Ash Gourd | Herbal Medicine | Summer Superfood | Weight Loss

गुणकारी कोहळा | वैद्य अश्विन सावंत | Curative Winter Melon | Dr Ashwin Sawant

गुणकारी कोहळा

‘आग्रे का पेठा’ सगळ्यांना आवडत असला, तरी हा पेठा ज्या कोहळ्यापासून बनवतात त्या कोहळ्याला मात्र आपल्या स्वयंपाकघरात स्थान नाही. घरात नकारात्मक ऊर्जा शिरू नये म्हणून घराच्या किंवा व्यवसायाच्या ठिकाणी कोहळा टांगण्याची परंपरा अनेक ठिकाणी आहे. त्यामुळे औषधी गुणधर्मांनीयुक्त असूनही कोहळ्याकडे आपण ढुंकून पाहत नाही. कोहळा (हिंदीत पेठा) ही एक फळभाजी आहे. दुधी भोपळ्याप्रमाणे हिरवट रंगाच्या या फळभाजीला पांढरा भोपळा असेही म्हटले जाते.

कोहळ्याचा वेल जमिनीवर सरपटत जातो. हा वेल प्रामुख्याने पावसाळ्यात (इतर ऋतूंमध्येही) उगवतो. काही शेतकरी शेतबागांमध्ये मुद्दामहून कोहळ्याची लागवड करतात. गावात याची वेल छपरांवर चढवली जाते. छपरावर पसरलेल्या या वेलीमुळे उन्हाळ्यात घरात नैसर्गिक थंडावा राहतो. मात्र कोहळे वजनदार असल्याने त्या फळांचा छपरावर पडणारा भार छपरासाठी धोकादायक ठरू शकतो. कोहळ्याला हिंदीमध्ये कुमडा वा पेठा, गुजरातीमध्ये कोहला वा पेठा, बंगालीमध्ये कुमरा (कुमडा), तेलुगूमध्ये भृरुं कोहळुं, मल्याळममध्ये गुम्मड आणि इंग्रजीमध्ये Ash Gourd म्हणतात, तर संस्कृत नाव आहे कुष्माण्ड. आजच्या काळात कोहळा प्रसिद्ध आहे, तो दाक्षिणात्य पदार्थ सांबारात केल्या जाणाऱ्या वापरासाठी. कोहळ्याचे चौकोनी तुकडे इतर भाज्यांसह मिसळून बनवला जाणारा सांबार अतिशय रुचकर लागतो.

चवीला गोड असणा‍ऱ्या कोहळ्याचा पचनानंतर शरीरावरील परिणाम (विपाक) सुद्धा गोडच असतो. कोहळा गुणाने थंड असून तो पित्तशामक आहे. अर्धवट पिकलेला कोहळा कफकर आहे, तर पिकलेला वात-पित्त-कफ या तीनही दोषांसाठी शामक (नियंत्रक) आहे. पिकलेला कोहळा हा शरीरामध्ये थंडावा वाढवणारा, लघवी सुटण्यास साहाय्यक, मूत्राशयाची शुद्धी करणारा, हृदयासाठी हितकर, वृष्य (वीर्य व कामेच्छावर्धक) आणि बलवर्धक आहे. मात्र कोहळ्याची बी आणि या बियांचे तेल उष्ण व पित्तवर्धक आहे.

शरीराला मुबलक पाणी पुरवणारा कोहळा

ग्रीष्म-शरद ऋतूमधल्या कडक उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला अधिकाधिक पाण्याची गरज असल्याने शरीराला अधिकाधिक नैसर्गिक ओलावा पुरवणाऱ्या भाज्यांची निवड आपल्या आहारात करायला हवी. ज्या भाज्या शरीराला मुबलक पाणी पुरवतात, त्यामध्ये कोहळ्याचा क्रमांक वरचा आहे. कोहळा शरीराला ९६.५% पाणी पुरवतो. हे प्रमाण काकडीपेक्षाही काकणभर सरस आहे (काकडी ९६.३% पाणी पुरवते).

कोहळ्याचा पेठा

उत्तर भारतामध्ये प्रसिद्ध असणारा आणि कोहळ्यापासून बनवला जाणारा एक गोड पदार्थ म्हणजे ‘पेठा’. आग्य्राचा ताजमहाल जसा प्रसिद्ध आहे, तसाच खवय्यांमध्ये आग्य्राचा पेठा प्रसिद्ध आहे. हा स्वादिष्ट पेठा गुलाब पाकळ्यांबरोबर खाण्याची पद्धत उत्तर भारतामध्ये आहे, जी शरीरामध्ये थंडावा वाढवण्यास साहाय्यकारक ठरते. (टीप : पेठ्यामध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त आहे आणि साखर आरोग्यासाठी वाईट आहे, हे मात्र ध्यानात ठेवा.)

कोहळ्याचे औषध

कोहळ्याचा, त्याच्या रसाचा आणि बीमधील गराचा उपयोग औषधात केला जातो. अतिशय पौष्टिक असल्यामुळे दक्षिणेकडील राज्यांमध्ये कोहळ्याची भाजी खाण्याचे प्रमाण अधिक आहे. कोहळ्यापासून तयार केलेला कुष्माण्डपाक किंवा कुष्माण्ड अवलेह हा साधारण च्यवनप्राशसारखाच चाटून खाण्याचा स्वादिष्ट अवलेह आहे, जो विशेषतः पित्त व रक्तसंबंधित रोगांवर गुणकारी आहे. सहसा फळ एक वर्ष जून झाल्यावर मग त्याचा कुष्माण्ड पाक, कुष्माण्ड अवलेह बनवण्यासाठी उपयोग करतात.

कोहळ्याचे उपयोग

* कोहळ्याचा शीत गुण रक्तामधील उष्णता कमी करण्यासाठी हितकारक आहे. साहजिकच शरीरामध्ये उष्णता वाढून होणा‍ऱ्या विविध पित्तविकारांमध्ये ताज्या कोहळ्याचा रस लाभदायक आहे.

* ग्रीष्म ऋतू (एप्रिल-मेचा उन्हाळा) व शरद ऋतू (ऑक्टोबर हीटचा काळ) च्या दिवसांत ज्यांना ऊन बाधते, शरीरामध्ये उष्णता वाढते त्यांनी सकाळ-संध्याकाळ कोहळ्याचा रस प्यावा.

* शरीरामध्ये उष्णता वाढल्याने अंगावर लालसर रंगाच्या पुळ्या आल्यास किंवा खाज येत असल्यास कोहळ्याचा रस द्यावा.

* यातील फायबर अपचन, बद्धकोष्ठता किंवा पोटाच्या इतर समस्या दूर करण्यासाठी अत्यंत उपयुक्त  ठरते.

* कोहळ्यात भरपूर फायबर असते, जे भूक कमी करून वजन कमी करण्यास मदत करते. ज्यांना पटकन वजन कमी करायचे आहे त्यांनी आपल्या आहारात कोहळ्याचा समावेश करावा.

* नाकातून रक्तस्राव होत असल्यास दोन-दोन चमचे कोहळ्याचा रस पाजावा.

* मूत्रामधून रक्तस्राव होत असल्यास (लालसर लघवी होत असल्यास) कोहळ्याचा रस घ्यावा.

* टीबी या आजारात फुफ्फुसांमधून रक्तस्राव झाल्यास औषधांबरोबरच त्या रुग्णाला कोहळ्याचा रस देता येईल.

* वास्तवात शरीरामध्ये कोणत्याही मार्गाने वा कोणत्याही इंद्रियामध्ये रक्तस्राव होत असेल तर कोहळ्याचा रस उपयोगी आहे.

* मूत्रविसर्जन (लघवी) करताना बाधा येत असल्यास किंवा थेंब-थेंब होत असल्यास किंवा जळजळ होत असल्यास कोहळ्याचा रस प्यावा. कोहळ्यामुळे मूत्राशय स्वच्छ होऊन लघवी साफ होते.

* मधुमेहामध्ये मूत्रावाटेतून साखर जात असल्यास मधुमेहाच्या औषधांबरोबर कोहळ्याचा रस द्यावा.

* मस्तिष्कामध्ये उष्णता वाढून होणा‍ऱ्या मानसिक आजारांमध्येही कोहळा उपयुक्त आहे.

* कोहळ्यामुळे निद्रानाशाचा व वाईट स्वप्ने पडण्याचा त्रास कमी होतो.

* कोहळा मलभेदक असल्याने शरीरामध्ये जमलेल्या कठीण मलाचे भेदन करून मलविसर्जनास साहाय्य करतो.

* कोहळा बलवर्धक व वीर्यवर्धक असून शरीरधातूंसाठी विशेषतः हृदयाच्या स्नायूंसाठी आणि केसांसाठी पोषक आहे.

* मज्जासंस्थेची कार्यशक्ती वाढवण्यासाठी, पचन संस्थेच्या निरोगी कार्यासाठी, यकृतासाठी कोहळा लाभदायक आहे.

* यात व्हिटॅमिन ‘सी’चे प्रमाण अधिक असल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत होते. यात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. याशिवाय कोहळा शरीराला डिटॉक्स करतो.

* कोहळ्याचे सूप किंवा रस घेतल्यास मेंदूचा थकवा जाऊन उत्साह वाढतो.

* तळहात, तळपाय यांची आग होत असेल तसेच जळवात हा विकार झालेला असेल तर रात्री झोपताना तळव्यावर कोहळ्याचा कीस बांधून ठेवावा. त्यामुळे थंडावा निर्माण होऊन भेगा हळूहळू कमी होतात.

* जुनाट ताप, सर्दी, खोकला, क्षयरोग, टायफॉइड, मलेरिया, कावीळ आदी आजारांमुळे अशक्तपणा जाणवत असेल तर त्यावर कोहळा हे उत्तम टॉनिक आहे.

* डोळ्यांची आग होत असल्यास, किंवा पित्ताची समस्या असल्यास कोहळ्याचे सेवन करावे.

* कोरडा खोकला, ताप, उपदंश इत्यादींवर कोहळा गुणकारी आहे. कोहळ्याच्या बियांचे तेल कृमिनाशक आहे.

* कोहळ्याचा रस पेय म्हणूनही घेतात. कोहळ्याचे सूप किंवा रस घेतल्यास मेंदूचा थकवा जाऊन उत्साह वाढतो.

एकंदरच विविध पित्त आणि रक्तसंबंधित विकारांमध्ये कोहळा उपयुक्त आहे. मात्र त्यासाठी कोहळ्याचा रस पिणे अपेक्षित आहे, कोहळ्याचा पेठा नाही. कारण पेठा तयार करताना कोहळ्यामधील पाणी बाहेर काढले जाते. वात-पित्त आणि कफ या तीनही दोषांसाठी शामक असलेल्या मोजक्या पदार्थांमध्ये कोहळ्याचा समावेश होतो.

कोहळ्याच्या रसाची मात्रा

मोठ्यांनी दोन ते चार चमचे ताज्या कोहळ्याचा रस दिवसातून दोन ते तीन वेळा घ्यावा. तर लहान मुलांना अर्धा ते एक चमचा ताज्या कोहळ्याचा रस दिवसातून दोन ते तीन वेळा देणे लाभदायक ठरते.

(टीप-वर माहिती दिल्याप्रमाणे कोहळ्याचा औषध म्हणून उपयोग करायचा झाल्यास आयुर्वेद तज्ज्ञांचा सल्ला घ्या, स्वयंप्रयोग करू नका.)

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


वैद्य अश्विन सावंत

(लेखक अनुभवी आयुर्वेदिक चिकित्सक आहेत.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.