घर | home cleaning | to clean the house | clean up the house | keeping house clean| domestic cleaning | handy house cleaning | weekly cleaning

जंतूंचे घर | कोमल दामुद्रे | The House of Germs | Komal Damudre

जंतूंचे घर

आपले घर आपल्या प्रत्येकासाठी खास असते, अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत.म्हणूनच आपले हे घर नेहमी व्यवस्थित, नीटनेटके, सुंदर आणि स्वच्छ राहील याची काळजी घेत असतो.पण रोज येणाऱ्या धूळ, माती यांच्यामुळे आपले हे घर अस्वच्छ होते.घरातील कानाकोपऱ्यात धूळ व माती साठून जंतूंचा प्रादुर्भाव वाढून घरात आजारपण येण्याची शक्यता वाढते.

सध्याच्या दिवसांत तर घरात कुठेही हात लावतानासुद्धा भीती वाटते.घरात कोणत्याही वस्तूला, आपण बसलेल्या जागी किंवा घरातील इतर कुठल्याही ठिकाणी स्पर्श करताना जंतू चिकटलेले नसतील ना, या विचाराने अक्षरशः गोंधळ उडतो.आपली रोजची धावपळीची जीवनशैली लक्षात घेता आपले घर जंतूंपासून सुरक्षित कसे ठेवायचे, असा विचार त्रास देत असतो.दररोज आपण घर स्वच्छ करत असलो, तरी कामाच्या घाईगडबडीत घरातील कानेकोपरे साफ करायचे राहून जातात किंवा दुर्लक्ष होते.पण तसे करणे धोकादायक ठरू शकते.घराच्या कानाकोपऱ्यात किंवा तुम्ही कल्पनाही केली नसेल अशा ठिकाणी लपून बसलेल्या जंतूंमुळे तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे आरोग्य नक्कीच धोक्यात येऊ शकते.आपल्या कुटुंबाला असा कोणताही त्रास होऊ नये, याची दक्षता घेण्यासाठी घरातील नेहमीच्या जागांबरोबरच पुढे दिलेल्या (आणि तुम्ही कल्पनाही न केलेल्या) जागांची नियमित स्वच्छता करायला विसरू नका॒:

१. पाण्याची टाकी: उंचावर असल्यामुळे आपण शक्यतो पाण्याची टाकी नियमित साफ करत नाही.त्यावर जमलेली धूळ वरच्यावर साफ करून सोडून देतो आणि स्वच्छ पाणी भरून ठेवतो.पण कितीही स्वच्छ पाणी भरले तरी टाकी नियमित साफ न केल्यामुळे त्यात जंतू, अळ्या व माती जमा होऊन त्याद्वारे आपल्याला अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो.म्हणूनच पाण्याची टाकी आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा साफ करणे गरजेचे आहे.

२. स्वयंपाक घर: ओटा धुणे, गॅस पुसणे, भिंतीलगत असणाऱ्या खिडक्या या गोष्टी आपण नियमित स्वच्छ करतो.पण स्वयंपाक घराच्या खिडक्या, गॅसमागची भिंत/टाइल्स फोडणीमुळे, तेलामुळे चिकट होतात.गॅसच्या बटणांच्या आजूबाजूला, शेगडीच्या आजूबाजूला तेलाचे थर साचतात.स्वयंपाक घराला असणाऱ्या मोठमोठ्या स्लाइडिंग खिडक्यांमध्येही धूळ जमा होऊन तिथेही जंतूंनी आपले घर केलेले असते.स्वयंपाकाचा धूर जाण्यासाठी लावलेल्या एक्झॉस्ट फॅनवरही प्रचंड प्रमाणात धूळ जमून राहते.या पंख्याची साफसूफ नियमित होईलच याची खात्री नाही.कारण एकतर हा पंखा साफ करायला अवघड आणि दुसरे म्हणजे वेळेचे गणित.पण तरीही वेळ मिळेल तसे व शक्य असेल तेव्हा ओल्या फडक्याने किंवा साबणाने हलक्या हाताने पंख्याचे कोपरे व पाती साफ करावीत.

एखाद्या चांगल्या टूथब्रशने गॅसची बटणे साफ करता येतात.घरात वापरात असलेल्या केमिकल्स किंवा एक्सपायरी झालेल्या हँड सॅनिटायझर किंवा साबणाने खिडक्यांच्या काचा, ट्रॉलीमधील खण, ओटा साफ करता येईल.एखाद्या टोकदार वस्तूने ओल्या कपड्यावर केमिकल किंवा सॅनिटायझर घेऊन ओट्याचे-खिडक्यांचे कोपरे, भांड्याचा स्टँड साफ करता येईल.मात्र आपल्या वस्तूंवर ओरखडे येणार नाहीत किंवा तडा पडणार नाही, याची काळजी घ्या.शक्य असल्यास स्वयंपाक घर साफ करण्यासाठी लिंबाचा वापर करावा, जेणेकरून जंतू, माश्या, चिलटे यांचा नाश होण्यास मदत होईल.

३. शॉवर हँडल: शॉवर हँडलवर असणारी धूळ व जंतू यांचा आपणकाही अंदाजच लावू शकत नाही. हा भाग रोज साफ न केल्यास यावर सर्वाधिक जंतू निर्माण होतात व ते हवेतून आपल्या शरीरात प्रवेश करतात.किमान आठवड्यातून दोनदा तरी शॉवर हँडल साफ करायला विसरू नका.

४. कार्पेट: कार्पेटवर सर्वांत अधिक प्रमाणात धूळ व माती बसते.आपले घर जर हवेशीर किंवा बाग, मैदान यासारख्या परिसराजवळ असेल, तर या धुळीचे प्रमाण आणखीनच वाढते.घरात पाळीव प्राणी किंवा लहान मूल असेल, तर हे कार्पेट जास्तच खराब होते.त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी कार्पेट साफ करणे गरजेचे आहे.

५. वॉशिंग मशीन: वॉशिंग मशीनमध्ये कपडे तर आपण रोजच धुतो, पण या मशीनच्या आजूबाजूच्या भागावरही जंतूंनी आक्रमण केलेले असते, याची आपल्याला कल्पनाच नसते.मशीनच्या आत आपल्या कपड्यांतूनच धूळ, माती व जंतूंचा प्रवेश झालेला असतो.म्हणूनच मशीन साफ करताना/पुसताना बाहेरून जशी नीट पुसतो, तसाच मशीनच्या आतला भाग, झाकणाचा भाग, मशीन युनिटच्या भोवतालचा भागसुद्धा स्वच्छ करायला पाहिजे.

६. टेबल-कपाट: घरातील कपड्यांचे कपाट, सामानाचे कपाट, स्टडी टेबल, डायनिंग टेबल, किचन ट्रॉली वेळोवेळी साफ ठेवून त्यातील जंतूंचा नायनाट करायला हवा.कपाटाखाली साचलेली धूळ, कोपऱ्यातील जळमटे म्हणजे झुरळे, कीटक, जंतू यांचे आश्रयस्थान.त्यामुळे दर आठवड्याला ही कपाटे साफ करून जंतुनाशक स्प्रेंचा फवारा मारता येईल.

७. फ्रीज: बहुतांश घरात फ्रीजची नियमित स्वच्छता केली जाते.फ्रीजचे रॅक साफ करणे, फ्रीजमध्ये कुबट वास येऊ नये म्हणून हर तऱ्हेचे उपाय करतो.पण फ्रीजच्या मागील बाजूकडे फारसे पाहिले जात नाही.वेळोवेळी फ्रीजची कॉइल साफ करणेही तेवढेच गरजेचे आहे.फ्रीजच्या मागच्या बाजूची धूळ ब्रशने साफ करा.फ्रीजचे पाणी कुठून लीक होत नाही ना, हेसुद्धा तपासत राहा.फ्रीजच्या आत भाज्या, फळे बराच काळ राहून सडल्यास त्यात किडे पैदा होऊ शकतात.याकडे लक्ष द्यायला विसरू नका.

८. शू रॅक: शू रॅकवर साचणारी धूळ, माती व जंतू आपल्या घरात सहज प्रवेश करू शकतात.शू रॅक साफ असणे जेवढे महत्त्वाचे तेवढेच बाहेरून घरात येताना डोअर मॅटला पाय पुसून घरात प्रवेश करणेही.

९. सॉफ्ट टॉइज: सॉफ्ट टॉइज-मध्ये धूळ, माती सहजपणे साठून राहते.त्यातून निर्माण होणाऱ्या जंतूंमुळे मुलांना अॅलर्जी होण्याची व मुले आजारी पडण्याची शक्यता असते.यापासून बचाव करण्यासाठी मुलांची खेळणी आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा स्वच्छ करावीत.

१०. ओव्हन व ओव्हन रॅकः ओव्हनमध्ये पदार्थ बनविताना आजूबाजूला तेलाचा थर, शिजलेल्या अन्नाचे कण पडतात, ज्याद्वारे जंतूंची पैदास होण्याची शक्यता बळावते.हेच जंतू अन्नातून आपल्या पोटात प्रवेश करतात.त्यामुळे ओव्हनमध्ये कोणताही पदार्थ बनवून झाला की ओव्हन आणि रॅक दोन्ही साफ करायला विसरू नये.रॅकखालची धूळही वेळोवेळी साफ करा.

११. मॅट्रेस: विश्रांती घेण्यासाठी ज्या गाद्या, उश्या, चादरी आपण वापरतो, त्या वरचेवर धुतल्या नाहीत किंवा त्यांना ऊन दाखवले नाही तर त्यात कीटक, ढेकूण, पिसवा, झुरळांची अंडी होऊ शकतात.यासाठी वेळच्या वेळी मॅट्रेसेसची स्वच्छता राखली पाहिजे व जंतूंचा नाश केला पाहिजे.

१२. संडास आणि बाथरुमची  स्वच्छता: घरातील ज्या भागात सर्वांत अधिक जंतू असू शकतात तो भाग म्हणजे संडास-बाथरुम.टूथब्रश ठेवण्याचा स्टँड, वॉश बेसिन आणि संडास-बाथरुमच्या कोपऱ्यांमध्ये जंतू कायम वास्तव्याला असतात.त्यामुळे टूथब्रशला कॅप लावा.दात घासताना ब्रश आणि कॅप धुऊन घ्या.नळ, पाण्याची भांडी नियमित स्वच्छ करा, त्यात अळ्या होणार नाहीत याकडे लक्ष द्या.भिंतीवरील टाइल्स, नळ, शॉवर, लाइटचे बल्ब, बादल्या व पाण्याचे मग यांची स्वच्छता आठवड्यातून एकदा करा.

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


कोमल दामुद्रे

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.