश्चात (ब्रेन डेड) व्यक्ती आपले अवयव दान करून एकाच वेळी आठ जणांना जीवनदान देऊ शकते. अमेरिकेतील रोनाल्ड ली हेरिक हे अवयवदान करणारे पहिली व्यक्ती होते. १९५४ मध्ये रोनाल्ड यांनी आपला जुळा भाऊ रिचर्ड हेरिक याला मूत्रपिंड दान केले होते. अवयव प्रत्यारोपणाची ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणाऱ्या डॉ. जोसेफ मरे यांना या कामगिरीसाठी १९९० मध्ये ‘फिजिओलॉजी आणि मेडिसिन’मधील नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले होते.

. अवयवदानाची गरज

‘नॅशनल हेल्थ पोर्टल ऑफ इंडिया’नुसार भारतात दरवर्षी पाच लाख रुग्णांचा अवयव उपलब्ध न झाल्यामुळे मृत्यू होतो. यामध्ये यकृताअभावी मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या सर्वाधिक म्हणजे दोन लाख एवढी आहे. वर्ष २०२१ मध्ये जागतिक स्तरावर १,४४,३०२ अवयव प्रत्यारोपण झाले. तर वर्ष २०२२ मध्ये १,५७,४९४ अवयव प्रत्यारोपण झाले.

भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या राष्ट्रीय अवयव प्रत्यारोपण कार्यक्रमाच्या आकडेवारीनुसार भारतात अवयव प्रत्यारोपणाची गरज असलेले रुग्ण आणि अवयवदान करणारे दाते यांच्या आकडेवारीत मोठी तफावत आढळते. भारतात अंदाजे दरवर्षी १,८०,००० रुग्णांचे मूत्रपिंड निकामी होते. मात्र मूत्रपिंड प्रत्यारोपणाची संख्या अवघी सहा हजार इतकी आहे. दरवर्षी अंदाजे दोन लाख रुग्णांचे यकृत निकामी होऊन त्यांचा मृत्यू होतो. वर्षाला सुमारे २५-३० हजार यकृत प्रत्यारोपणाची गरज असते, पण वर्षभरात केवळ १५०० प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्या जातात. दरवर्षी सुमारे ५० हजार व्यक्तींना हृदयविकाराचा त्रास होतो. त्या तुलनेत वर्षाला फक्त १० ते १५ हृदय प्रत्यारोपण होते. तर एक लाख रुग्णांना कॉर्नियाची गरज असताना केवळ २५ हजार प्रत्यारोपण केले जाते.

भारतात दहा लाखांमागे फक्त ०.८० लोक अवयवदान करतात. अवयवदात्यांच्या तुलनेत अवयवांची मागणी जास्त आहे. त्यामुळे अनाथ मुले, भिकारी यांना पकडून त्यांचे अवयव काढून घेणे, गरीब-गरजू लोकांना पैशांचे आमिष दाखवून त्यांचे अवयव काढून घेणे, डॉक्टरांच्या मदतीने अवयवांची तस्करी करणे अशाही गोष्टी उघड झाल्या आहेत. अवयवांची होणारी ही अवैध व्यावसायिक विक्री थांबवण्यासाठी केंद्र सरकारने १९९४ मध्ये मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा लागू केला.

 ३. अवयवदानाचे प्रकार

अवयवदानाचे दोन प्रकार आहेतः जिवंत व्यक्तीकडून केले जाणारे अवयवदान म्हणजेच living donor organ donation आणि दुसरे मृत किंवा ब्रेन डेड व्यक्तीकडून केले जाणारे अवयवदान म्हणजेच deceased donor organ donation. जिवंतपणी आपण एक किडनी, स्वादुपिंडाचा तुकडा आणि यकृताचा एक छोटा भाग गरजू रुग्णाला दान करू शकतो. स्वादुपिंडाचा छोटा तुकडा कापल्यानंतरही स्वादुपिंडाचे कार्य सुरळीत सुरू राहते. तर यकृत असा एकमेव अवयव आहे, ज्याचा भाग कापल्यानंतर काही वर्षांनी तो वाढतो. या शस्त्रक्रियेत अवयवदाता व रुग्ण दोघांच्या शरीरात यकृताचा भाग वाढतो. जिवंतपणी केले जाणारे अवयवदान हे अत्यंत जवळचे नातेवाईक (पतिपत्नी, मुले, आई-वडील, भाऊ-बहीण, आजी-आजोबा) किंवा दूरचे नातेवाईक (काका, मामा) यांच्यासाठी केले जाते. मेंदू मृत झालेल्या व्यक्तीचे नातेवाईक मृत व्यक्तीचे (मृत्यूनंतर सहा तासांच्या आत) किडनी, हृदय, यकृत, स्वादुपिंड हे अवयव दान करू शकतात. मात्र दात्याने दिलेल्या हृदयाची ४ तासांत, यकृताची १२ तासांत तर किडनीची २४ तासांत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होणे गरजेचे असते. तर कुटुंबातील व्यक्तीचा नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर नातेवाईक मृत व्यक्तीचे डोळे, त्वचा, ऊती आणि हाडे दान करू शकतात.

. अवयवदान कोण करू शकतो?

* १८ वर्षांवरील कोणतीही व्यक्ती अवयव दान करू शकते. त्यासाठी संबंधित व्यक्तीने जिवंतपणीच अवयवदानाचा निर्णय घेऊन अर्ज भरावा लागतो.

* एखाद्या व्यक्तीचा मेंदू मृत झाला असेल तर अशा वेळी संबंधित व्यक्तीचे नातेवाईक अवयवदानाचा निर्णय घेऊ शकतात. शरीरातील प्रत्येक अवयवांचे नियंत्रण मेंदूकडून केले जाते. मेंदू काम करत नसेल तर शरीरातील अवयवांचे कार्य हळूहळू बंद होते. अशा रुग्णांना व्हेंटिलेटरवर म्हणजेच कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवले जाते. त्यामुळे शरीरातील अवयवांना रक्तपुरवठा होत राहतो आणि अवयव कार्यरत राहतात. अशी परिस्थिती उद्भवते तेव्हा चार डॉक्टरांचे एक पथक रुग्णाचा मेंदू मृत आहे की नाही, याची एक चाचणी करतात. या चाचणीचा रिपोर्ट ‘पॉझिटिव्ह’ आल्यास सहा तासांनी पुन्हा हीच चाचणी केली जाते. या दोन्ही चाचण्यांचा रिपोर्ट ‘पॉझिटिव्ह’ आल्यास डॉक्टरांचे पथक रुग्णाच्या नातेवाइकांना अवयवदानाविषयी माहिती देतात. नातेवाइकांची परवानगी असल्यास अवयवदान केले जाते. अवयव प्रत्यारोपणाची पूर्ण प्रक्रिया ही गुप्त ठेवली जाते. दात्याच्या नातेवाइकांना अवयव स्वीकारणारा आणि अवयव स्वीकारणाऱ्याला दाता किंवा त्याच्या नातेवाइकांबाबत कोणतीही माहिती दिली जात नाही.

* मृत्यूनंतर देहदान करणे हा आणखी एक पर्याय आहे. हा मृतदेह वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी पाठवला जातो.

. अवयवदानाची प्रक्रिया

* अवयवांची तातडीने गरज असलेला रुग्ण रुग्णालयात गेल्यास त्याची तपासणी केली जाते. सर्व चाचण्या झाल्यावरच अवयव प्रत्यारोपणासाठी रुग्ण गरजू असल्याचे समजले जाते. त्यानंतर दाता शोधण्याचे काम सुरू होते.

* अवयव प्रत्यारोपणासाठी दाता मिळाल्यानंतर दाता व स्वीकृता या दोघांच्याही फिटनेस आणि मानसिक चाचण्या केल्या जातात. सर्व तपासण्यांनंतर त्यांना फिटनेस प्रमाणपत्र दिले जाते.

* अवयव प्रत्यारोपणाचा परवाना असलेल्या प्रत्येक रुग्णालयात ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेशन समिती असते. ही समिती अवयवदाता आणि अवयवांची गरज असलेल्यांमध्ये आर्थिक व्यवहार होत नाही ना, याची खातरजमा करते. याच कारणाने ही सर्व प्रक्रिया गुप्त ठेवली जाते.

. अवयवदानाची सद्यःस्थिती

अवयव प्रत्यारोपण कायद्यांतर्गत महाराष्ट्र शासनाने १९९९ मध्ये या संदर्भात जी.आर. काढून या कायद्याला चळवळीचे रूप दिले. या कायद्याच्या अंतर्गत राज्यात प्रादेशिक पातळीवर काम सुरू असून अवयवदानाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. राज्यात २५ वर्षे हे काम सुरू असून या कामाला यश येत आहे. जिवंतपणी अर्ज दाखल  करणाऱ्यांची आजची संख्या पाहता ही आकडेवारी गेल्या १० ते १५ वर्षांपेक्षा  वाढल्याचे सहज लक्षात येते. या सद्यःस्थितीचा आढावा घेताना राज्य शासनाच्या विभागीय अवयव समितीच्या समन्वयक उर्मिला महाजन यांनी सांगितले, की  ‘‘अवयनदानाबाबत लोक सजग झाले असून अनेक जण जिवंतपणी अर्ज करून ठेवतात. (त्या अर्जाबाबतची माहिती कोणत्याही रुग्णालयात नसते.) संबंधित व्यक्तीच्या मृत्यूपश्चात त्यांच्या  इच्छेचा विचार करून अवयव दान करणे ही त्यांच्या नातेवाइकांची जबाबदारी असते. ही प्रक्रिया व्यक्तीच्या मृत्यूनंतर सहा तासांच्या आत होणे गरजेचे आहे. त्यासाठी नातेवाईकही तेवढेच जागरूक असायला हवेत. ही एक दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे ह्या चळवळीचे यश आणखी १५ ते २० वर्षांनी आपल्याला पाहायला मिळेल.’’

. दाता आणि स्वीकृता यांचे स्वास्थ्य

अवयवदान केल्यास आपण पहिल्यासारखे स्वस्थ राहू शकत नाही, असा समज अनेकांच्या मनात असतो. याबाबत उर्मिला महाजन म्हणाल्या, की प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेनंतर काही काळजी घेत अवयव दाता आणि स्वीकारणारा हे दोघेही स्वस्थ आयुष्य जगू शकतात. शस्त्रक्रियेनंतर योग्य काळजी घेतल्यावर दाता वर्षभरात पूर्वीसारखे आयुष्य जगू शकतो. (जसे की किडनीच्या प्रत्यारोपणानंतर किडनी दात्याला महिनाभर डायलिसिसवर ठेवले जाते.) तर अवयव स्वीकारणाराही नातेवाइकांचा भावनिक आधार, नियमित हलका व्यायाम, औषधे, वैद्यकीय तपासणी याद्वारे स्वस्थ आयुष्य जगू शकते.

येथे ही गोष्ट समजून घेणे महत्त्वाची ठरते, की शरीराबाहेरील एखादा जीवाणूही जेव्हा शरीरात प्रवेश करू पाहतो तेव्हा आपले शरीर त्याचा तीव्र विरोध करतो. येथे तर दुसऱ्या व्यक्तीचा अवयव शरीरात प्रत्यारोपण करायचा असतो, ज्यासाठी शरीर तयार होत नाही. त्यामुळे शरीराने अवयव स्वीकारण्याची आणि कार्यरत राहण्याची प्रक्रिया सुरळीत सुरू राहण्यासाठी रुग्णाला औषधांची मदत घ्यावी लागते.
ज्याप्रमाणे मधुमेह झालेली व्यक्ती नियमित औषधे आणि व्यायाम करून सामान्य व्यक्तीप्रमाणे स्वस्थ आयुष्य जगू शकते, त्याचप्रमाणे अवयव स्वीकृताही नियमित औषधांच्या साहाय्याने आपले आयुष्य स्वस्थपणे जगू शकतो. एखाद्या जिवंत किंवा मृत व्यक्तीने केलेले अवयवाचे दान याचे मोल अनमोल आहे. त्याचे मूल्य कोणालाही करता येणार नाही. त्या व्यक्तीने (दात्याने) आपल्याला मरणाच्या दाढेतून परत आणले आहे, हे वास्तव अवयव स्वीकृत्याने कायम लक्षात ठेवून दान म्हणून स्वीकारलेल्या अवयवाची काळजी घेणे ही आपली नैतिक जबाबदारी समजली पाहिजे, असेही महाजन यांनी सांगितले.

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


रेश्मा आंबेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.